मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं?

 मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? 



संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठीजनांना अभिमान वाटावा, आनंद व्हावा अशी गोष्ट केंद्र सरकारने गेल्या वर्षी केली.

मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण झाली आहे. 

अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले.  मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.


अभिजात दर्जा म्हणजे काय?


मला अनेक जण विचारतात की अभिजात दर्जा म्हणजे नेमके काय? तो मिळाल्यावर काय फायदा होणार किंवा फरक पडणार?


• भाषेला अभिजात दर्जा देणे म्हणजे, त्या भाषेला एक खास आणि प्रतिष्ठित स्थान देणे. याचा अर्थ असा की, त्या भाषेला तिच्या प्राचीनतेसाठी, समृद्ध साहित्यिक परंपरेसाठी, आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी मान्यता दिली जाते. 


अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे फायदे:

• मान्यता:

भाषेला तिच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक योगदानाला मान्यता मिळते.


• अनुदान: 

भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी केंद्र सरकारकडून विशेष अनुदान मिळते. भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते.


• जागतिक स्तरावर ओळख:

भाषेची जागतिक स्तरावर ओळख वाढते.

• सांस्कृतिक वारसा:

भाषेचा सांस्कृतिक वारसा जतन केला जातो.

• संशोधन आणि शिक्षण:

भाषेच्या अभ्यासाला आणि संशोधनाला प्रोत्साहन मिळते. 


अभिजात भाषेसाठी निकष:

• भाषेचा इतिहास 1500-2000 वर्षांपेक्षा जास्त जुना असावा, 

• भाषेत समृद्ध साहित्य परंपरा असावी, 

• भाषेचा मूळ ग्रंथसंपदा असावी, 

• भाषा अखंडितपणे वापरली जात असावी, प्राचीन आणि सध्याच्या भाषेतील नाते स्पष्ट असावे. 

• प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.

•दुसर्‍या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.


•'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.


भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया (2014) आणि आता वरीलप्रमाणे आणखी पाच भाषांना हा दर्जा प्रदान केला आहे.


अभिजात दर्जाने काय बदल होतात?


• एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात? आणि आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिलाय त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत. तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते.


महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत


• मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं


• भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं


• प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं


• महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं


• मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं


मोदी सरकार ने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला. यामुळे मराठी भाषेला तिची प्राचीनता, समृद्ध साहित्य आणि सांस्कृतिक वारसा यासाठी मान्यता मिळाली आहे.


भाषा केवळ अभिजात ठरवल्याने अमर होत नाही, मराठी भाषेला सगळ्यांना मिळून जगवावे लागणार आहे. केवळ प्राथमिक शाळांत नाही तर पदवीपर्यंत मराठीची सक्ती असली तरच मराठी जगणार आहे. त्यासाठी मराठी ही बोली, व्यवहारभाषेसह वाणिज्य, शास्त्र, तंत्रज्ञान, विज्ञान अशी सर्वांगीण ज्ञानभाषा होण्यास हवी. महाराष्ट्रात आपापसात संवादाची भाषा ही मराठीच असली पाहिजे,


एकीकडे मराठी भाषा अभिजात होते तर दुसरीकडे राज्यात हे भाषिक- शैक्षणिक धोरण मराठीच्या मुसक्या आवळीत आहे. खेड्यापाड्यातही दुकानांच्या पाट्या अन्य भाषांत लावल्या जातात. हे बदलायचे असेल तर आपल्या राज्याचे एकात्म धोरण हे मराठी केंद्रित असले पाहिजे. 

केवळ सत्ताकारणासाठी मराठीचे राजकारण करणार्‍या राज्यकर्त्यांकडून याची अंमलबजावणी शक्य नसल्याने सामाजिकतेसाठी संस्थाकारण करणार्‍या धोरणांची महाराष्ट्राला गरज आहे!


- दयानंद नेने 

   9/7/25

Comments