#मोदी_चेहरा_तर_अमित_शहा_खरा_खेळाडू!
*मोदी जनतेची मने जिंकतात, अमित शाह निवडणुका जिंकण्याची यंत्रणा उभी करतात!
-- #रोखठोक_दयानंद_नेने
भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी गेल्या दशकभरात भाजपच्या राजकीय यशाचे सर्वात महत्त्वाचे सूत्र ठरली आहे. मोदींचे नेतृत्व, लोकप्रियता, वक्तृत्व आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची क्षमता हा भाजपचा सर्वात मोठा राजकीय भांडवलाचा भाग आहे. पण या लोकप्रियतेचे मतांमध्ये आणि मतांचे विजयात रूपांतर करण्याचे काम कोण करते? इथे अमित शाह यांचे महत्त्व अधोरेखित होते.
अमित शाह यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असायला हवा. ते केवळ गृहमंत्री नाहीत, केवळ भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नाहीत, तर निवडणुकीच्या राजकारणातील अत्यंत कुशल रणनीतीकार आहेत.
त्यांची खासियत म्हणजे ते निवडणूक प्रचाराच्या झगमगाटापेक्षा निवडणुकीच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करतात.
मोदींची सभा कुठे होणार, किती गर्दी जमणार, किती लोक त्यांचे भाषण ऐकणार, यापेक्षा अमित शाह यांच्यासाठी प्रत्येक मतदारसंघात किती मते मिळणार, कोणत्या बूथवर किती मतदान होणार आणि कोणत्या समाजघटकापर्यंत पक्ष पोहोचला आहे, हे अधिक महत्त्वाचे असते.
त्यांचे राजकारण भाषणांपेक्षा आकडेवारीवर चालते.
भाजपच्या निवडणूक यंत्रणेतील पन्नाप्रमुख, बूथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख ही रचना केवळ कागदावरची संघटनात्मक पदे नाहीत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न आहे. कोणत्या बूथवर पक्ष मजबूत आहे, कुठे कमकुवत आहे, कोणता कार्यकर्ता निष्क्रिय आहे, कुठे नव्याने संपर्क वाढवण्याची गरज आहे, याचा सातत्याने आढावा घेण्याची पद्धत त्यांनी अधिक प्रभावी केली.
काँग्रेसच्या पराभवाचे एक कारण म्हणजे निवडणूक आली की प्रचार सुरू करायचा आणि निवडणूक संपली की संघटनाकडे दुर्लक्ष करायचे, ही वृत्ती. भाजपने मात्र निवडणूक नसतानाही बूथ पातळीवर काम सुरू ठेवण्यावर भर दिला.
अर्थात, भाजपचे प्रत्येक यश केवळ अमित शाह यांच्यामुळेच मिळाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. मोदींचे नेतृत्व, संघ परिवाराचे योगदान, राज्यस्तरीय नेते, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक राजकीय परिस्थिती हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. पण या सगळ्यांना एका निवडणूक रणनीतीत बांधण्याचे काम अमित शाह यांनी प्रभावीपणे केले आहे.
2014 नंतर भाजपचा राजकीय विस्तार, अनेक राज्यांतील सत्ता, विरोधकांच्या बालेकिल्ल्यांमध्ये केलेली घुसखोरी आणि निवडणुकीच्या मैदानातील सातत्यपूर्ण आक्रमकता यामागे या संघटनात्मक कौशल्याचा मोठा वाटा आहे.
मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही, हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे कोणतीही निवडणूक रणनीती अचूक किंवा अजिंक्य नसते, हा धडा भाजपलाही मिळाला आहे.
मला अमित शाह यांच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे निवडणूक ही केवळ लोकप्रियतेची स्पर्धा नसून संघटन, नियोजन, सातत्य आणि अंमलबजावणीची परीक्षा असते, याची त्यांनी भाजपला जाणीव करून दिली.
मोदी हे भाजपचे सर्वात मोठे जननेते आहेत. अमित शाह हे त्या नेतृत्वाच्या राजकीय ताकदीला संघटनात्मक बळ देणारे रणनीतीकार आहेत.
एकाकडे जनतेला आकर्षित करण्याची क्षमता आहे, तर दुसऱ्याकडे त्या जनसमर्थनाचे निवडणुकीतील यशात रूपांतर करण्याची यंत्रणा उभी करण्याची क्षमता आहे.
आणि म्हणूनच भारतीय राजकारण समजून घ्यायचे असेल, तर मोदींच्या सभांइतकेच अमित शाह यांच्या बूथ पातळीवरील राजकारणाचाही अभ्यास करावा लागेल.
निवडणूक जिंकण्यासाठी लोकप्रिय चेहरा आवश्यक असतो; पण तो चेहरा विजयात रूपांतरित करण्यासाठी मजबूत संघटन आणि अचूक रणनीती आवश्यक असते. अमित शाह यांची खरी ताकद इथेच आहे!
-- दयानंद नेने
#अमित_शाह
#Pointblank_Dayanand_Nene
-- #रोखठोक_दयानंद_नेने

Comments
Post a Comment