सनातन धर्म
काल परवा कोणा एका नेत्याने सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे असे म्हटलें. मला त्या नेत्याची कीव आली. स्वतः ला विद्रोही समजणाऱ्यांच्या बुद्धीवर कधी कधी पडदा पडतो आणि विद्रोह दर्शवण्यासाठी ते प्रत्येक स्थापित गोष्टीचा अर्थ न जाणता त्यावर टीका करत बसतात.
टीका करण्या आधी सनातन शब्दाचा अर्थ समजून घ्यावा अस मला वाटत !
• सनातन म्हणजे शाश्वत, अबाधित, अखंडणीय, अपरिवर्तनीय म्हणजेच ज्याला अंत नाही, जो चिरकाल टिकणारा आहे !
• धर्माच्या जड व्याख्येत न जाता समान संस्कृती पाळणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे "धर्म" अशी सोपी व्याख्या घेतली तर ती संस्कृती सनातन आहे असे त्या त्या संस्कृतीला मानणारे लोक म्हणत असतात !
• सनातन या शब्दासोबत धर्म हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ नियम किंवा कायदा असा होतो.
• म्हणजेच "सनातन धर्म" या शब्दाचा अर्थ म्हणजे असे शाश्वत नियम जे बदलणे मनुष्याच्या आवाक्यात नाही.
• तसं पाहिल तर कोणत्याही धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आचार, नियम बदलणे किंवा ते न पाळणे मनुष्याच्या आवाक्यात आहे त्यामुळे असा कोणताही धर्म सनातन धर्म म्हणण्यास योग्य नाही.
• पण विज्ञानाने सिद्ध केलेले काही नियम जे की प्रकाशाच्या गतीचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम, इत्यादी नियम हे बदलणे शक्य नाही किंवा माणसाच्या आवाक्याबाहेर आहे म्हणुन त्यालाच सनातन धर्म म्हणता येईल.
याबाबत स्वा. सावरकरांनी केलेली सनातन धर्माची व्याख्या अगदी योग्य आहे -
• प्रत्यक्ष अनुमान आणि त्यांना सर्वस्वी विरुद्ध न जाणारे आप्तवाक्य या प्रमाणांच्या आधारे सिद्ध होऊ शकणारे आणि ज्याविषयी कोणीही यथाशास्त्र प्रयोग केला असता त्या त्या कार्यकारणभावाच्या कसोटीस जे पूर्णपणे केव्हाही उतरू शकतात असे मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात जे जे सृष्टीनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज आलेली आहेत त्यासच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो.
• अर्थात: प्रकाश, उष्णता, गति , गणित, ध्वनि , विद्युत , चुंबक, वैद्यक, यंत्र आणि तत्सम जी प्रयोगक्षम शास्त्रे आहेत त्यांचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होय.
• ते नियम आर्यांसाठी वा अनार्यांसाठी , मुस्लिमांसाठी वा काफरांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते सर्व मनुष्यमात्रास निःपक्षपाती समानतेने लागू आहेत. हाच् खरा सनातन धर्म आहे.
उदाहरणार्थ:
• फ्रिज वस्तूला थंड बनवितो, हीटर गरम करतो, बल्ब प्रकाश देतो, पंखा हवा देतो. परंतु या सर्व उपकरणांना कार्यप्रवण करणारा विद्युतप्रवाह तर एकच असतो.
• या सर्व उपकरणांचे कार्य, उपयोग, किंमत भिन्न आहे, म्हणून एकातून वाहणारा विद्युतप्रवाह दुस-यातून वाहणा-या विद्युत प्रवाहापेक्षा श्रेष्ठ वा नीच आहे असे म्हणण्यात काही अर्थ आहे का?
• ज्याप्रमाणे भिन्न यंत्रांतून प्रवाहित होणारा विद्युतप्रवाह एकच असतो, त्याचप्रमाणे निरनिराळ्या वस्तूंच्या बाह्य नाम-रूपात वैविध्य असूनही सर्वांमध्ये अंतस्थ चैतन्य एकच आहे.
• हे आंतरिक ऐक्य पाहण्याची शक्ती साधना करून प्राप्त केली पाहिजे.
• आपल्या अनुभवसिद्ध ऋषिमुनींनी ते सत्य आपल्या अनुयायांमध्ये संचारित केले. या आत्मदर्शनानेच भारतातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनशैलीचे रूप घडविले आहे. ह्या संस्कारांच्या अनुयायांना हिंदू म्हणतात.
• वस्तुतः हिंदू धर्म हा इतर धर्मांसारखा एक धर्म नाहीये. कारण की धर्माचा सर्वसाधारण अर्थ एखाद्या विशिष्ट व्यक्तीने स्थापन केलेला असे मानले जाते.
• उलटपक्षी सनातन धर्मातील हे सारे संस्कार, अनेक भिन्न मतमतांतरे, भिन्न काळात, भिन्न मार्गांनी, भिन्न दृष्टिकोन असलेल्या अनेक सत्यद्रष्ट्या ऋषींच्या अनुभवांचा समन्वय आहे.
• म्हणून हिंदू धर्म कोणत्याही एका व्यक्तीने स्थापन केलेला नाहीये. तसेच सनातन धर्माचे आधारभूत तत्व कोणत्याही एका धर्मग्रंथापुरते मर्यादित नाहीये. हा धर्म समग्र जीवनदर्शन आहे.
तेव्हां राजकीय पुढाऱ्यांनी नको त्या विषयात बोलण्याचे धाडस करु नये हेच खरे!
दयानंद नेने
(With inputs from the media)
Comments
Post a Comment