*मी मराठी..!*
मी मराठी माणूस! मराठी माझी मातृभाषा - माझ्या महाराष्ट्राची राज्य भाषा.
मला मराठीचा खूप अभिमान आहे. मराठी अस्मितेला कोणी ठेच पोचवत असेल तर मला सहन होतं नाही. मी त्याचा "करेक्ट कार्यक्रम" करतो.
"करेक्ट" हा इंग्रजी शब्द वापरल्या बद्दल मला माफ करा - अरे "सॉरी"- माफ ही मुळचा फारसी शब्द, मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हो सॉरी हा इंग्लिश शब्द - पुन्हा दिलगिरी!
मला मराठीचा अभिमान आहे कारण मराठी भाषा सर्व समावेशक आहे. काळानुरूप ती स्वतः ला बदलते.
आपण शाळेपासून सुरुवात करूया :
• हल्ली मुलं शाळेत नाही तर स्कुल मध्ये जातात.
• मुलांना स्कुल मध्ये "मधली सुटी" नसते, "ब्रेक" असतो किंवा "रिसेस" असते.
• "कवायत" (सॉरी हा फारसी शब्द ) नसते, "पिटी" असते.
• "पाढे" नसतात, "टेबल्स" असतात.
• "शाळेचा डबा" नसतो, "टिफीन किंवा लंचबॉक्स" असतो.
• "निकालाचा दिवस" नसतो, "ओपन डे" असतो.
• "पालकसभा" नसते, "पीटीए" असते.
• वर्गात "बाई" शिकवत नाहीत, "टीचर किंवा मिस" शिकवतात.
• "पाठ्यपुस्तक" नसतं, "टेक्स्ट" असतं.
• "गृहपाठ" नसतो, "होमवर्क" असतो.
•"शिकवणी" नसते, "कोचिंग क्लास किंवा ट्युशन" असते.
• शाळेत "असेम्ब्ली" असते, त्यात "प्रेअर" असते.
• इतकंच काय, मुलं खेळायला जात नाहीत, ग्राउंड वर जातात. त्यांना "कंटाळा" येत नाही, त्यांना "बोअर" होतं.
• "भेळवाल्याचा" "चाट वाला" झालाय.
• "मधल्या वेळचं खाणं" नसतं, त्याला "टी टाईम स्नॅक्स" म्हणतात.
• "शेंगदाण्याची चिक्की" नसते, तिला "न्यूट्री बार" म्हणतात.
• "धिरडं" म्हणायचं नाही, त्याला "चिला" म्हणायचं.
• "फोडणी" म्हणायचं नाही, "तडका" म्हणायचं.
• "गोंदवण" म्हणायचं नाही, "टॅटू" म्हणायचं.
मी मराठी. मला माझ्या भाषेचा अभिमान आहे म्हणून :
• सर्दी-पडसं झाल्यावर मी "वाफ" घेत नाही, "स्टीम" घेतो.
• हॉटेलात गेल्यावर "थंड पाणी" मागत नाही, "चिल्ड वॉटर" मागतो.
• "मेन्यू कार्ड" मागत नाही - आ ला कार्ट लागते,
• दोघांना "सूप वन बाय टू" मागवतो,
• "भाजी" ऐवजी "सब्जी" मागतो,
• "भाकरी" ऐवजी, "जोवार रोटी" आणि शेवटी "फिंगर बाऊल".
• मी आता"खरेदी"ला जात नाही "शॉपिंग" ला जातो.
• "वाण्याचं दुकान" नाही, "सुपर मार्केट"मध्ये जातो.
• "इस्त्रीवाला" किती डाऊन मार्केट आहे- त्याला मी "लॉन्ड्रीवाला" म्हणतो.
• "औषधाचं दुकानाला" मी "मेडिकल स्टोअर" म्हणतो.
• "कपड्यांचं दुकान" टिपिकल मीडिल क्लास वाटतं -"शोरुम" कसं बरं वाटतं.
• गणपतीची वर्गणी नसते, डोनेशन असतं. गणपतीचे फेस्टीव्हल असते.
• "साखरपुडा" नसतो, "रिंग सेरेमनी" असते. "प्री वेडिंग शूट" असतं.
• जेवणात "पंगत" नसते, "बुफे" असतो.
• मराठमोळा बेत नसतो पंजाबी पॅकेज लागते.
• "दहीभात" नसतो, "कर्ड राईस" असतो. "जीरा राईस - दाल तडका" असतो.
• "भजी" नसतात, "पकोडे" असतात.
• व्हेज 65, बैंगन भरता, व्हेज अद्रकी, व्हेज मराठा, व्हेज दिलबहार, व्हेज मायरा, पनीर लबाबदार असली नावं असतात.
• मराठी लग्नात मराठी गोड पदार्थ नसतातच, बंगाली स्वीट असतं.
• "शेवपुरी दहीपुरी" च नामांतर SPDP - "एस्पीडिपी" असं झालं आहे.
• पाणीपुरी खाल्ल्यावर लोक 'सुखी पुरी' मागतात. मराठी पाणीपुरी वाल्याला सुद्धा "थोडा प्याज देना और तिखा पुरी बनाना भैय्या" असं म्हणतात.
• प्रसार माध्यमं आणि रेडिओ चॅनेल नी तर शुद्ध मराठी ची परिभाषाच बदलली आहे.
• 'तो व्यक्ती, तो पेन, ती बुक' हे ऐकायला कसं हॅपॅनिंग वाटते.
• "मिळालं, सापडलं आणि भेटलं" यांच्या वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
• मला पत्ता भेटला, मोबाईल भेटला, मार्क भेटले, जागा भेटली, तिकीट भेटलं, मार्कलिस्ट भेटली, निकाल भेटला, जेवण भेटलं, पाणी भेटलं, नाश्ता भेटला, कपडे भेटले, पार्सल भेटलं, कुरिअर भेटलं... औषध भेटतं, कॅब भेटते, ऍडमिशन भेटते.. पासवर्ड भेटतो, पैसे भेटतात, कर्ज भेटतं..
• मी माझे मराठीपण टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
• गुढीपाडव्याच्या दिवशी जेवणात बटाट्याची उकडलेली भाजी नाही तर पनीर असते?
• लग्नात सुद्धा नवरदेव मराठी पोशाख करत नाही. शेरवानी, जोधपुरीची चलती..
• आता लग्नात पाठवणी होत नाही, बिदाई होते.
• महाराष्ट्रातल्या शाळेत आता हरतालिका, भोंडला, श्रावण शुक्रवार, पिठोरी अमावस्येचा मातृदिन होत नाही. पण ख्रिसमस होतो. गणपतीला पाच दिवस सुट्टी मिळत नाही, पण ख्रिसमसला पाच दिवस सुट्टी मिळते.
• आपण कोणाला भेटलो की 'राम राम' म्हणण्या ऐवजी 'काय जेवला का' विचारतो.
• जरा आपल्या आजूबाजूला पहा - मराठी सिनेमे, मराठी जाहिराती, मराठी मालिका - सगळीकडं मराठीचा लोपच दिसेल.
• कारण "मी" नावाचा मराठी माणूस आज आपल्या महाराष्ट्रात कसा राहतो, बोलतो, वागतो ते वर दिले आहे. विचार करा, कोणता गुजराती, मारवाडी, भोजपुरी, जाट, पंजाबी, हरियान्वी, तामिळ, तुलू, मल्ल्याळी भाषिक माणूस आपल्या भाषेची एवढी बँड वाजवतो जेवढा मी मराठी माणूस?
• "वरण भात लोनच्या अन् कोण नाही कोनच्या" असला मराठी चित्रपट करणाऱ्या महेश मांजरेकर ला मराठी भाषा, मराठी संस्कृती याविषयी एक शब्द तरी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? हे आपले रोल- मॉडेल?
• मित्रांनो, या लेखातील विडंबन सोडा आणि विचार करा की आपण सर्व किती भोंदू आहोत. अगदी नेत्यांपासून सर्वजण!
• आपल्याला कळले सुद्धा नाही की इतक्या वर्षात आपल्या माय मराठीची आपण "भेळ" बनवून टाकली आहे. भेळेत ज्याप्रमाणे कुरमुरे, कांदा बटाटा टोमॅटो सोबत आता फरसाण, बारीक शेव, कैरी, शेंगदाणे चणे आणि डाळिंब घालतात - अगदी त्याचप्रमाणे माय मराठीत आता फारसी, अरबी, गुजराती, कन्नड, पोर्तुगीज, इंग्रजी - सर्व भाषांची भेळ झाली आहे.
• मूळ मराठी भाषा कोठेतरी हरवून गेली आहे. आणि आपल्या भाषेचे शुद्धीकरण करू इच्छिणाऱ्या सावरकर यांना सुद्धा आपण विसरलो. वी हॅव जस्ट फरगॉट्टन हीम!
• आपण काय करतो? तोंडाने मराठी मराठी करायचे - कोणी चाव्या मारल्या की अमराठी भाषिकांना जाऊन धोपटायचे - झुंडीने जाऊन गरीब बिचाऱ्या एकट्या डुकत्यांना हाणायचे, मराठी येत नाही म्हणून मराठी माणसांची माफी मागा म्हणून प्रेशर टाकायचे. आपल्याला वाटते आपण मोठी मर्दानगी दाखवतो - मराठी अस्मिता राखतो.
• अशी? याने काय साध्य होते?
• कर्माची फळे इथेच भोगावी लागतात असे म्हणतात.
• आता मला समजले आहे की जर मराठी टिकवायची असेल, जोपासायची असेल, समृद्ध करायची असेल तर, मराठीतून विचार करायला शिकवलं पाहिजे. मराठी वाचन वाढवलं पाहिजे. एकमेकांशी मराठीत बोललं पाहिजे.
अभ्यासक्रमात हिंदी असो, इंग्रजी असो किंवा अन्य भाषा असो, जर आपण विचार मराठीत करायला लागलो, तर कितीही पुस्तकी शिकवलं तरी कुठलीच भाषा आपल्या मराठी मातृभाषेची जागा घेऊ शकणार नाही - काही वाकड करणार नाही.
गरज आहे हे सर्वांना उमजण्याचे!
(मयुरेश डंके यांच्या लेखापासून प्रेरणा घेऊन स्वैर रूपांतर केले आहे )
- दयानंद नेने
10/7/25
Comments
Post a Comment