डिजिटल_पिंजऱ्यात_भाजपा_कार्यकर्ते

 #रोखठोक_दयानंद_नेने 


*#डिजिटल_पिंजऱ्यात_भाजपा_कार्यकर्ते?*


*[ही माझी एक वर्षांपूर्वीची पोस्ट. आज रिपोस्ट करण्याचे कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात चघळली जाणारी सर्वात viral अशी जरांगे नी रिलीज केलेली 500 कोटी संबंधित ऑडिओ क्लिप. माझा प्रश्न आहे बावनकुळे यांना - तुम्ही जे वर्षांपूर्वी बोललात ते खरे होते की पोकळ धमकी. जर खरे असेल तर ते काय केवळ कार्यकर्त्यांपुरते सीमित होते का? कारण जर ती ऑडिओ क्लिप खरी असेल - तर हे सिद्ध होते की तुमचे नेतेच जास्त loose बोलतात?]*


*बावनकुळे साहेब तुम्ही हे काय बोललात?*


भंडाऱ्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात भाजपा नेते, मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष *चंद्रशेखर बावनकुळे* यांनी केलेले विधान —


*आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मोबाइल, WhatsApp ग्रुप सर्वेलन्स वर ठेवले आहेत; आम्ही रोज तुम्ही काय बोलता, काय लिहिता हे पाहतो*—


हे एक केवळ हलकेफुलके वाक्य नव्हते, तर *राजकीय आणि नैतिक दोन्ही अर्थांनी स्फोटक होते*.


त्यांच्या या धक्कादायक विधानाने काही भयंकर प्रश्न समोर आले आहेत:


👉 *बावनकुळे भाजपा कार्यकर्त्यांना धमकी देत होते का?*

👉 *ते आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम समजतात का?*

👉 *ज्या पक्षात स्वयंसेवकत्व आणि संघशिस्त यांची गप्पा मारल्या जातात, तिथे आता भीतीचे राजकारण सुरू झाले आहे का?*

👉 *भाजपा आता चीन च्या इको सिस्टिम चे अनुकरण करतोय का?


🔹 “पेगासस” महाराष्ट्रात?


बावनकुळे यांनी जणू कबूलच केले की भाजपा ने कार्यकर्त्यांवर "हेरगिरी" करत आहे.


त्यांनी हे “शिस्तीसाठी” सांगितले असेल, पण अशा विधानाचा अर्थ काय?

*शिस्त* आणि *गुप्तचरगिरी* यात फरक असतो.

जर कार्यकर्त्यांच्या फोनवर नजर ठेवली जात असेल, तर महाराष्ट्रात ‘पेगासस’ पुन्हा जन्म घेत आहे का?


🔹 पक्ष शिस्त की भीतीशाही?


भाजपा आज *जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष* आहे.

भाजपाचं गेली 11वर्ष *जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या* सत्तेत आहे.


*पण हा दैवदुर्विलास बघा — *जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत सत्तेत असलेल्या जगातल्या सर्वात मोठया पक्षात लोकशाहीच नाही?*


भाजपात आज मतभेद मांडण्याचा अधिकार संपला आहे.

फडणवीस यांच्या गटाच्या विरुद्ध कोणी बोलले, तर त्याला "सर्वेलन्स ” दाखवून गप्प केले जाते.

कार्यकर्त्याने एखाद्या नेत्यावर टीका केली, तर त्याच्या मोबाइलवर नजर ठेवली जाईल, हे सांगणे म्हणजे स्पष्ट धमकी नाही का?

राजकारणात मतभेद असणे हे पक्षशिस्तीचे अपमान नसते —

पण भाजपात आज मतभेद व्यक्त करणे म्हणजे *देशद्रोहा-समान अपराध* बनला आहे!


🔹 बावनकुळे कार्यकर्त्यांना काय समजतात?


भाजपाचे कार्यकर्ते हा पक्षाचा कणा आहेत.

त्यांनी रस्त्यावर झोपून, गल्लोगल्ली फिरून, वडापाव आणि चहावर दिवस काढून पक्ष वाढवला. 

आज त्या कार्यकर्त्यांनाच सांगितले जाते की — “तुमचा मोबाइल आमच्या देखरेखीखाली आहे.”

म्हणजे काय?

तुम्ही गुलाम आहात, तुम्हाला विचारांची, बोलण्याची, संवादाची मोकळीक नाही.


हीच का “नव भारत आणणाऱ्या पक्षाची ” पक्षसंस्कृती?

हीच का संघशिस्त — जिथे स्वयंसेवकाच्या मनावर विश्वास ठेवला जात नाही?


🔹 लोकशाहीत ‘डिजिटल कैद’


संविधानाने प्रत्येक नागरिकाला *गोपनीयतेचा आणि अभिव्यक्तीचा हक्क* दिला आहे.

Article 21 नुसार *Right to Privacy* हा मूलभूत अधिकार आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाला, नेत्याला किंवा गटाला व्यक्तीचे फोन, चॅट्स वा ईमेल्स तपासण्याचा अधिकार नाही.

हे काम फक्त कायद्याने अधिकृत यंत्रणांना मर्यादित परिस्थितीत करता येते.


मग बावनकुळे यांनी ज्या प्रकारे “आम्ही पाहतो आहोत” असे खुलेआम सांगितले —

ही फक्त *राजकीय बेपर्वाई* आणि *उद्दामपणा* नाही, तर *संवैधानिक मर्यादांचे उल्लंघन* आहे.

भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांना डिजिटल पिंजऱ्यात ठेवले आहे.

ही *शिस्त नाही*, ही *डिजिटल कैद* आहे.


🔹 अंतर्गत लोकशाहीचा मृत्यू


भाजप आज सत्तेत आहे म्हणून *पक्ष* अधिक लोकशाहीवादी झाला असा समज करणे चूक आहे.

नेमके उलट घडले आहे.

पक्षात आता कधी नव्हती ती गटबाजी सुरु झाली आहे.

*फडणवीस गट*, *दिल्ली गट* आणि *निष्ठावान कार्यकर्ते* यांच्यात विभागणी झाली आहे.

शिस्तीच्या नावाखाली खच्चीकरण, भीती आणि नियंत्रण हेच आजचे वास्तव आहे.


🔹 अंतिम सत्य


श्री. बावनकुळे यांचे विधान हे केवळ एका कार्यक्रमातील हलकेफुलके वाक्य नाही.

ते एक *धोक्याचा सिग्नल* आहे.

जर पक्ष आपल्या कार्यकर्त्यांवरच नजर ठेवली जाते तर ते पक्षासाठी मनमोकळेपणे काम कसे करणार?


लोकशाही फक्त निवडणुका जिंकण्यात नाही; ती मतभेदांना जागा देण्यात असते.

भाजपाने जर या मूलभूत तत्वांनाच विसरले असेल,

तर तो पक्ष “जगातील सर्वात मोठा पक्ष ” नव्हे —

*जगातील सर्वात मोठा ‘भीतीचा कारखाना’* ठरतो.


*बावनकुळे यांनी स्वतःहून स्पष्ट करावे*—

त्यांचे विधान केवळ भाषणातील उत्स्फूर्त उद्गार होते की खरंच अशी कोणती “सर्वेलन्स यंत्रणा” अस्तित्वात आहे?


लोकशाहीत पक्षकार्यकर्त्यांना *गुलाम नव्हे, सैनिक आणि सहकारी* म्हणून वागवले गेले पाहिजे.

भाजपाला जर खऱ्या अर्थाने “संघ संस्कार” जपायचे असतील, तर ही भीतीशाही थांबवावी लागेल — अन्यथा इतिहास यालाच पक्षशाहीचा काळा अध्याय म्हणून ओळखेल.


*शेवटचे अंतिम सत्य बावनकुळे साहेब तुमच्यासाठी:*


• तुम्ही (म्हणजे पक्ष) कोणत्या भयगंडा ने पच्छाडले ला आहात का?

• तुम्ही लोकांनी जी एवढी मोठी खोगीर भरती केली आहे त्यातलेच काही तुमचा घात तर करणार नाही ना ही तुम्हाला भीती आहे?

• असे असेल तर ती भीती तो राग तुम्ही बिचाऱ्या कार्यकर्त्यांवर का काढता?


हेरगिरी करायचीच असेल तर खोगीर भरती केलेल्या विरुद्ध करा. कार्यकर्ते बिचारे सोन्यासारखे असतात. उगाच त्यांना लांछन देऊन त्यांचा अपमान करू नका.


-- दयानंद नेने

   25/10/25

Comments