#रोखठोक_दयानंद_नेने
🌀 *आमच्या नेत्यांनो - लोकशाही वाचवण्याची रॅली काढण्याआधी ठाणे वाचवण्याची रॅली काढा!*
*सत्ताधाऱ्यांना लोकशाहीची चिंता आहे; पण ठाणेकरांच्या जगण्याच्या प्रश्नांचे काय?*
१ नोव्हेंबर २०२६. ठाणे शहरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे अन्य प्रमुख नेते 'लोकतंत्र बचाव' पदयात्रेत सहभागी झाले . देशाच्या राजकारणात लोकशाही, निवडणूक आयोग आणि विरोधकांच्या आंदोलनाला उत्तर देण्याची ही राजकीय लढाई असू शकते. प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही.
पण एक प्रश्न मात्र या आमच्या नेत्यांना विचारावासा वाटतो.
👉 ठाण्यात लोकशाही वाचवायला निघालात, पण ठाणेकरांचे शहर वाचवण्यासाठी कधी रस्त्यावर उतरणार?
• लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका जिंकणे, विरोधकांना प्रत्युत्तर देणे, घोषणा देणे आणि शक्तिप्रदर्शन करणे नव्हे. लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे जनतेचे म्हणणे ऐकणे, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देणे आणि सत्तेचा वापर जनहितासाठी करणे.
📍आज ठाणेकरांचा प्रश्न हाच आहे की, आमचे ऐकणार कोण?
१. अमेझॉन डेटा सेंटर : विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या चिंतांकडे दुर्लक्ष का?
बाळकूम-माजिवडा परिसरातील अमेझॉन कंपनीचा प्रस्तावित महाकाय डेटा सेंटर प्रकल्प हा आज ठाण्यातील सर्वाधिक चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे.
आमचा विरोध अमेझॉन कंपनीला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाला नाही. गुंतवणुकीला तर अजिबात नाही. पण अशा प्रचंड क्षमतेच्या डेटा सेंटरसाठी निवासी वस्तीच्या मध्यभागी असलेली जागा निवडण्याची आवश्यकता काय?
वीज वापर, प्रचंड उष्णता, डिझेल जनरेटर, ध्वनीप्रदूषण, पाणीपुरवठा, अग्निसुरक्षा आणि भविष्यातील विस्तार या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नागरिकांना मिळाली आहेत का?
अमेझॉनने पर्यावरणीय परवानग्या, वृक्षलागवड आणि तांत्रिक उपाययोजनांबाबत आपली बाजू मांडली आहे. पण कंपनीने नियमांचे पालन केल्याचा दावा करणे आणि त्या प्रकल्पाचा स्थानिक नागरिकांच्या जीवनावर होणारा एकत्रित परिणाम तपासणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
ठाणेकरांची मागणी सरळ आहे. या प्रकल्पाचा स्वतंत्र आणि पारदर्शक पुनर्विचार करा. पर्यावरणीय व नागरी परिणामांचा निष्पक्ष आढावा घ्या. निवासी वस्त्यांपासून दूर, योग्य औद्योगिक क्षेत्रात पर्यायी जागेचा विचार करा.
नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे न देता केवळ परवानग्यांचा दाखला देणे म्हणजे लोकशाही नव्हे.
📍२. रिंग मेट्रो : ठाणेकरांना मेट्रो हवी आहे पण नियोजनाशिवाय प्रकल्प नको आहेत?
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो हा सुमारे २९ किलोमीटरचा, २२ स्थानकांचा आणि तब्बल १२,२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
मेट्रोला विरोध करणे हा आमचा हेतू नाही. सार्वजनिक वाहतूक सक्षम झालीच पाहिजे. पण प्रश्न आहे तो प्राधान्यक्रमाचा, नियोजनाचा आणि अंमलबजावणीचा.
आज ठाणेकरांची अवस्था काय आहे?
घोडबंदर रोडवर रोजची वाहतूक कोंडी. कापूरबावडी, माजिवडा, तीन हात नाका, नितीन कंपनी, आनंदनगर आणि शहरातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांच्या रांगा. पार्किंगचा प्रश्न गंभीर. बससेवा अपुरी. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपथ नाहीत. अनेक रस्त्यांवर एकाच वेळी सुरू असलेली कामे.
मेट्रो ४, मेट्रो ५ आणि इतर पायाभूत प्रकल्पांच्या कामांमुळे नागरिक आधीच वाहतूक कोंडीचा त्रास 10 वर्षे सहन करत आहेत.
अशा परिस्थितीत नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यापेक्षा आधीपासून सुरू असलेल्या प्रकल्पांची वेळेत पूर्तता, बससेवेचे सक्षमीकरण, वाहतूक व्यवस्थापन आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी यावर भर द्यायला नको का?
रिंग मेट्रोच्या मार्गातील पर्यावरणीय परिणाम, कांदळवन आणि वृक्षांवरील परिणाम, बांधकामादरम्यान होणारा त्रास आणि पर्यायी मार्ग यावर नागरिकांशी खुला संवाद झाला पाहिजे.
नागरिकांनी प्रश्न विचारले म्हणजे ते विकासविरोधी ठरत नाहीत. उलट, विकासाच्या नावाखाली भविष्यात शहरावर कोणते ओझे पडणार आहे, याचा विचार करणारे नागरिकच खऱ्या अर्थाने जबाबदार असतात.
📍 ३. झाडे, जंगल आणि पर्यावरण : ठाणे शहराला काँक्रीटचे जंगल बनवायचे आहे का?
ठाण्याची ओळख केवळ इमारती, मॉल्स आणि उंच टॉवर्समुळे नाही. येथील टेकड्या, तलाव, हिरवाई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि खाडी परिसर हे या शहराचे नैसर्गिक वैभव आहे.
पण आज विकासाच्या नावाखाली या नैसर्गिक संपत्तीवर सतत दबाव वाढत आहे.
रिंग मेट्रोच्या प्रस्तावित मार्गामुळे कांदळवनांवर होणारा परिणाम, वृक्षतोड, जंगलालगतच्या क्षेत्रांमधील बांधकामे आणि शहरातील उरलेल्या हिरवळीचे संरक्षण हे प्रश्न गंभीर आहेत.
परवानगी मिळाली म्हणजे पर्यावरणीय प्रश्न संपला असे होत नाही. पर्यावरणीय नुकसान भरून काढण्यासाठी केवळ नवीन झाडे लावण्याचे आकडे पुरेसे नाहीत. जुनी झाडे, त्यांची परिसंस्था, पक्षी, जैवविविधता आणि त्या जागेचे पर्यावरणीय महत्त्व यांना पर्याय नसतो.
ठाणेकरांना विकास हवा आहे; पण श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी पाणी आणि मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागाही हवी आहे.
📍४. पाणीटंचाई आणि अनियंत्रित नागरीकरण : ठाणे किती लोकांचा भार पेलणार?
ठाण्याची लोकसंख्या वाढत आहे. नवीन टॉवर्स उभे राहत आहेत. नवीन प्रकल्पांना परवानग्या मिळत आहेत. पण त्याच प्रमाणात पाणी, रस्ते, मलनिस्सारण, सार्वजनिक वाहतूक, आरोग्यसेवा आणि नागरी सुविधा वाढल्या आहेत का?
शहराच्या पाणीपुरवठ्यातील तूट, गळती, टँकरवरील अवलंबित्व आणि घोडबंदर परिसरातील भीषण पाणीप्रश्न याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
एका बाजूला नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते आणि दुसऱ्या बाजूला वाढत्या नागरीकरणाला कोणत्या पायाभूत क्षमतेवर परवानगी दिली जाते, याचे उत्तर मिळाले पाहिजे.
नवीन बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी पाणी उपलब्धता, सांडपाणी प्रक्रिया, वाहतूक क्षमता आणि पर्यावरणीय वहनक्षमता यांचे स्वतंत्र मूल्यमापन बंधनकारक असले पाहिजे.
शहराची लोकसंख्या वाढवणे म्हणजे विकास नव्हे; त्या लोकसंख्येला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवणे म्हणजे विकास!
📍५. गुन्हेगारी, गोळीबार आणि नागरिकांची सुरक्षितता
ठाणे हे एकेकाळी शांत, सुरक्षित आणि राहण्यायोग्य शहर म्हणून ओळखले जात होते. आज मात्र गोळीबार, कोयते-चॉपरसारख्या शस्त्रांचा वापर, टोळीयुद्ध, खंडणी आणि गुन्हेगारीच्या घटनांबाबत नागरिकांच्या मनात चिंता निर्माण होत आहे.
कायद्याचा धाक गुन्हेगारांना असला पाहिजे; सामान्य नागरिकांना नाही.
गुन्हेगारांना राजकीय प्रतिष्ठा मिळत असल्याची भावना निर्माण होणे, सार्वजनिक जीवनात त्यांचे खुलेआम स्वागत होणे आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न निर्माण होणे ही लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा आहे.
सत्ताधाऱ्यांनी केवळ कायदा-सुव्यवस्था उत्तम असल्याचे सांगून चालणार नाही. नागरिकांना सुरक्षिततेचा प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे.
📍६. *लोकशाही वाचवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्थानिक लोकशाहीचे काय केले?*
*हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे.*
लोकशाही म्हणजे पाच वर्षांतून एकदा मतदान करणे एवढेच नाही. लोकशाही म्हणजे निवडून दिलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा नागरिकांचा अधिकार.
• ठाणेकरांनी डेटा सेंटरबाबत प्रश्न विचारले तर त्यांना विकासविरोधी म्हणायचे? मेट्रोच्या नियोजनाबाबत आक्षेप घेतला तर त्यांना प्रकल्पविरोधी ठरवायचे? वृक्षतोडीला विरोध केला तर त्यांना प्रगतीचे शत्रू म्हणायचे?
मग नागरिकांनी नेमके काय करायचे?
👉 टाळ्या वाजवायच्या? घोषणा द्यायच्या? नेत्यांच्या स्वागतासाठी गर्दी करायची? आणि आपल्या घरासमोरच्या समस्यांबाबत गप्प बसायचे?
• *WakeUpThanekar*सारख्या नागरिकांच्या व्यासपीठांमधून विविध पक्षांचे, विविध विचारांचे आणि सामान्य व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक शहराच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. त्यांची प्रत्येक मागणी मान्य करणे शक्य नसेल; पण त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि निर्णयप्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे हे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य आहे.
*नागरिकांच्या आंदोलनाला विरोधी पक्षाची फूस आहे, असा शिक्का मारून प्रश्न संपत नाहीत. प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागतात.*
📍७. मुख्यमंत्र्यांना काही थेट प्रश्न!
आज ठाण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणेकरांच्या वतीने काही प्रश्न विचारावेसे वाटतात.
१. बाळकूममधील अमेझॉन डेटा सेंटरबाबत नागरिकांच्या सर्व आक्षेपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून पर्यायी जागेचा विचार करण्याची तयारी आहे का?
२. ठाणे शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय नवीन मोठ्या प्रकल्पांना परवानग्या देण्याच्या धोरणाचा पुनर्विचार होणार आहे का?
३. रिंग मेट्रोच्या पर्यावरणीय परिणामांबाबत नागरिकांसमोर खुली सुनावणी आणि पारदर्शक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे का?
४. मेट्रो, रस्ते आणि इतर पायाभूत प्रकल्पांच्या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला जाणार आहे का?
५. ठाण्यातील वृक्षतोड, टेकड्या, जंगल आणि कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार होणार आहे का?
६. घोडबंदर आणि इतर भागांतील पाणी, रस्ते, पार्किंग, पदपथ आणि सार्वजनिक वाहतूक यांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे का?
७. ठाणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीराजकीय हस्तक्षेपाला लगाम आणि पोलीस यंत्रणेची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे का?
या प्रश्नांची उत्तरे रॅलीतील भाषणांमध्ये मिळाली असती तर ठाणेकरांना नक्कीच आनंद झाला असता .
शेवटी एवढेच...
मुख्यमंत्री साहेब, तुम्ही ठाण्यात आलात , ही चांगली गोष्ट आहे. पण ठाणे हे केवळ राजकीय शक्तिप्रदर्शनाचे मैदान नाही. हे लाखो नागरिकांचे जगण्याचे शहर आहे.
आज तुम्ही 'लोकतंत्र बचाव'चा संदेश देणार आहात. पण लोकशाहीचे सर्वांत मोठे संरक्षण म्हणजे सामान्य नागरिकांचा आवाज ऐकणे.
दिल्लीतील विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाण्यात पदयात्रा काढता; मग ठाण्यातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीही अशीच पदयात्रा काढा.
*राजकीय कार्यकर्त्यांच्या गर्दीतून तुमच्या लोकप्रियतेचे प्रदर्शन होईल. पण नागरिकांच्या मनात निर्माण झालेली नाराजी केवळ गर्दी जमवून दूर होणार नाही.*
*लोकशाही वाचवण्याची रॅली काढण्याआधी ठाणे वाचवण्याची रॅली काढा!*
-- दयानंद नेने
1 नोव्हेंबर 2026

Comments
Post a Comment