सायबर फ्रॉड चे कारण तो एक बेसावध क्षण

 एक बेसावध क्षण आणि 

८६ हजार रुपये गेले पाण्यात !

सायबर फ्रॉडचा अजून एक प्रकार

माहित नाही काय ते मात्र सायबर फ्रॉडच्या आजवर इतक्या केसेस पाहिल्या त्या सर्वामध्ये एक कॉमन धागा आहे. तो म्हणजे एक बेसावध क्षण !! 

मग तो हॅकरकडून आलेला कॉल असेल किंवा आलेला मेसेज असेल. 

हमखास आपल्यापैकी अनेकजण त्या क्षणी हिप्नोटाईज झाल्यासारखे होतात अन घोळ होतो. 

आणि मग नंतर जेव्हा कळत तेव्हा खूप उशीर झालेला असतो. 

"के वाय सी" फ्रॉड या प्रकारावर मागेही मी एक पोस्टमधून प्रकाश टाकला होता. सावधही केलं होत. 

पण काय माहित लोक वाचतात की नाही ? तेच कळत नाही. 

नुकताच त्याच प्रकारच्या सापळ्यात मित्र अडकला अन थोडेथोडके नाही तर ८६ हजार रुपये गेले पाण्यात !

या फ्रॉडबद्दल आता पुन्हा एकदा सांगतो. शिवाय सोबत त्याचे स्क्रीन शॉट देखील देतोय. त्यातले हॅकर मेसेज नीट लक्षात ठेवा. 

अमुक तमुक बँकेतून हा मेसेज तुम्हाला आला असून तुम्ही तुमचे केवायसी अपडेट केलं नाही. ते लगेच करा अन्यथा तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यात येईल. असं सांगून एक लिंक दिली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर पुढं ते जसजसे सूचना करत जातात त्या तुम्ही पाळत जाता (हाच तो बेसावध क्षण), त्यात तुमचा अकाउंट नंबर पासून आधार कार्ड नंबर पर्यत सगळं विचारून घेतलं जाते. 

आणि मग सांगितलं जातं की, आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो आम्हाला कळवा म्हणजे प्रोसेस पूर्ण होऊन तुमचं केवायसी अपडेट होईल. 

तुम्ही त्या प्रमाणे ओटीपी आल्यावर देता अन विदिन वन मिनिट तुमच्या खात्यातून पैसे परस्पर गेल्याचे कळते आणि तसा मेसेज तुमच्या मोबाईलवर बँकेतर्फे येतो. तुम्ही हादरून जाता. 



आता हे फ्रॉड कसे होते ? तर तुम्ही सगळी माहिती देत असताना तिकडे हॅकरने त्याच्या तिथे तुमचं बँक अकाउंट ओपन केलेलं असत आणि पैसे काढण्याच्या स्टेजपर्यंत येऊन थांबलेलं असत त्यावेळी बँक ओटीपी तुम्हाला पाठवते. बँकेला काय माहित की हॅकर ने अकाउंट विड्रॉल स्टेज घेतलीय की अधिकृत तुम्ही घेतली? मात्र बँकेला कनेक्ट असलेल्या तुमच्या मोबाईलवर ओटीपी येतो. जो तुम्ही हॅकरला देता. आणि तिथं त्याच्याकडे तो त्याच्या मोबाईलमधून तुमच्या अकाउंटला जाऊन तुम्ही दिलेला ओटीपी टाकून पैसे काढून घेतो. 

आता यावर उपाय काय ?

तर सोप्प सांगून ठेवतो..... 

मुळात कोणतीही बँक असं ऑनलाईन केवायसी अपडेट करायला सांगत नाही. तुम्हाला फिजिकली त्या बँकेत जावं लागत. हे कायम लक्षात ठेवा. आणि जर हे लक्षात ठेवलं तर तुमची पुढची सगळीच फसगत थांबते. 

दुसरं म्हणजे असे (फ्रॉड) मेसेज नीट बारकाईने वाचत जा. हमखास तिथं काहीतरी एखादी गडबड सहज कळू शकते. 

आता याच केसमध्ये आलेला मेसेज जर नीट पाहिला तर कळू शकते की जरी समजा गृहीत धरलं की बँकेकडूनच आलाय मेसेज.... किंवा नकळतपणे तुम्हाला तसे वाटलेही तरी त्यांनी दिलेल्या लिंकची अक्षरे वाचा न ! त्यात गडबड लक्षात आली असती. त्या लिंक मध्ये hdfc चा काहीच उल्लेख (अक्षरे) नाहीत. बँक स्वतःचे अँप जेव्हा वापरते तेव्हा त्याच्या लिंकमध्ये त्यांच्याबद्दल अक्षरे असतात न ! किती सिम्पल गोष्ट आहे. 

तर अशावेळी ती लिंक नीट वाचायची. प्लस तो मेसेजही नीट वाचायचा. अनेकदा त्यात ग्रामर मिस्टेक सापडते. ती सापडली की समजावं नक्की.... हा फ्रॉड मेसेज आहे. 

शिवाय अजून एक म्हणजे.... बँकेला आहेत ती कामे उरकायला वेळ मिळत नाही तर तुम्हाला एकच मेसेज दोन तीन दिवसात तीनदा का पाठवेल ? हे जरी कळलं तरी तुमची फसवणूक थांबेल. 


लक्षात ठेवा;  मुळात अशावेळी नेहमी एक गोष्ट करायची..... पॅनिक अजिबात व्हायच नाही. शांत राहायच. कसलीच धावपळ करायची नाही आणि समोरच्याला रिस्पॉन्स पण तात्कळ देत बसायच नाही. मग डोकं शांत असेल तर तुम्हाला पण आता मी ज्या ट्रिक्स सांगितल्या त्या सापडल्या असत्या. त्यामुळे शांत राहणे हे महत्वाचे. दुसरं म्हणजे अशावेळी थोडी शंका जरी आली तरी लगेच बँकेला फोन करून विचारा न की बाबानो तुम्ही असा असा मेसेज केलाय का ? तेव्हा कळेल की त्यांनी असं काही पाठ्वलंच नाहीय. आणि मग तुम्ही सावध होऊ शकाल. 


मागेही "तुमचं वीजबिल थकलं आहे. अमुक लिंक वर क्लिक करून पुढील प्रोसिजर करा. नाहीतर रात्री नऊ वाजता आमची माणसे वीजकनेक्शन तोडायला येतील"

हाईट म्हणजे खेड्यात नव्हे तर पुण्यामुंबई सारख्या शहरातील लोक या सापळ्यात जास्त अडकले. आणि हजारो रुपये पाण्यात गेले. त्यावरही माझी डिटेल पोस्ट आहे. जरूर पहा. स्क्रोल करून !

साधा विचार करायचा की अशा सरकारी खात्याची माणसे ऑफिस टाइम सोडून भलत्या वेळी कशाला ड्युटी करत बसतील ? इतकं जरी कळलं तरी धोका टाळता येतो. कॉमन सेन्स वापरत जा 

मग फसवणूक थांबेल !

Comments