भाषा ही सेतू असते, भिंत नाही - मराठी भाषेवर अन्य भाषांचा प्रभाव
- दयानंद नेने
भाषा म्हणजे केवळ संवादाचे साधन नाही, ती एक संस्कृती, विचारांची अभिव्यक्ती आणि माणुसकीची नाळ असते.
प्रत्येक भाषा ही इतर भाषांपासून काही ना काही घेतेच – शब्द, ध्वनी, व्याकरणाच्या पद्धती, सांस्कृतिक संदर्भ. त्यामुळे कोणतीही भाषा पूर्णपणे स्वतंत्र नसते.
उदाहरणार्थ, मराठीमध्ये संस्कृत, फारसी, उर्दू, इंग्रजी, कन्नड, तेलुगू अशा अनेक भाषांचे अंश आहेत.
इंग्रजी भाषेचंच बघा – ती लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, जर्मन अशा असंख्य भाषांच्या प्रभावाखाली घडलेली आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते – भाषा ही एकमेकांवर अवलंबून असते, जशी नद्या समुद्राला मिळतात तशी.
म्हणूनच कोणत्याही भाषेचा तिरस्कार करणे म्हणजे आपल्या भाषेच्या मूळ स्रोतांचा अपमान करणे होय. भाषांमध्ये स्पर्धा नाही, संवाद असतो. आपल्याला अभिमान आपल्या मातृभाषेचा नक्की असावा, पण तो दुसऱ्या भाषेचा अपमान करून सिद्ध करायचा नसतो.
भाषा ही सेतू आहे, भिंत नाही.
सध्या मराठी भाषेला "अभिजात दर्जा " प्राप्त झाला हे आपण अभिमानाने बोलत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की दर्जा हा शब्द मुळचा मराठी शब्द नाही?
दर्जा" हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे.
"दर्जा" हा शब्द पर्शियन (फारसी) भाषेतील "दरजह" (درجه) या शब्दावरून मराठीत आला आहे. त्याचा अर्थ "पातळी", "स्थान", "श्रेणी" किंवा "दर्जा" असा होतो.
अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे मराठीत अनेक फारसी शब्द आले आहेत, आणि "दर्जा" हा त्यापैकीच एक आहे.
फारसी प्रभाव का?
फारसी ही सध्याच्या इराण व पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा आहे. सुमारे इ.स. १२९६ मध्ये फारसी ही भाषा त्याकाळच्या दिल्लीच्या शासनासोबत (अल्लाउद्दीन खिलजी) महाराष्ट्रात आली.
त्यानंतर शासन कारभारात, बहामनी राज्यकर्त्यांमुळे फारसी भाषेचा वापर वाढला. फारसी भाषा सुमारे ३९१ वर्षे महाराष्ट्रात होती. त्यामुळे मराठी भाषेवर त्याचा प्रभाव पडला.
फारसीचा मराठी भाषेवरील परिणाम कमी व्हावा म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर, राज्यव्यवहार कोश तयार करण्यास सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषा शुद्धीकरणासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मराठी भाषेला काही नवीन शब्द दिले, पण जुने फारसी प्रचलित शब्द तितक्याच जोमाने, पण जराशा वेगळ्या अर्थाने कायम टिकून राहिले.
मराठीत अरबी आणि फारसी शब्द किती आहेत?
मराठीमधे जसे तत्सम आणि तद्भव शब्द आहेत, तसेच परभाषेमधून आलेले हजारो शब्द आहेत. त्यांचा वापर आपण बेमालूम (हा शब्द उर्दूतील) पणे करत असतो. अगदी गुजराती, कन्नड, तमिळ शब्दसुद्धा आपण लीलया वापरतो. मला वाटतं संस्कृतीची देवाणघेवाण आणि राजकारण्यांचा ( जुने राज्यकर्ते) प्रभावही भाषेवर पडतो.
मराठीमध्ये कोणते शब्द मूळ फारसी किंवा अन्य भाषांमधून आलेले आहेत?
भारतातील मुघल सत्ता काळात फारसी/फारशी ही अधिकृत भाषा होती. राज्यकारभार विषयक व्यवहारासाठी फारशी भाषेचा वापर होऊ लागल्यामुळे फारशी आणि मराठी भाषेचा संबंध येत गेला. जवळजवळ आठशे वर्षांचा हा संबंध असल्यामुळे मूळ फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत आलेत आणि चांगलेच रुळलेत.
त्याचप्रमाणे इतर भाषांमधील (परभाषीय) कितीतरी मूळ शब्द देखील आजही मराठीत बेमालूमपणे वापरले जातात.
असे शब्द मराठीत येऊन सामान्य संवाद आणि लिखाणात चांगलेच रुजले आहेत आणि ते सर्रास वापरले जाऊन रोजच्या वापरात सामान्य झाले आहेत.
मूळ फारशी भाषेतून मराठीत आलेले शब्द
सतरंजी, पेशवा, रवानगी, अत्तर, कामगार, मोहोर, लष्कर, फडणवीस, सामना, लेजीम, बगीचा, गुन्हेगार, खानेसुमारी, रसद, शाई, अबकारी, कारभार, शाहीर, हजार, सरकार, चाबूक, शौकीन, वजन, हप्ता, महिना, खबरदार, शिरस्ता, खातरजमा, दिलासा, नजराणा, दौलतजादा, नेस्तनाबूत वगैरे.
मूळ अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द
अर्ज, इनाम, मंजूर, दौलत, बातमी, हुकूम, साहेब, खर्च, मेहनत, जाहीर, कलम, नक्कल, सरबत, फाजील, जबाब, उर्फ, उस्ताद, पैज, शान, जाहीरनामा, मजबूत, साफ, शहर, संदुक, नजर, नजाकत, तैनात, तालुका, तालीम, महाल, मदत, तफावत, जकात, वायदा, बदल, करार वगैरे
मूळ पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द
बटाटा, तंबाखू, कोबी, पगार, इस्त्री, हापूस, फणस, पायरी, साबुदाणा, पेरू, अननस, बिस्कीट, पुरावा, चावी, तुरुंग, पाव, जुगार, पसारा, टिकाव, लवाद, वरांडा, साबण, परात, तिजोरी, काडतूस, बटवा, फीत, शिरपेच, पलटण, पिस्तुल, पाव, कमांडर, लिलाव, नाताळ, बिजागिरी, बादली, टोपी वगैरे.
मूळ इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले शब्द
डॉक्टर, नर्स, पार्सल, पेन, सायकल, स्टेशन, सिनेमा, ऑफिस, टेलिफोन, मोटर, ग्लास, सर, मॅडम, टीचर, नंबर, पँट, बटन, ड्रेस, तिकीट, पोस्ट, पेशंट, बॅट, बॉल, फाईल, पास, ब्रेक, एजंट, बस, रेल्वे, ट्रेन, टिव्ही, रेडिओ, टेबल वगैरे.
मूळ गुजराती भाषेतून मराठीत आलेले शब्द
दलाल, दादर, सदरा, डबा, भिशी, मावा, ढोकळा, रिकामटेकडा, जेमतेम, खादी, गरबा, दांडिया, चरखा, मथळा, लागवड, इजा, पथारी, आवकजावक, मलमपट्टी, दामदुप्पट, शेट, अफरातफर, झंझट वगैरे
मूळ कानडी भाषेतून मराठीत आलेले शब्द
आक्का, अण्णा, ताई, आत्या, चेंडू, खोबरे, लवंग, गाजर, भाकरी, अडकीत्ता, खलबत्ता, मडके, तूप, किल्ली, आंबील, शिकेकाई, विळी, पेटी, परडी, पगडी, शिंपी, चाकरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंच, खोली, कोथिंबीर, मिरवणूक, छटाक, चड्डी, चिरगुट वगैरे.
सध्या आपल्या राज्यात उगाचच मराठी वि. हिंदी वाद उफाळून आणला आहे. वास्तविकपणे आपण जर इतिहास तपासला तर आपल्याला कळते की गेल्या शेकडो वर्षात ( तुम्ही ज्या चष्म्यातून बघता त्याप्रमाणे) मराठी भाषेचा भरपूर अपभ्रन्श झाला आहे किंवा मराठी भाषेने इतर भाषांतील कित्येक शब्द लिलाया सामावून घेतले आहेत.
मराठी ही आपली मायबोली आहे - तिचा अभिमान बाळगलाच पाहिजे पण दुसऱ्या भाषेचा द्वेष करून नाही.
आपली मातृभाषा जतन करणं, तिचा विकास हेच आपलं ध्येय असायला हवं! हे सर्व जमेल ते अन्य भाषांचा आदर करून नि स्वभाषेवर प्रेम करूनच..
- दयानंद नेने
9/7/25
Comments
Post a Comment