कृपया, प्लीज देवा भाऊंवर टीका करू नका 🙏

 


कृपया, प्लीज देवा भाऊंवर टीका करू नका 🙏

मित्रहो,

आज मी देवाभाऊंची वकिली करणार आहे.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे ब्रीद वाक्य देशाला कोणी दिले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी.

बरे, त्यात काही चुकीचे आहे का?

नाही.

भारतासारखा मोठा देश यशस्वीपणे चालवायचा असेल तर देशात लोकांमध्ये दुफळी माजवून तर काम करता येणार नाही ? सर्वांना सोबत घेऊनच चालले पाहिजे.


मग महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस काय वेगळे करत आहेत?


ते पण सर्वांना एकत्र घेऊन - सबका साथ सबका विकास करत आहेत.


जरा 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते कसे ते आठवा.

सर्व पक्ष ती निवडणूक वेगवेगळे लढले होते. 4 भागात मतदान विभाजीत झाले आणि भाजपा 123 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष झाला.

पण बहुमताला 22 जागा कमीच होत्या.


राष्ट्रवादी ने संधी साधली. मोठ्या मनाने महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी देवाभाऊंना बिनशर्त पाठिंबा दिला.


पण देवाभाऊंना त्यावेळी त्यांनी ABP माझा कट्ट्यावर केलेली सिंहगर्जना आठवली. 

"आयुष्यभर अविवाहित राहिलो तरी चालेल पण राष्ट्रवादी शी विवाह करणार नाही ". 

त्यांनी राष्ट्रवादी ची ऑफर नाकारली आणि 25 वर्षे लिव्ह - इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या पण निवडणुकीआधी फारकत घेतलेल्या शिवसेनेची मनधरणी केली.

5 वर्षे कधी रुसवे तर कधी फुगवे करत सरकार चालले.


2019 चा कडू अनुभव


2019 मध्ये भाजपा कार्यकर्ते आपण वेगळे लढू म्हणून मागे लागले होते पण देवाभाऊंनी मोदी जींचे ब्रीद वाक्य त्यांच्यापुढे ठेवले - सबका साथ सबका विकास आणि शिवसेने सोबत युती केली.

पण निवडणुकीच्या निकालाने गोंधळ केला.


भाजपा ला सोडले आणि काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत गेलो तर आपल्या तिघांचा सबका साथ सबका विकास तर होईलच आणि आपल्याला बाळासाहेबांना दिलेले - मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन - हे वचन पूर्ण करता येईल हे उद्धव ठाकरे नी ताडले आणि त्यांनी उडी मारली, महाविकास आघाडी स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.


उद्धव ची ही चाल देवाभाऊंच्या वर्मी लागली. त्यांनी "मै समंदर हू, लौट के जरूर आऊन्गा " अशी घोषणा केली आणि कामाला लागले.


आपल्या 5 वर्षांच्या काळात देवाभाऊंना लक्षात आले होते की महाराष्ट्रात भाजपा ला स्वबळावर सत्ता आणणे कठीण आहे. 

हाताची 5 बोटं सारखी असत नाहीत त्याप्रमाणे इथे विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई - कोकण. पाच विभागाच्या पाच तऱ्हा.


मग देवाभाऊंना मोदींचे ब्रीदवाक्य पुन्हा आठवले. आत्ता तर मोदींनी ते विस्तारले होते - सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास!


महाराष्ट्र काबीज कसा करायचा?


महाराष्ट्र पुन्हा काबीज करायचा असेल तर या वरच्या गुरुमंत्रा प्रमाणेच काम करणे अपरिहार्य आहे याची जाणीव झाल्यावर देवाभाऊ जोमाने कार्यरत झाले.


सर्व विभागातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी जाळे टाकण्यात आले. खान्देशात विखे पाटील गळाला लागले. इतरत्र हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, राणा जगतजीत सिंह, गोपीचंद पडळकर, रवी राणा - नवनीत राणा, प्रसाद लाड, धनंजय महाडिक, नारायण राणे कुटुंब, कृपाशंकर सिंह, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, सुरेश धस असे एकामागून एक विरोधी पक्षातले मोठे नाते 'सबका साथ' म्हणत भाजपा वासी झाले.


आणि हे सत्र केवळ मोठ्या नेत्यांपुरते थांबले नाही तर अखंड महाराष्ट्रात नगरसेवक, ग्राम पंचायत ते पार जिल्हा पदाधिकाऱ्यांपर्यंत राबवले गेले.


अहो पक्ष वाढवणे, क्रमांक एक चा करणे काही खायचं काम नाही.. 🤔


मात्र सत्ता काबीज करण्यासाठी सबका विकास आणि सबका प्रयास लागणार होता.

मग देवाभाऊंनी आपला मास्टरस्ट्रोक खेळला. त्यांनी प्रथम शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडली.


भाजपा ने सबका विकास तत्वानुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद तर अजितदादा यांना उपमुख्यमंत्रिपद बहाल केले. अजितदादा सोबत आलेल्या त्यांच्या 9 सहकार्यांना डायरेक्ट मंत्रिपद.


देवाभाऊंनी या सर्वांना सोबत घेतले म्हणून मोठा काहूर माजला. भ्रष्टाचारी लोकांना सोबत का घेतले? 

ज्यांच्यावर आरोप केले त्यांना पक्षात घेतले, 

भाजपा वॉशिंग मशीन आहे, 

जेल मध्ये टाकणार होते त्यांना थेट उप मुख्यमंत्री पद? ED आणि CBI चा धाक आणि पैशाचे आमिष या जोरावर पक्ष फोडले? विरोधी पक्ष हतबलतेने रोज ओरडत होते.


जे काँग्रेस राष्ट्रवादी ने केले तेच..


मूर्ख लोकं. ते विसरतात की आधीच्या काँग्रेस सरकारांनी, शरद पवारांनी जे केले होते तेच आता आमचे देवाभाऊ करत आहेत.

केवळ आरोप झाले म्हणजे माणूस गुन्हेगार होत नाही - ते सिद्ध व्हावे लागतात असे काँग्रेस, राष्ट्रवादी वालेच बोंबलायचे ना? 

आता भाजपा ही तेच म्हणतेय. नारायण राणे, अशोक चव्हाण, कृपाशंकर सिंह, प्रवीण दरेकर, अजितदादा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा काल परवाच आलेले बडगुजर - या सर्वांवर निव्वळ आरोप आहेत - सिद्ध एकही झालेला नाही. मग त्यांना गुन्हेगार का म्हणायचे.

बडगुजर तर संजय राऊत यांच्यापेक्षा कमी काळ जेल मध्ये होते - मग मोठा गुन्हेगार कोणाला म्हणावे?

शिवाय आपले संविधान सांगते की शंभर दोषी सुटले तरी चालतील पण एका निरापराध माणसाला शिक्षा होता कामा नये!


आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे देवाभाऊंमुळे वरील सर्व मंडळींनी हिंदुत्व विचारसरणीवर आपला विश्वास व्यक्त केला आहे. 

आहे की नाही सबका विश्वास?


हे सर्व राजकारण करताना आमचे देवाभाऊ राज्यातील आपल्या लाडक्या भगिनींना विसरले नव्हते.

सबका विकास सूत्रनुसार त्यांनी लाडक्या बहीणींना दर माह 1500/- द्यायला सुरुवात केली.

आहे की नाही चाणक्य नीती? 


यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडात झाला पण लाडक्या बहिणींनी महायुती सरकार ला न भूतो ना भविष्यती असे यश मिळवून दिले.

याला म्हणतात सबका विश्वास सबका विकास!

राहिली तिजोरीची बिकट परिस्थिती - तर बचेंगे तो और लढेंगे नात्याने आता आहेत पाच वर्षं - करू काहीतरी..


जुने कार्यकर्ते 


एक आणखी टीका लोकं उगाचच देवाभाऊंवर करत असतात. म्हणे जुन्या कार्यकर्त्यांवर देवाभाऊ आणि भाजपा अन्याय करत आहेत.

याचे सुद्धा खंडण करणे आवश्यक आहे.


ही ओरड प्रथम 2015 मध्ये सुरु झाली. जे त्यावेळेस ओरडत होते तेच आज ही ओरडत आहेत. त्यांच्यात कोणी नवे सामील झालेले नाहीत.


हे सर्व ओरडणारे जुने कार्यकर्ते साधारण अटलजी असता किंवा 2009 लोकसभा निवडणूकी पर्यंत जोमाने कामात होते. त्यानंतर वयानुरूप किंवा त्यावेळच्या परिस्थितीत ते कामातून कमी होत गेले.


या गोष्टीला आता 15 वर्षे झाली - म्हणजे ते वयानी 15 वर्षे मोठे झाले असणार.


राजकारणात 5 वर्षे हा खूप मोठा काळ असतो. दहा वर्षांपूर्वी जे पक्षात नवे होते ते आज जुने झाले आहेत.


जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा पाया रचला - उपमा द्यायची तर मी म्हणतो अगदी चार मजली इमारत बांधली.

पण आजचा जमाना स्काय स्क्रॅपर चा आहे. अशा इमारतींना लिफ्ट लागते. ती बसवणे जुन्यांना जमणार का - तर नाही.

त्यासाठी नवीन तंत्रज्ञान (धोरण ), नवी माणसे लागणार.

आणि जर ती तुमच्या पक्षात नसतील आणि दुसरीकडे उपलब्ध असतील तर त्यांना घेण्यात काय चुकले?

Its horses for courses.


आठवा, अशीच ओरड 2014 मध्ये आडवाणी यांच्याबद्दल उठवली होती. 

आडवाणी हे निश्चित भाजपा चे उत्तुंग नेते होते पण 2014 मध्ये ते 85 वर्षांचे झाले होते हे लोकं विसरतात.


जुन्या कार्यकर्त्यांनी आता समजले पाहिजे की त्यांच्या काळ आणि वेळ आता सरला आहे. आजच्या राजकारणात पैसा बोलतो - सर्व ठरवतो.

तसा पैसा तुमच्याकडे नसेल तर निमूटपणे बाजूला व्हा.


पैसा महत्वाचा


आज राजकारणात लागणारा पैसा देवाभाऊ आणू शकतात, एकनाथ शिंदे आणू शकतात, अजितदादा, आणू शकतात - या तिघांचे जवळचे सहकारी आणू शकतात. मग त्यांचे चालते!


आजचे राजकारण पूर्ण बदलले आहे. हमाम मे सारे नंगे है..


भाजपा हा दीर्घ काळ टिकणारा पक्ष आहे. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याचे एकच लक्ष आहे - देशभरात सर्वत्र भाजपाचे सरकार असावे.

1980 साली जेव्हा वाजपेयी यांनी " कमल खिलेगा " म्हटले किंवा 1998 मध्ये उदविग्नपणे ते लोकसभेत काँग्रेस ला " एक दिन देशभर मे भाजपा की सरकार होगी " असे सुनावले तेव्हाही हेच लक्ष त्यांच्या आणि भाजपा समोर होते.

आज मोदी शाह फडणवीस यांच्यापुढे ही तेच लक्ष्य आहे.

बाकी युत्या करणे, पक्ष फोडणे, नव्या लोकांना पक्षात घेणे, विरोधी पक्षांना कमकुवत करणे - हा सर्व लक्ष प्राप्तीचा प्रोसेस आहे.


फडणवीस जे राजकारण खेळत आहेत त्याचे कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्याकडे वेळ आहे.

अजून 10 वर्षांनी भाजपा आजच्या एवढाच किंवा जास्त प्रबळ असेल.

विरोधी पक्षांचे तसे नाही. त्यांच्याकडे नेत्यांची दुसरी फळीच नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा - अगदी एकनाथ शिंदे आणि अजितदादा कडे सुद्धा नाहीये.


देवाभाऊ त्या उद्याचा गेम खेळत आहेत त्यामुळे त्यांच्यावर टीका करू नका 🙏


- दयानंद नेने

19/6/25

Comments