बडबड आणि कोलांट्या उड्या - "बिहार दिन' (२०१२ साल ची एक आठवण)
बडबड आणि कोलांट्या उड्या (२०१२ साल ची एक आठवण) महानगरी मुंबईत "बिहार दिन' साजरा होवू देणार नाही, अशी वल्गना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आणि नंतर हा फतवा मागेही घेतल्यामुळे, हा दिन वाजत गाजत साजराही झाला. राज ठाकरे यांचा मुंबईतल्या परप्रांतीयांना असलेला विरोध काही नवा नाही. रेल्वे परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय युवकांच्यावर मनसेेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले होते. तेव्हा राज ठाकरे विरुध्द लालू प्रसाद यादव असा शाब्दिक सामना रंगला होता. बिहारच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतल्या बिहारींनी "बिहारदिन' साजरा करायचे जाहीर करताच, असा कोणताही सोहळा आम्ही होवू देणार नाही. बिहार दिन बिहारमध्ये साजरा करावा. मुंबईत कशाला? महाराष्ट्रदिन बिहारमध्ये कुठे साजरा होतो? असे सवालही त्यांनी मालेगावच्या जाहीर सभेत केले. आपला विरोध डावलून असा सोहळा साजरा करायचा प्रयत्न केल्यास आम्ही तो उधळून लावू, अशी धमकीही त्यांनी दिली. पण, अवघ्या चोवीस तासात त्यांना कोलांटी उडी घेत, आपला या दिनाला काहीही विरोध नसल्याचे जाहीर करावे लागले....