पेगासस चा ही फुसका बार…

 पेगाससचाही फुसका बार…

साप साप म्हणायचे आणि भुई थोपटायची, अशी सवय काँग्रेस पक्षाला झाली आहे. राहुल गांधींपासून तालुका अध्यक्ष पर्यंत सगळे याच माळेचे मणी आहेत. यांच्या आरोपांत काही तथ्य नसते, तरीही ते ओरडत सुटतात. मोदींना शिव्या दिल्या की ल्युटिअन्स मीडिया उचलून धरतो. संसदेतले कामकाज रोखता येते. डावे पक्ष यांच्यासारखे बोलभांड सोबत घेतले की गलका करता येतो हा काँग्रेसचा गेल्या आठ वर्षातला नित्यक्रम झाला आहे. पण प्रत्येकवेळी आरोप फुसके निघतात आणि हे सगळे तोंडावर आपटतात. पेगासस प्रकरणात तसेच घडले आहे. 

केंद्र सरकारने विदेशातून पेगासस नावाचे सॉफ्टवेअर खरेदी केले, त्याचा वापर करून विरोधकांच्या फोन संभाषणावर लक्ष ठेवले जात आहे, असा खोटा आरोप हंगामी राजकारणी राहुल गांधी आणि त्यांच्या चौकडीने केला. त्यांनी आरोप करायचीच खोटी, मोदी विरोधातील माध्यमे आणि राजकीय पक्ष झाडून कामाला लागले. शिमग्यालाही लाज वाटावी, अशी बोंबाबोंब करण्यात आली. संसद बंद पाडली गेली. पत्रकार परिषदांचा रतीब सुरु झाला. प्रकरण न्यायालयात गेले. 

मुळात विरोधक नेमके काय बोलतात यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअरची काहीही आवश्यकता नाही. राहुल गांधींच्या बोलण्याला असाही काही अर्थ नसतो. संजय राऊत यांचा फोन टॅप केल्या तर शिव्यांशिवाय दुसरे काही ऐकू येण्याची शक्यताच नाही. प्रियांका चतुर्वेदी आज जे बोलतात ते उद्या बोलतील याची काही खात्री नाही. आणि ल्युटिअन्स माध्यमे कितीही चांगले काम केले तरी मोदींच्या विरोधातच बोलणार आहेत. राकेश टिकैत, केजरीवाल, ममता बॅनर्जी सगळ्यांचे तेच. मग फोन टॅपिंग करायचे तरी कशासाठी ?

तरीही गोंधळ घातला गेला. सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केली. आणि पेगाससारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून कुणाचेही फोन टॅप करण्यात आलेले नाहीत, असा निर्वाळा न्यायालयाच्या समितीने दिला. आणि आज सारे मूग गिळून गप्प आहेत. 

मोदींनी अंबानींना भरभरून दिले, मित्रांची कर्जे माफ केली, राफेलमध्ये दलाली घेतली, चौकीदार चोर है, असे खोटे आरोप राहुल गांधींनी आजपर्यंत केले. राजकारणात आरोप होत असतातच. पण खोट्या आरोपांसाठी संसदेचे कामकाज वेठीस धरले. जिथे सव्वाशे कोटी भारतीयांचे प्रश्न मांडले जायला हवेत, लोकहिताचे कायदे केले जावेत, अशी अपेक्षा आहे, ते कामच राहुल आणि त्यांच्या चेल्याचपाट्यानी खोट्या आरोपांच्या खातर बंद पाडले हा खरा गुन्हा आहे. 

मोदींच्या आठ वर्षांच्या काळात एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. उलट ज्यांनी ज्यांनी देशाला लुटले त्या प्रत्येकाच्या मागे तपास यंत्रणा हात धुऊन लागल्या आहेत. गांधी कुटुंबीयसुद्धा त्यात समाविष्ट आहेत. त्यामुळेच पोटदुखी आहे. पण त्यासाठी खोटे आरोप करून संसद बंद पाडणाऱ्यांना कडक शासन करायलाच हवे.

#PegasusSpyware

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034