*#रोखठोक_दयानंद_नेने*
🔵 *लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व: जनतेला उत्तर हवे, उडवाउडवी नव्हे*
👉 हा लेख कुणा एका राजकीय नेत्याबद्दल नसून एकंदर जी प्रवृत्ती राजकारणात दिसते त्याबद्दल आहे.
• जनता दरबार भरवायचा, पत्रकार परिषद घ्यायची आणि नागरिकांना "तुमच्या समस्या घेऊन या" असे आवाहन करायचे; पण जेव्हा खरे प्रश्न विचारले जातात, तेव्हा उडवाउडवीची उत्तरे द्यायची—ही लोकशाहीची पद्धत नाही.
• एखादा विषय लोकप्रतिनिधीकडे नेला जातो, तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या विषयावर त्यांची स्पष्ट भूमिका काय आहे. लोकप्रतिनिधी हा केवळ संदेशवाहक नसतो; तो जनतेचा प्रतिनिधी असतो.
• प्रश्न विचारणारे सामान्य नागरिक असतात. ते तज्ज्ञ नसतात. त्यांना शंका असतात, अडचणी असतात आणि त्यांना आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडून मार्गदर्शन व न्यायाची अपेक्षा असते.
• लोकप्रतिनिधीने प्रथम स्वतः विषय समजून घेतला पाहिजे. उपलब्ध माहितीचा अभ्यास केला पाहिजे. प्रशासनाकडून ठोस, लेखी आणि समाधानकारक स्पष्टीकरण मागितले पाहिजे. जे प्रश्न प्रथमदर्शनी रास्त वाटतात, तेच पुढे नेले पाहिजेत. फक्त अर्ज पुढे ढकलणे किंवा अधिकाऱ्यांचे उत्तर जसाच्या तसा नागरिकांपर्यंत पोहोचवणे, एवढ्यावर लोकप्रतिनिधीची जबाबदारी संपत नाही.
• प्रशासनाकडून उत्तर आल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे—हे उत्तर मला स्वतःला पटते का? जर उत्तरच समाधानकारक नसेल, तर त्यावर पुढील प्रश्न विचारणे, अधिक माहिती मागणे आणि जनतेची बाजू ठामपणे मांडणे हेच लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.
• पक्षशिस्त, वरिष्ठांचा दबाव किंवा राजकीय बंधने असू शकतात. पण त्यामुळे सत्य बदलत नाही. जर एखादे स्पष्टीकरण स्वतःलाच पटत नसेल, तर ते जनतेला अंतिम सत्य म्हणून विकण्याचा प्रयत्न करू नये. प्रामाणिकपणे वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी आणि पुढील लढ्याची दिशा नागरिकांबरोबर ठरवावी.
• जनतेला भ्रमात ठेवून सरकार आणि जनता यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावणे हे लोकप्रतिनिधीच्या विश्वासार्हतेसाठी घातक ठरते. विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा मिळवणे अत्यंत कठीण असते.
• लोकप्रतिनिधीची खरी ताकद पदात नसते; ती जनतेच्या विश्वासात असते. तो विश्वास जपण्यासाठी धैर्य, प्रामाणिकपणा आणि स्पष्ट भूमिका आवश्यक असते.
• अन्यथा, जनतेच्या मनात संशय निर्माण होतो. मग घोषणा बदलतात, टिका वाढते आणि शेवटी "हा जनता दरबार नाही चुत्या बनवण्याचा कारभार आहे" - सारख्या घोषणा लोकांच्या तोंडी येतात.
त्या घोषणांचा जन्म विरोधक करत नाहीत; तो जन्म देतात लोकप्रतिनिधींची मौनवृत्ती, उडवाउडवी आणि उत्तरदायित्व टाळण्याची सवय.
लोकशाहीत प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यांना स्पष्ट, जबाबदार आणि प्रामाणिक उत्तर देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.
-- दयानंद नेने
Comments
Post a Comment