पार्थसारथी पुन्हा एकवार ये?
पार्थसारथी पुन्हा एकवार ये?
काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली अमुक एक व्यक्तीने आयआयटी मधून डिग्री घेतल्यानंतर, संन्यास घेतला आणि "हरे राम हरे कृष्ण" म्हणत इस्कॉन संस्थेत सामील झाला.
साधारण तीन वर्षांपूर्वी माझ्याकडे इस्कॉनशी संबंधित दोन संन्यासी डॉक्टर भगव्या कपड्यात माझ्याकडे आले. माझ्यासोबत त्यांनी दिवसभर विविध विषयांवर चर्चा केली, त्यांना मी विचारले आपण केईएम सारख्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलेले असताना, सर्व संग परित्याग करत, संन्यास घेऊन, इस्कॉन संस्थेच्या सानिध्यात जाण्याचे कारण काय? अर्थात, उत्तरादाखल, जगातील अनेक व्याधी आमच्यासारख्या संतांच्या सोबत राहिल्याने आपोआप मिटतील, हे पण आमचं एक वैद्यकीय कार्यच आहे, असे म्हणत माझ्या नेमक्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.
नेहमीच अशा बातम्या वाचण्यात येतात; उच्च शिक्षित ( आयआयटी, आयआयएम) माणसाने, दीक्षा घेवून,अमुक एक धार्मिक संप्रदायाशी जवळीक करून घरदार, व्यवसाय,करोडो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडून दिले आहे. असे विचार उच्च शिक्षित मुली घेताना दिसत नाहीत. या महान संस्थेतून शिक्षण घेवून मुली साध्वी बनल्या, असे कधी आढळत नाही. एकूणच मुली या बाबतीत जास्त परिपक्व दिसतात.....
याच विचारांशी मिळता जुळता विचार आपल्यासमोर मांडत आहे. गोष्ट जुनी तसेच सर्वांना परिचित अशीच आहे, संदर्भासाठी तिचा सारांश इथे मांडत आहे. कथेचा निष्कर्ष वाचकांनी आपापल्या परीने काढायचा आहे.
एकदा रतन टाटा जर्मनीमध्ये एका हॉटेलमध्ये बसले असता तिथे काही भारतीय मुले जेवण्यासाठी आली आणि त्यांनी अनेक पदार्थांची ऑर्डर देऊन अर्धे अधिक अन्न सोडून दिले.
हॉटेलच्या मालकांनी त्यांना या गोष्टीबद्दल टोकले, परंतू, नवश्रीमंत मुलांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, उलट त्यांनी हॉटेलच्या मालकाला उद्धटपणे सांगितले, "आम्ही या डिशचे पैसे ही दिले आहेत, मग असेच न खाता सोडले, तर तुमचे कोणते नुकसान आहे?
हॉटेल मालक म्हणाले, पैसे तुमचे आहेत, तुम्ही जरी ते दिले असतील तरीही, अन्न ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिचे नुकसान केलेले मी कदापि सहन करू शकत नाही. यावर त्यांची बाचाबाची झाली म्हणून मालकांनी पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी हॉटेल मालक कसा बरोबर आहे हे सांगितले व त्या मुलांवर जबरी दंड लावला.
रतन टाटांच्या विचारांवर या प्रसंगातून खूप प्रभाव पडला, पुढे त्यांनी सांगितले, पैशाने विकत घेऊन त्याची नासाडी करणे हा सुद्धा एक राष्ट्रद्रोह आहे, हे मला नीट उमगले.
आयआयटी, आयआयएम, वैद्यकीय महाविद्यालयातून, उच्चशिक्षण घेवून, देशासाठी, समाजासाठी आणि मानव जातीसाठी, काहीतरी चांगले, वैशिष्ट्यपूर्ण करावे अशीच सर्व देश बांधवांची इच्छा असते आणि त्यासाठीच अशा संस्थेत दाखला घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर सरकार, करदात्यांच्या पैशातून करोडो रुपये खर्च करते. जर उच्च शिक्षित विद्यार्थी, बाहेर पडून गीता घेऊन प्रवचन देत फिरणार असतील तर ही राष्ट्र संपत्तीची नासाडी म्हणायला हवे की नको?
गीतेमध्ये कृष्ण सांगतो; हे पार्थ तू आता युद्धभूमीवर आहेस, इथे तुझ्याविरुद्ध कोण आहे हे महत्त्वाचे नाही. जे कोणी आहेत, ते अधर्मी आहेत, तसेच त्यातील काही आदरणीय असतील, परंतू, ते विवशतेतून अधर्माच्या बाजूने उभे आहेत म्हणून, जरी ते तुझे सगेसोयरे असतील तरीही ते आज शत्रू आहेत म्हणून त्यांचा नाश करणे हाच तुझा खरा धर्म आहे.
गीतेतून इतका अलौकिक उपदेश, सगळ्या जगासमोर मांडण्यासाठी निघालेले हे सर्व पार्थ, ज्या कार्यासाठी, उच्च शिक्षण संस्थेत दाखल झाले, आणि शिक्षण पूर्ण करून संन्यास घेत, कार्यापासून विरक्ती घेतात, त्या सर्व पाहता, असे सांगायची इच्छा होते, हे पार्थसारथी, तू पुन्हा जन्म घे, आणि या भरकटलेल्या पर्थाना पुन्हा एकदा समूळ उपदेश दे.
Comments
Post a Comment