मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेला लाथ मारली - राज ठाकरेंच अर्ध सत्य.

 *मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेला लाथ मारली - राज ठाकरेंच अर्ध सत्य.



केवळ मराठी भाषिक नाहीत म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ साली जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायला नकार दिला होता असा उल्लेख राज ठाकरे यांनी परवाच्या वरळीतील मराठी विजयसो्हाळ्यात केला.


यावेळी ते म्हणाले की, १९९९साली प्रकाश जावडेकर या भाजपच्या नेत्यांनी येऊन आपल्याला सांगितले की, आपले सरकार येते आहे. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री केल्यास ते पुरेसे आमदार खेचून आणणार आहेत. त्यावेळी हा निरोप घेऊन राज ठाकरे बाळासाहेबांकडे गेले. बाळासाहेब झोपले होते. यावेळी त्यांना राज यांनी उठवण्याचा प्रयत्न केला आणि भाजपचा निरोप कळवला. उठताच क्षणी बाळासाहेब ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र्राचा मुख्यमंत्री मराठी माणूसच होईल इतर कोणीही होणार नाही.


अर्ध सत्य


राज ठाकरे यांनी मराठी विजय सभेत भाषण होतं म्हणून बाळासाहेबांनी कसं भाषे साठी सत्तेला लाथ मारली हे बिंबवण्यासाठी हे उदाहरण दिले परंतू ते अर्धसत्य आहे.


1999 साली सुरेशदादा जैन हे मुख्यमंत्री का होऊ शकले नाहीत किंबहुना शिवसेना भाजपा युती च्या हातून सत्ता का गेली हे जाणून घेण्यासाठी थोडा इतिहास पडतंळायला हवा.


1999 मध्ये काय घडले होते?


ऑक्टोबर 1999 रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या 161 पैकी 69 उमेदवारांचा, भाजपाच्या 117 पैकी 56 उमेदवारांचा विजय झाला होता. काँग्रेसला 75 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 58 जागा मिळाल्या होत्या.


लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने युतीचा आकडा 136वर गेला होता. मात्र तरीही बहुमतासाठी 9 जागा कमी पडत होत्या.


या निवडणुकीच्या आधी 5 वर्षे युतीची सत्ता होती आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. (त्यावेळी ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र दोघांमध्ये ठरले होते).


1999 मध्ये आता मुख्यमंत्री पद भाजपा ला पर्यायाने आपल्याला मिळावे अशी गोपीनाथ मुंडे यांची खूप इच्छा होती. कारगिल युद्धाच्या पारश्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत आपले आमदार जास्त्त निवडून येतील हा भाजपा चा आत्मविश्वास होता.


पण झाले उलटेच . त्यामुळे निकालानंतर भाजपा एकदम थंड झाला होता. जे आमदार कमी पडतात त्याचे नारायण राणे बघतील असा पवित्रा त्यांनी घेतला. नाहीतर मुख्यमंत्री मुंडे ना करा.


निकाल लागून बरेच दिवस लोटले तर कोणतीच बाजू सत्ता स्थापन करण्यासाठी पुढे येईना. शेवटी त्यावेळचे राज्यपाल पी सी अलेकझंदर यांनी राष्ट्रपती राजवट लावावी लागेल असा डट्ट्या दिला.


त्यानंतर चक्र फिरू लागली. त्यावेळी शिवसेना खासदार मुकेश पटेल यांनी सर्वप्रथम सुरेशदादा जैन यांचे नाव पुढे आणले. युतीला कमी पडणारे आमदार जैन मॅनेज करतील पण बदल्यात त्यांना मुख्यमंत्री करा असे त्यांनी सूचित केले. बाळासाहेबांनी प्रमोद (महाजन )ची हरकत नसेल तर प्रयत्न करा असे सांगितले असे त्यावेळी चर्चेत सामील सूत्र सांगतात. (कारण मुंडे ना मुख्यमंत्री व्हायचे होते.)


महाजनांचा होकार आल्यानंतर पुढली चक्र फिरली पण तो पर्यंत उशीर झाला होता. अपक्ष आमदार आपल्या कमिटमेन्ट करून चुकले होते.

नुकताच आपला राष्ट्रवादी हा नवा पक्ष काढलेले शरद पवार हे काँग्रेस सोबत जाणार नाहीत असा बाळासाहेब आणि महाजन यांना विश्वास होता - पण तसे घडले नाही.


शिवसेना आणि भाजप यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या 133 होती. काही अपक्ष आमदारांच्या मदतीने काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं.

(त्यातले बरेच अपक्ष हे नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले असते तर युतीकडे आले असते )


ही आहे नाण्याची दुसरी बाजू. अर्धसत्याचा दुसरा भाग.


- दयानंद नेने 

  7/7/25

Comments