बडबड आणि कोलांट्या उड्या - "बिहार दिन' (२०१२ साल ची एक आठवण)

बडबड आणि कोलांट्या उड्या
(२०१२ साल ची एक आठवण)
महानगरी मुंबईत "बिहार दिन' साजरा होवू देणार नाही, अशी वल्गना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आणि नंतर हा फतवा मागेही घेतल्यामुळे, हा दिन वाजत गाजत साजराही झाला. 
राज ठाकरे यांचा मुंबईतल्या परप्रांतीयांना असलेला विरोध काही नवा नाही. 
रेल्वे परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय युवकांच्यावर मनसेेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले होते. तेव्हा राज ठाकरे विरुध्द लालू प्रसाद यादव असा शाब्दिक सामना रंगला होता. बिहारच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतल्या बिहारींनी "बिहारदिन' साजरा करायचे जाहीर करताच, असा कोणताही सोहळा आम्ही होवू देणार नाही. 
बिहार दिन बिहारमध्ये साजरा करावा. मुंबईत कशाला? महाराष्ट्रदिन बिहारमध्ये कुठे साजरा होतो? असे सवालही त्यांनी मालेगावच्या जाहीर सभेत केले. 
आपला विरोध डावलून असा सोहळा साजरा करायचा प्रयत्न केल्यास आम्ही तो उधळून लावू, अशी धमकीही त्यांनी दिली. 
पण, अवघ्या चोवीस तासात त्यांना कोलांटी उडी घेत, आपला या दिनाला काहीही विरोध नसल्याचे जाहीर करावे लागले. 
राजकारणाच्या डावपेचात कुशल आणि तरबेज असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अत्यंत धूर्तपणे राज ठाकरे यांच्या धमक्यांच्या खेळीला योग्य प्रत्युत्तर तर दिलेच, पण राजकारणात राज ठाकरेही अद्याप खूपच कच्चे-अननुभवी असल्याचेही सिध्द करून दाखवले. 
आपण बिहार दिनाच्या मुंबईच्या कार्यक्रमात महाराष्ट्रभूमीला, मराठी परंपरेला, संतांना वंदन करायसाठी येत आहोत. त्यात काही राजकारण नाही. राजकीय लाभासाठी आपण मुंबईत येत नाही, असे नितीशकुमार यांनी राज ठाकरे यांना फोनवर गोड शब्दात सांगितले आणि राज ठाकरे यांच्या तथाकथित धमकीतली हवाच काढून घेतली. नितीशकुमार यांच्या स्पष्टीकरणानंतर, बिहार दिनाला विरोध करायचे मूळ कारणच नाहीसे झाल्याने, त्यांना माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 
मुंबईतला बिहारदिनाचा सोहळा गाजत राहिला, तो राज ठाकरे यांनी केलेल्या विरोधामुळेच!  नितीशकुमार वाजत गाजत सोहळ्याला उपस्थित राहिले. या सोहळ्याचा प्रारंभच महाराष्ट्र गीताने झाला. सोहळ्यातल्या भाषणात नितीशकुमार यांनी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूमीचा, सांस्कृतिक परंपरेचा मुक्तकंठाने गौरव तर केलाच, पण मराठी लोकांनी, उद्योजकांनी बिहारमध्ये यावे, आम्ही त्यांचे स्वागत करायला उत्सुक आहोत, असे निमंत्रणही दिले. बिहारमध्ये "महाराष्ट्रदिन' साजरा करू, अशी घोषणाही केली. 41 वर्षांपूर्वी आपण याच मुंबईत अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी राहात होतो. त्यामुळे मराठी मातीशी आणि माणसाशी आपली नाळ जुळलेली आहे. छ. शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह थोर वंदनीय विभुती याच महाराष्ट्राने देशाला दिले. त्यांच्या थोर परंपरेचा आदर करूया, भेदाभेद न करता देश मजबूत करूया, असे आवाहन करीत नितीशकुमार यांनी राज ठाकरे यांच्या संकुचित विचारांना कोपरखळ्याही दिल्या. बिहारी माणूस जिथे जाईल, तिथे श्रमाने-कष्टाने स्वत:च्या पायावर पुढे येतो. तो कधीही कुणावर ओझे झालेला नाही. होणारही नाही, याची आठवण करून द्यायलाही ते विसरले नाहीत. तुम्ही जिथे रहाल तिथे व्यवस्थित रहा. स्थानिकांना त्रास देवू नका, त्या भूमीचे व्हा, असा सल्लाही त्यांनी आपल्या बिहारी बांधवांना दिला. 
मुंबईतल्या परप्रांतीयांच्या लोंढ्यावर राज ठाकरे यांचा विशेष रोख आहे. या लोंढ्यामुळेच महानगरी मुंबई बकाल झाली. भूमिपुत्रांना म्हणजेच मराठी माणसांना उद्योग-नोकऱ्यांची संधी मिळेनाशी झाली, असे त्यांचे म्हणणे खरे असले, तरी मराठी माणसाची मानसिकताही मुंबईतल्या परप्रांतीयांच्या, श्रमिकांच्या वास्तव्याला कारणीभूत ठरली, हे सत्यही नितीशकुमार यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. बांधकामापासून ते शेकडो श्रमाच्या उद्योगात बिहारी, उत्तर प्रदेशच्या मजुरांची संख्याच अधिक का? मराठी माणूस असा अंग मोडून काम का करीत नाही? परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात परत गेल्यास, मुंबईतल्या  विविध उद्योगांना कामासाठी माणसांची टंचाई भासेल. केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातल्या धरणांच्या, रस्त्यांच्या कामावरही परप्रांतीय मजूरच अधिक असतात. कारण महाराष्ट्रात या कामासाठी मजूरच मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. नितीशकुमार यांनी मराठी माणसांना-उद्योजकांना त्यांच्या बिहार राज्यात यायचे निमंत्रण दिले आहेच, ते स्वीकारायचे धाडस राज ठाकरे यांच्यात आहे काय? हजारो मराठी श्रमिकांना बिहारमध्ये न्यायचा उपक्रम त्यांनी सुरु केला, तरी त्यांना तशी माणसे मिळणेही शक्य होणार नाही, हे कटुसत्यही राज ठाकरे यांना कसे नाकारता येणार? बिहार दिनाला आधी विरोध आणि नंतर तो विरोध मागे 
घ्यायच्या उतावळ्या राजकारणाने राज ठाकरे यांच्या तथाकथित "बंदी' च्या फतव्याचा 
फज्जा मात्र उडाला आणि "आ बैल मुझे मार' अशी त्यांची अवस्था झाली! 
- वासुदेव कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034