अजित पवारांचे बंड - काहीं चर्चेत न आलेले मुद्दे
अजित पवारांचे बंड चर्चेत न आलेले मुद्दे १. बंडखोरांची संख्या किती? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके किती आमदार अजित पवार यांच्यासह भाजपासोबत गेले, याचा नेमका आकडा दिवसभरातील बातम्यांच्या कोलाहलातून स्पष्ट झाला नाही. ही संख्या ४० च्या घरात असावी, असा होरा काही माध्यमांनी नेहमीच्या निनावी विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने केला. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये या प्रश्नाला निश्चित असे संख्यात्मक उत्तर देण्याचे टाळले. स्वत: अजित पवार यांनीही याविषयी कोणताही दावा केला नाही. या बंडखोर आमदारांची नेमकी संख्या गुलदस्त्यात ठेवण्यात या सर्व नेत्यांचा तात्कालिक स्वार्थ असू शकतो. परंतु त्या पलिकडे जाऊन या बंडखोर आमदारांच्या संख्येविषयी अघिकृत मार्गाने माहिती घेऊन ती जनतेसमोर मांडण्याचे काम कोणत्याही माध्यमाने केले नाही. नेतेमंडळी पत्रकार परिषदांमध्ये काय सांगतात एवढ्यावरच विसंबून न राहता ही माहिती मिळविणे त्यांना शक्य होते. ते कसे ते पाहू: एखाद्याचा मंत्रिमंडळात समावेश करणे किंवा एखाद्यास वगळणे हा राज्यघटनेनुसार सर्वस्वीपणे मुख्यमंत्र्यांचा स्...