बातमीचं राजकारण: हिंदी आणि मराठी चॅनेल्सची दुटप्पी भूमिका"*

 *"बातमीचं राजकारण: हिंदी आणि मराठी चॅनेल्सची दुटप्पी भूमिका"*

प्रसार माध्यमं सत्य सादर करतात की मनःस्थिती घडवतात – हे ओळखणं आजच्या काळात अत्यावश्यक आहे.






आजच्या माहितीच्या युगात टीव्ही चॅनेल्स हा लोकमत घडवणारा महत्त्वाचा घटक झाला आहे. पण दुर्दैवाने अनेक वेळा ही माध्यमं सत्य सांगण्याऐवजी, आपल्या प्रेक्षकवर्गाच्या भावनांशी खेळणं, भाषेच्या राजकारणात उतरून एकाच घटनेला दोन वेगवेगळ्या पद्धतीने सादर करणं हे पाहायला मिळतं. विशेषतः इंग्रजी, हिंदी आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ही दुटप्पी भूमिका स्पष्टपणे जाणवते.


"दोन चॅनेल, दोन सत्यं?"


बऱ्याच राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांची (News networks) दोन - तीन आवृत्त्या असतात – एक इंग्रजीत, एक हिंदीत, एक मराठीत (किंवा प्रादेशिक भाषेत). पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अशा वेगवेगळ्या चॅनेल्सवर एकाच घटनेचं वार्तांकन अनेकदा परस्परविरोधी असतं.


याचा अर्थ स्पष्ट आहे – हे चॅनेल्स आपली भूमिका आणि मांडणी "आपल्या प्रेक्षक वर्गाच्या" भावनिक आणि भाषिक आकांक्षांनुसार ठरवतात. सत्य हे केंद्रस्थानी ठेवण्याऐवजी, त्याचा वापर "मूड बनवण्यासाठी" केला जातो.


* उदाहरण 1: हिंदी-विरुद्ध-मराठी वादाचा संदर्भ*


• घटना: नुकताच "जय महाराष्ट्र - जय गुजरात" संदर्भात वाद निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांनी गुजरातच्या कार्यक्रमात "जय गुजरात" म्हणल्यामुळे वाद झाला.


* ABP माझा (मराठी): ‘महाराष्ट्राचा अपमान?’, ‘जय महाराष्ट्र ठीक आहे पण जय गुजरात कशासाठी?’ 

' लाचारी - महाराष्ट्राचा अपमान - असा सूर.


* ABP News (हिंदी): ‘राजनीति के बीच जय गुजरात पर बवाल, विपक्ष ने उठाए सवाल’ – येथे शिंदेंचं समर्थन करताना विरोधकांचं राजकारण अधोरेखित.


*निष्कर्ष:* एकाच नेटवर्कची दोन चॅनेल्स – पण दोन वेगवेगळे दृष्टिकोन.


* उदाहरण 2: भाषा आणि शिक्षणावरील वाद (तीन भाषा फॉर्म्युला)


• TV9 मराठी: 'मराठीवर घाला, केंद्राचा नव्या शिक्षण धोरणातून मराठीची कत्तल!'


• TV9 भारतवर्ष (हिंदी): 'नई शिक्षा नीति से राष्ट्र निर्माण – हिंदी को मिलेगा बल!'


येथे स्पष्ट दिसतं की, मराठी चॅनेल भावनिकतेवर आधारित प्रतिक्रिया देतं, तर हिंदी चॅनेल त्याच गोष्टीला राष्ट्रहिताचं रूप देतं.


* उदाहरण 3: ठाकरे बंधूंचं एकत्र येणं 


• NDTV मराठी: 'मराठी स्वाभिमानासाठी ठाकरे पुन्हा एकत्र!'


• NDTV इंडिया (हिंदी):  'शिवसेना का भविष्य बचाने के लिए राज और उद्धव का साथ आना मजबूरी?'


इथे देखील तेच – मराठी भावनिक उभारी, हिंदीमध्ये राजकीय गणितांचा तपास..


का घडतं असं?


1. प्रेक्षकांनुसार अजेंडा ठरतो: चॅनेल्सना माहिती आहे की, कोणत्या भाषेतील प्रेक्षकांना काय भावतं. त्यामुळे बातम्यांपेक्षा भावनांना प्राधान्य दिलं जातं.


2. TRP आणि प्रादेशिक स्पर्धा:  स्थानिक चॅनेल्सना लोकल इमोशनचं भांडवल करावं लागतं, तर राष्ट्रीय चॅनेल्सला 'राष्ट्रीय दृष्टिकोन' दाखवण्याची गरज असते.


3. राजकीय हितसंबंध: काही नेटवर्क्स विशिष्ट राजकीय विचारधारेशी जवळीक ठेवतात. त्यामुळे त्यांचं वार्तांकन पक्षनिष्ठ वाटतं.


परिणाम काय?


• लोकांचा विश्वासघात: प्रेक्षकांमध्ये भ्रम निर्माण होतो की, खरं कोण सांगतो?

• दुभंगलेली जनमत: एकच घटना वेगवेगळ्या अर्थांनी समजली जाते आणि त्यातून सामाजिक तेढ वाढते.

• भाषिक ध्रुवीकरण: हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते.


बातम्यांचा उद्देश माहिती देणं असतो, मत तयार करणं नव्हे. खरी बातमी देऊन मग आपले मत बनवणे दर्शकांवर सोडले पाहिजे.

पण आज टीव्ही चॅनेल्स ही भूमिकाच विसरले आहेत. हिंदी आणि मराठी चॅनेल्सची एकाच नेटवर्कमध्ये दुटप्पी भूमिका म्हणजे लोकांच्या विश्वासावर गदा आणणं आहे.


दर्शक म्हणून आपली जबाबदारी आहे – एकाहून अधिक स्त्रोत वापरावेत, बातमी मागचं सत्य तपासावं आणि भावनांवर नव्हे तर वस्तुनिष्ठतेवर आधारित मत बनवावं.


- दयानंद नेने

  7/7/25

Comments