ओपनहायमरचा डंका....
*ओपनहायमरचा डंका....*
*बहुचर्चित सिनेमा ओपनहायमर आज उद्या जागतिक स्तरावर प्रदर्शित होत आहे. भव्य चित्रपटांच्या दिग्दर्शनात अग्रेसर असणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून संपूर्ण जगभर या चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोचली आहे. जगातील अनेक शहरात या चित्रपटाचे अनेक दिवसाचे बुकिंग अगोदरच फुल्ल झालेले आहे. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तर त्याचे तिकीट दर २५०० रुपयांवर पोचले आहेत. या चित्रपटाचा कथानायक ओपनहायमर हा त्याने उद्धृत केलेल्या भगवद गीतेतील वचनांमुळे भारतीयांना अधिकच परिचित झाला. द्वितीय महायुद्ध साधारण सात वर्षे चालले. त्यादरम्यान घडलेले शास्त्रीय संशोधन, राजकीय आणि लष्करी घडामोडी, अणुबॉम्बचा शोध आणि अखेरीस त्याच्याच वापराने झालेली दुसऱ्या महायुद्धाची सांगता यामध्ये ओपनहायमरचे नेमके काय स्थान होते याची पार्श्वभूमी समजून घेतल्या खेरीज या चित्रपटाचा आनंद घेता येणार नाही. अन्यथा या चित्रपटाचे स्थान अन्य रंजक चित्रपटांपैकी एक एव्हढेच राहिल. या लेखाचा प्रपंच एव्हढ्यासाठीच आहे. हा लेख म्हणजे ओपनहायमर चित्रपटाची कथा नव्हे, फार तर एक करटन रेझर एव्हढेच म्हणता येईल.*
अणु विच्छेदन
कित्येक शतकांच्या अविरत प्रयत्नांनंतर वैज्ञानिकांना अणूच्या केंद्राचे किंवा अणुकेंद्रकाच्या (Nucleus) विच्छेदनाचे (Fission) -न्युक्लिअर फिजनचे- तंत्र आणि मंत्र अवगत झाले होते. १७८९ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ मार्टिन क्लाप्रॉथ याने युरेनियम या धातूचा शोध लावला. या धातूच्या अन्य अनेक गुणधर्माबरोबरच त्याचा जो किरणोत्सारी गुणधर्म होता, त्याने शास्त्रज्ञांना अचंबित केले. मेरी क्युरी ने नंतरच्या काळात युरेनियमच्या किरणोत्सर्गी गुणधर्मावर अतिशय मूलभूत अशा स्वरूपाचे संशोधन केले. अणु विच्छेदनाचे दरम्यान होणाऱ्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक कणांच्या उत्सर्जनाचे तिने ' रेडिओॲक्टिव्ह ' असे वर्णन केले. किंबहुना त्या संद्येची तीच आद्य प्रणेती ठरली. मेरी क्युरी च्या संशोधनाचा धागा पकडून पुढे १९११ साली ब्रिटीश शास्त्रज्ञ रुदरफोर्ड याने अणुच्या अंतरंगाविषयी संशोधन पुढे नेले.
जर्मनीतील संशोधन
जर्मनीमध्येही १९३० सालापासून अणु विच्छेदनावर प्रयोग चालूच होते. १९३३ मध्ये हंगेरियन जर्मन शास्त्रज्ञ लिओ सेलार्ड याने विच्छेदनातील चेन रिअँक्शनची शक्यता वर्तवली. इटालियन शास्त्रज्ञ एनरिको फर्मी याचेही प्रयोग चालूच होते. युरेनियमच्या अणु विच्छेदनाचे मर्म समजून घेण्याकरता शास्त्रज्ञ जीवाचे रान करत होते. आणि अखेरीस या प्रयत्नांना यश आलेच ! ऑस्ट्रियन स्वीडिश वंशाची परंतु धर्माने ज्यू शास्त्रज्ञ (फिजिक्स) लिझ मायटनर आणि एक जर्मन केमिस्ट ऑटो हान यांच्या संशोधनातून त्यांना युरेनियमची अणु विच्छेदन प्रक्रिया शास्त्रीय दृष्ट्या उलगडण्यात यश आले.
शास्त्रज्ञांचे पलायन
याच दरम्यान जर्मनीमध्ये नाझीवाद वाढत जाऊन ज्यू विरोधी भावना राष्ट्रीय पातळीवर देखील उमटू लागल्या होत्या. त्याला आणि सततच्या सरकारी जाचाला कंटाळून अखेरीस लिझ मायटनरने स्वीडनमध्ये आश्रय घेतला. स्वीडनमध्ये आल्यावर मायटनरने न्युक्लिअर फिजनचे तिचे संशोधन अधिक नेटकेपणाने आणि शास्त्रीय पद्धतीने शब्दबद्ध केले. हे तिचे संशोधन हाच आगामी काळातील आण्विक शस्त्रांच्या घोडदौडीचा आरंभबिंदू होता.
हळूहळू दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले होते. आण्विक वर्चस्वाची जर्मनीचे आटोकाट प्रयत्नही चालूच होते. वाढत्या ज्यू विरोधाला कंटाळून अनेक शास्त्रज्ञ युरोपातून काढता पाय घेऊ लागले होते. सेलार्डने १९३८ मध्ये अमेरिकेत आश्रय घेतला. इटली मधील वाढत्या फॅसिझमला कंटाळून त्याच वर्षी फर्मी आणि त्याची बायको तसेच लॉरा केपॉन या शास्त्रज्ञांनी देखील अमेरिकेत न्यूयॉर्कला जाऊन कायमच्या नागरिकत्वासाठीही अर्ज केला. परंतु हे सगळं होत असताना जर्मन वंशाचा असल्याने ऑटो हान मात्र जर्मनीमध्येच राहिला. लिझ मायटनर चा तो सह संशोधक होता आणि युरेनियमचा अंतरंग तिच्या एवढेच त्यालाही उमगले होते. ती दुसरं महायुद्ध संपेपर्यंत जर्मनीतच संशोधन करत राहिला.
बिंग फुटले....
१९३९ सालाच्या पूर्वार्धात एक घटना घडली. न्यूयॉर्क मध्ये आश्रय घेतलेल्या सेलार्डला लिझ मायटनर आणि ऑटो हान च्या संशोधनाची खबर लागली. त्याने तातडीने त्या संशोधनाच्या निष्कर्षाची खातरजमा करण्याकरता आणखी एक शास्त्रज्ञ वॉल्टर झिन याच्या बरोबर जोमाने प्रयोग सुरू केले. जेव्हा त्या निष्कर्षाची व्याप्ती आणि शक्ती याबाबत त्याची खात्री पटली तेव्हा तो अंतर्बाह्य हादरून गेला. तो म्हणाला.. " त्या रात्री हे जग लवकरच विनाशाच्या खाईत जाणार याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका उरली नव्हती". दरम्यान सेलार्ड आणि फर्मी यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या सहकार्याने एक अणुभट्टी उभारायाला प्रारंभ केला. पण हे सगळं करत असताना सेलार्डला जर्मनी देखील अशा प्रकारे संहारक आण्विक अस्त्र करत तर नसेल ना अशी शंका एकसारखी सतावत असे. कारण त्या वेळेपर्यंत झालेलं संशोधन जर्मन शास्त्रज्ञांना देखील माहिती होतंच. ऑटो हान तर जर्मनीतच होता. पण सेलार्ड पुढे प्रश्न होता की हे सगळं अमेरिकन सरकार पर्यंत पोचावायचं कसं ? कारण तो पर्यंत सेलार्ड हा काही तेवढा नामवंत झालेला नव्हता. मग त्याने एक शक्कल लढवली.
अमेरिकेत त्यावेळी आपल्या संशोधनाने आणि विद्वत्तेने तळपत असलेला शास्त्रज्ञ म्हणजे आईन्स्टाईन ! सरकार दरबारी त्याच्या शब्दाला मोठीच प्रतिष्ठा होती. शिवाय तो होता जर्मन ज्यू ! त्यामुळे सेलार्ड गेला त्याला भेटायला . ते वर्ष होते १९३९. आईनस्टाईन त्यावेळी न्यूयॉर्क येथील लाँग आयलंड येथे रहात होता. सेलार्डने त्याला त्याची भीती अगदी तपशीलवार बोलून दाखवली. बऱ्याच चर्चेनंतर सेलार्ड आणि आईनस्टाईन या दोघांनी मिळून तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांना २ ऑगस्ट १९३९ रोजी एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी जर्मनी अणुबॉम्ब कसा करू शकेल आणि तो किती संहारक असेल याबद्दल अगदी तपशीलवार लिहिले होते. पत्र जरी ऑगस्ट मध्ये पाठवले तरी रुझवेल्ट यांच्या पर्यंत ते पोचायला ऑक्टोबर उजाडला. परंतु या विषयाचे गांभीर्य लक्षात येताच रुझवेल्ट यांनी तातडीने युरेनियम संबंधी सल्लागार समिती नेमली. तिची पहिली बैठक २१ ऑक्टोबर १९३९ ला झाली. पण त्यानंतर फार काही झाले नाही.
मॅनहॅटन प्रोजेक्ट
जपानने पर्ल हार्बर वर ७ डिसेंबर १९४१ रोजी हल्ला केला आणि मग सल्लागार समितीला खडबडून जाग आली. या हल्ल्याने अमेरिकेला युद्धात खेचलेच. आता युरेनियम संशोधन आणि अणुबॉम्ब निर्मितीकडे अमेरिका खरोखरच गांभीर्याने पाहू लागली. ब्रिटीश शास्त्रज्ञांच्या एका शास्त्रीय अहवालाने त्यांच्या या संकल्पाला आणखीच दृढता आली. परंतु प्रश्न होता तो अणुबॉम्ब निर्मितीकरता लागणारी साधन सामुग्री आणि कुशल मनुष्यबळाचा . सरतेशेवटी सल्लागार समितीने अमेरिकन लष्कराच्या आर्मी कॉर्प ऑफ इंजिनीअर्स यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. या विभागाने तातडीने हालचाली करून न्यूयॉर्क येथे एका डिस्ट्रिक्ट ची निर्मिती करून त्याचे नाव ठेवले मॅनहॅटन इंजिनियर डिस्ट्रिक्ट. कर्नल लेस्ली ग्रोव्हज यांना ब्रिगेडियर जनरल अशी बढती देऊन त्याच्या प्रमुखपदी नेमले. दोनच दिवसात तीन जागा विविध कामांकरिता निश्चित करण्यात आल्या. युरेनियम समृद्ध करण्यासाठी ओक रिज टेनेसी येथे, आण्विक शस्त्रांचे संशोधन करणारी प्रयोगशाळा (प्रोजेक्ट वाय) लॉस ॲलॅमॉस, न्यू मेक्सिको येथे आणि युरेनियम पासून प्लुटोनियम करण्यासाठी हॅनफोर्ड, वॉशिंग्टन येथे. याच्या बरोबरीनेच शिकागो युनिव्हर्सिटी कडे आण्विक शस्त्रांचे एक प्रारूप तयार करण्याचे काम देण्यात आले. युरेनियम मधून प्लुटोनियमची निर्मिती सुरू झाल्याबरोबर फर्मी आणि सेलार्ड यांच्या कामाला वेग आला. अखेरीस २८ डिसेंबर १९४२ रोजी राष्ट्राध्यक्षांनी मोठ्या प्रमाणावर आण्विक शस्त्रांचे देशपातळीवर उत्पादन करण्यास संमती दिली. हाच तो मॅनहॅटन प्रोजेक्ट.
किती मोठी व्याप्ती होती या मॅनहॅटन प्रोजेक्टची ?
संपूर्ण अमेरिकेत ३० प्रोजेक्ट साईट्स, १ लाख कामगार आणि २.२ बिलियन डॉलर्स चा खर्च ! आणि एवढी माणसं इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करत असून देखील कोणालाही आपण अखेरीस कशाचं उत्पादन करणार आहोत याची सुतराम कल्पना नव्हती.
फर्मी च्या प्रयोगानंतर शिकागो येथील प्रयोगशाळेत युरेनियम तसेच प्लुटो नियम वापरून अणुबॉम्ब तयार करण्याच्या पद्धती विकसित करण्यात आल्या. गन मेथड युरेनियम बॉम्ब ला नाव ठेवण्यात आले लिट्ल बॉय आणि इम्पलोजन मेथड प्लुटोनियम बॉम्बला नाव ठेवण्यात आले फॅट मॅन. बॉम्बची निर्मिती प्रयोगशाळेत तर झाली पण आता प्रत्यक्ष वापराकरता त्याचे उत्पादन करायचे होते. आणि त्याकरता एखाद्या सक्षम आणि कर्तबगार माणसाची आवश्यकता होती. अशा वेळी बऱ्याच शोध मोहिमेनंतर ब्रिगेडियर जनरल लेस्ली ग्रोव्हज यांना योग्य माणूस सापडलाच.
हा माणूस म्हणजेच ओपनहायमर. आज जो चित्रपट प्रदर्शित होतो आहे त्याचा कथानायक !
आता या ओपनहायमर विषयी येथे अधिक काही लिहिणे योग्य होणार नाही. चित्रपटात तो भाग येईलच. परंतु त्याचा आणि भगवद्गीतेचा किंवा त्याचा आणि भारताचा संबंध काय यावर थोडे लिहून हा लेख पुरा करतो.
*फिजिक्स या विषयातला त्याचा अभ्यास दांडगा असला तरी त्याची बुद्धी ही सर्वस्पर्शी होती. अनेक विषयातले त्याला सखोल म्हणावे असे ज्ञान होते. त्याची विचारसरणी ही बऱ्यापैकी डावीकडे झुकलेली होती. संपूर्ण आयुष्यभर त्याला डीप डिप्रेशनमध्ये जाण्याचा विकार होता. परंतु १९२२-२३ सालापासून त्याचे मन गूढवादाकडे वळले होते. हार्वर्ड विद्यापीठात असताना त्याने हिंदू ग्रंथाचे बऱ्यापैकी अध्ययन केले होते. पुढे १९३२-३३ साली तो बर्कले विद्यापीठातील आर्थर रायडर यांच्या संपर्कात आला. रायडर हे संस्कृतचे प्राध्यापक होते. त्यांनी ओपनहायमरला संस्कृतची संथा दिली. त्या काळातच त्याने गीता आणि अन्य हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केला. ग्रीक संस्कृती ही देखील प्राचीन. त्याने त्याचाही सखोल अभ्यास केला. पण भगवद्गीतेने त्याच्या मनावर जो प्रभाव टाकला तो अन्य कोणताही धर्मग्रंथ टाकू शकला नाही. डिप्रेशनमध्ये जाण्याच्या त्याच्या विकारावर देखील त्याला गीतेतच उपाय सापडला होता. हिंदू तत्वज्ञान आणि देवतांनी तो इतका प्रभावित झाला होता की त्याने त्याच्या गाडीचे नावही विष्णूचे जे वहान गरुड तेच ठेवले होते.*
अणु बॉम्बची जेव्हा अमेरिकेत चाचणी घेण्यात आली तेव्हा त्याला प्रतिक्रिया आली. त्याने त्याची प्रतिक्रिया म्हणून भगवद्गीतेतील ११ व्या अध्यायातील १२ वा श्लोक उद्धृत केला...
दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुस्थिता । यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ ११-१२ ॥
*आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल, तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशाइतका कदाचितच होईल म्हणजे होणार नाही. ॥ ११-१२ ॥*
जेव्हा हिरोशिमा नागासकीवर अमेरिकेने अणु बाँब टाकले त्यावेळी प्रतिक्रिया विचारली असता त्याने ११ व्या अध्यायातील ३२ वा श्लोक उद्धृत केला....
श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः । ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ११-३२ ॥
*भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत, ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणार आहे. ॥ ११-३२ ॥*
आता या सिनेमाच्या निमित्ताने त्याच्या आणि भारताच्या संबंधातील लिखाण छापून येईलच. त्यामुळे त्याविषयी लिहिणे योग्य ठरणार नाही.
Comments
Post a Comment