निष्पक्षतेचा धागा – राजकीय विश्लेषकाची खरी कसोटी

 *निष्पक्षतेचा धागा – राजकीय विश्लेषकाची खरी कसोटी*



• राजकारणाच्या रणांगणात अनेकदा विश्लेषकांना “आपले” आणि “परके” अशा चौकटीत बसवले जाते. पण खरा राजकीय विश्लेषक ही चौकट फोडतो. त्याचे कर्तव्य असते घटनांचे मूल्यमापन करणे, तथ्यांचे विश्लेषण करणे आणि समाजासमोर वस्तुनिष्ठ चित्र ठेवणे.


• एक राजकीय विश्लेषक आणि लेखक म्हणून माझा ठाम विश्वास असा आहे की विश्लेषण करताना माझी स्वतःची राजकीय मते व विचारसरणी बाजूला ठेवली पाहिजेत. सत्याच्या दृष्टीने पाहिलेल्या घडामोडी लोकांसमोर पारदर्शकपणे मांडणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. 


• त्यामुळे कधी कधी माझ्या निरीक्षणांत एखाद्या पक्षावर टीका होते, तर कधी एखाद्या पक्षाच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठबळ मिळते. पण मी चुका दाखवतो त्या पक्षाने सुधराव्या यासाठीच. 


• हल्ली पक्षांमध्ये केवळ काहीतरी पद मिळावे या हेतूनेच अनेक जण काम करतात आणि नेत्यांची चाटतात. अशा लोकांच्यात नेत्यांना जे ऐकायला आवडते तेच बोलले जाते.


• मुळात मी विद्यार्थी परिषद आणि भाजपा असा प्रवास केला असल्याने माझे अनेक राजकीय मित्र भारतीय जनता पक्षात आहेत. त्यांचा माझ्या वस्तुनिष्ठतेचा अर्थात गैरसमज होतो आणि ते माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे करतात. 


• त्यांना एकच स्पष्ट उत्तर आहे -


*“मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाही आणि प्रचारकही नाही. माझे शब्द फक्त सत्याचे प्रतिनिधित्व करतात. सत्य हे कधी भाजपाला टोचेल, कधी काँग्रेसला, तर कधी इतर कोणालाही. पण माझ्या मांडणीमागे नेहमीच निष्पक्षता, प्रामाणिकपणा आणि धाडस असेल.”*


• लोकशाहीत विश्लेषकाची भूमिका म्हणजे समाजासमोर आरसा धरून दाखवणे. तो आरसा काही वेळा अस्वस्थ करणारा असतो. पण वास्तव दाखवण्याचे धाडस करणाऱ्यांमुळेच राजकारणात खरी चर्चा जिवंत राहते. 


• वस्तुनिष्ठतेचा हा धागा जर सोडला तर विश्लेषण म्हणजे फक्त पक्षभक्ती ठरेल. आणि ते माझे ध्येय कधीच नाही.


-- दयानंद नेने

    25/9/25

Comments