*अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसला १० थेट प्रश्न*
*बाळकुम–माजीवडा, ठाणे येथील प्रस्तावित डेटा सेंटरबाबत*
*ठाणेकरांच्या वतीने प्रश्न*
*दयानंद नेने,* *WakeUpThanekar*
*आमची भूमिका स्पष्ट आहे :*
ठाण्यात Amazon, AWS, डेटा सेंटर, तंत्रज्ञान किंवा गुंतवणूक यांना आमचा विरोध नाही. प्रश्न आहे तो इतक्या मोठ्या Hyperscale Data Centre साठी बाळकुम–माजीवडा हे दाट लोकवस्तीच्या परिसरातील ठिकाण योग्य आहे का आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम ठाणेकरांवर काय होणार आहे?
खालील प्रश्न हे आरोप नाहीत. हे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मिळायला हवे असलेले स्पष्ट, ठोस आणि तपासता येण्याजोगे उत्तर मागणारे प्रश्न आहेत.
१. बाळकुम–माजीवडा च का?
ठाणे हे आधीच अत्यंत दाट लोकवस्तीचे शहर आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावरील Hyperscale Data Centre साठी बाळकुम–माजीवडा हे ठिकाण AWS ने का निवडले?
*जमिनीची उपलब्धता, वीज, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पाण्याची उपलब्धता, लोकसंख्येची घनता, पर्यावरणीय संवेदनशीलता, वाहतूक आणि आपत्कालीन व्यवस्थापन—या सर्व निकषांपैकी कोणते निकष वापरले गेले?*
या प्रकल्पासाठी इतर कोणती ठिकाणे विचारात घेण्यात आली होती? बाळकुमची निवड का करण्यात आली, याची माहिती AWS ठाणेकरांसमोर ठेवणार का?
२. या प्रकल्पाचा अंतिम आकार किती?
प्रकल्पाच्या कागदपत्रांनुसार दोन्ही टप्प्यांसाठी एकूण वीज गरज सुमारे ४२२ MW असून डेटा सेंटर इमारतींसाठी ३,००० kVA क्षमतेचे १९३ डिझेल जनरेटर प्रस्तावित आहेत.
*मग या संपूर्ण प्रकल्पाचा अंतिम आकार किती?*
- एकूण बांधकाम क्षेत्र किती?
- किती Data Centre Buildings असतील?
- अंतिम IT Load किती असेल?
- एकूण वीज वापर किती असेल?
- भविष्यात आणखी विस्ताराची योजना आहे का?
*भविष्यातील कोणत्याही मोठ्या विस्ताराची माहिती आणि त्यासाठी आवश्यक परवानग्या ठाणेकरांसमोर पारदर्शकपणे मांडण्याची AWS ची तयारी आहे का?*
३. आवाजाचा त्रास किती होणार?
*डेटा सेंटर हे २४ तास चालणारे केंद्र आहे. Cooling Systems, Ventilation, Transformers, Chillers आणि Emergency Generators यामुळे ध्वनी निर्माण होऊ शकतो.*
*मग जवळच्या निवासी इमारती, शाळा आणि इतर संवेदनशील ठिकाणी दिवसा आणि रात्री प्रत्यक्ष किती डेसिबल आवाज अपेक्षित आहे?*
सर्व यंत्रणा एकाच वेळी कार्यरत असतील अशा परिस्थितीचे Noise Modelling करण्यात आले आहे का?
आणि सर्वात महत्त्वाचे—
*डेटा सेंटर सुरू झाल्यानंतर स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेमार्फत नियमित Noise Audit करून त्याचे निष्कर्ष सार्वजनिक करण्याची AWS ची तयारी आहे का?*
४. प्रचंड उष्णता बाहेर गेल्यावर त्याचा परिणाम काय?
AWS ने म्हटले आहे की Thane Data Centre मधील सर्व्हरमधून निर्माण होणारी उष्णता Air Handling Systems द्वारे व्यवस्थापित केली जाईल आणि त्याचा आसपासच्या परिसराच्या तापमानावर परिणाम होणार नाही.
ठाणेकरांचा प्रश्न साधा आहे:
या दाव्याच्या मागे नेमका वैज्ञानिक अभ्यास कोणता आहे?
*४२२ MW क्षमतेच्या संपूर्ण कॅम्पसमधून निर्माण होणाऱ्या Waste Heat चे प्रमाण किती असेल?*
*ठाण्याच्या अत्यंत उष्ण आणि दमट हवामानात त्याचा स्थानिक Micro-Climate वर परिणाम होणार नाही, यासाठी स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे का?*
हा अभ्यास आणि प्रकल्प सुरू होण्यापूर्वीची आणि सुरू झाल्यानंतरची तापमानाची आकडेवारी सार्वजनिक करण्याची AWS ची तयारी आहे का?
५. पाण्याचा खरा वापर किती?
AWS च्या म्हणण्यानुसार भारतातील त्यांची Data Centres Cooling साठी Drinking Water टाळतात आणि Air Cooling तसेच Recycled Water चा वापर वाढवत आहेत. AWS ने Water Positive होण्याची उद्दिष्टेही जाहीर केली आहेत.
पण ठाणेकरांना भारताची किंवा जगाची सरासरी नको आहे.
आम्हाला बाळकुम Data Centre चे विशिष्ट आकडे हवे आहेत.
*बाळकुम प्रकल्पाला दररोज किती पाणी लागेल?*
- बांधकाम काळात?
- सामान्य कार्यकाळात?
- उन्हाळ्यातील कमाल परिस्थितीत?
- आपत्कालीन परिस्थितीत?
- भविष्यातील विस्तारानंतर?
हे पाणी नेमके कुठून येणार?
आणि सर्वात महत्त्वाचे—
*या प्रकल्पामुळे ठाणे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची AWS कायदेशीर आणि स्पष्ट हमी देणार का?*
६. १९३ डिझेल जनरेटर—आपत्कालीन परिस्थितीत काय होणार?
प्रकल्पाच्या कागदपत्रांनुसार दोन्ही टप्प्यांसाठी ३,००० kVA क्षमतेचे १९३ डिझेल जनरेटर प्रस्तावित आहेत.
AWS च्या म्हणण्यानुसार हे जनरेटर मुख्यतः आपत्कालीन परिस्थिती आणि चाचणीसाठी वापरले जातील.
*मग ठाणेकरांना स्पष्ट माहिती हवी:*
- एकूण Diesel Storage Capacity किती?
- दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झाल्यास किती डिझेल लागेल?
- अनेक जनरेटर एकाच वेळी सुरू झाल्यास एकूण प्रदूषण किती होईल?
- Fire आणि Emergency Response Plan काय आहे?
- या उत्सर्जनाची आणि आवाजाची स्वतंत्र तपासणी कोण करणार?
आणि सर्वात महत्त्वाचे—
*ज्या आपत्कालीन परिस्थितीसाठी ही प्रचंड व्यवस्था उभी केली आहे, त्या परिस्थितीत आसपासच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेमकी काय तयारी आहे?*
७. ४२२ MW वीज—ठाण्याच्या वीज व्यवस्थेवर परिणाम होणार नाही का?
AWS च्या म्हणण्यानुसार शक्य तेथे Data Centres साठी स्वतंत्र Extra-High-Voltage Substation वापरली जाते, जेणेकरून निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना पुरवली जाणारी स्थानिक वीज वळवली जाऊ नये.
*मग बाळकुमसाठी नेमकी कोणती Power Infrastructure उभारली जाणार आहे?*
या प्रकल्पासाठी MSEDCL च्या पायाभूत सुविधांमध्ये कोणते बदल किंवा वाढ करावी लागणार आहे?
आजूबाजूच्या रहिवाशांच्या वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची AWS काय हमी देते?
आणि AWS च्या राष्ट्रीय Renewable Energy Portfolio ऐवजी बाळकुम Data Centre साठी प्रत्यक्ष किती Renewable Energy उपलब्ध होणार आहे?
८. आग, आपत्ती आणि नागरिकांची सुरक्षा
Hyperscale Data Centre मध्ये प्रचंड विद्युतभार, UPS/Battery Systems, Diesel Generators, Fuel Storage आणि सतत कार्यरत असलेली यंत्रणा असते.
*बाळकुम Data Centre साठी Worst-Case Fire आणि Disaster Scenario कोणते आहे?*
*आजूबाजूच्या उंच निवासी इमारती, रस्ते, शाळा, रुग्णालये आणि आधीच असलेल्या वाहतूक कोंडीचा विचार करून स्वतंत्र आपत्ती-व्यवस्थापन अभ्यास करण्यात आला आहे का?*
AWS खालील माहिती सार्वजनिक करणार का?
- Emergency Response Plan
- Fire-Water Requirement
- Evacuation Plan
- Fire Brigade आणि Ambulance Access
- TMC, Fire Brigade, Police आणि इतर यंत्रणांशी Coordination Protocol
९. E-Waste, Batteries, Diesel आणि Hazardous Waste चे काय?
Data Centre मध्ये सतत Electronic Equipment, Batteries, Electrical Components, Cooling Equipment, Used Oil आणि इतर प्रकारचा कचरा निर्माण होणार आहे.
बाळकुम Data Centre मधून दरवर्षी किती:
E-Waste • Used Batteries • Hazardous Waste • Used Oil • इतर नियमनाधीन कचरा
निर्माण होण्याचा अंदाज आहे?
त्याची विल्हेवाट कोणत्या अधिकृत संस्थांमार्फत लावली जाईल?
आणि AWS दरवर्षी Balkum Environmental Performance Report प्रसिद्ध करणार का?
त्यात पाणी, वीज, आवाज, प्रदूषण, डिझेल वापर, कचरा, पर्यावरणीय घटना आणि नियमांचे पालन यांचा तपशील असेल का?
१०. ठाणेकरांसोबत "Social Licence to Operate" स्वीकारणार का?
Environmental Clearance आणि सरकारी परवानग्या एका प्रश्नाचे उत्तर देतात—
"हा प्रकल्प कायदेशीररीत्या मंजूर आहे का?"
पण नागरिकांचा प्रश्न वेगळा आहे—
*"ज्या परिसरात हा प्रकल्प उभा राहत आहे, त्या परिसरासाठी तो दीर्घकालीनदृष्ट्या योग्य आणि सुरक्षित आहे का?"*
AWS ने आपल्या विविध सार्वजनिक निवेदनांमध्ये ज्या परिसरात ती कार्यरत आहे त्या समुदायांप्रती जबाबदार राहण्याची भूमिका मांडली आहे.
मग बाळकुम–माजीवड्यासाठी AWS एक Permanent Citizen–AWS Environmental Monitoring & Dialogue Mechanism स्थापन करणार का?
त्यात स्थानिक नागरिक, स्वतंत्र पर्यावरणतज्ज्ञ आणि संबंधित नागरी अधिकारी असतील का?
आणि खालील बाबींचे मोजता येणारे आणि स्वतंत्रपणे तपासता येणारे उद्दिष्ट AWS जाहीर करणार का?
पाणी • आवाज • हवेचे प्रदूषण • उष्णता • वीज • डिझेल • अग्निसुरक्षा • E-Waste • वाहतूक • पर्यावरणीय अनुपालन
ठाणेकरांची मागणी साधी आहे
*आम्हाला Amazon ची जागतिक Sustainability Policy सांगणारी सर्वसाधारण उत्तरे नकोत.*
*आम्हाला बाळकुमची आकडेवारी, बाळकुमसाठीची हमी आणि बाळकुमसाठीची जबाबदारी हवी आहे.*
ठाणे हे केवळ नकाशावरील Project Site नाही.
हे नागरिकांचे शहर आहे.
इथे कुटुंबे आहेत, मुले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, शाळा आहेत, रुग्णालये आहेत आणि आधीच ताणलेल्या नागरी सुविधा आहेत.
विकास हवा.
गुंतवणूक हवी.
तंत्रज्ञान हवे.
*पण विकासासोबत एक मूलभूत प्रश्नाचे उत्तरही हवे—*
*या प्रकल्पाची किंमत परिसराला किती मोजावी लागणार आणि ती किंमत कोण मोजणार?*
*दयानंद नेने*
WakeUpThanekar
Aware Citizens. Better Thane

Comments
Post a Comment