महाराष्ट्राचे सत्ता नाट्य : कोण जिंकले, कोण हरले?

 महाराष्ट्राचे सत्ता नाट्य : कोण जिंकले, कोण हरले?


देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे एक असं नाव होत ज्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला हादरवून सोडलं होत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आणि फडणवीसांच्या खेळीमुळे उद्धव ठाकरेंकडून सत्तेसोबत पक्षही हातातून जाताना दिसत आहे.

सत्तेच्या याच खेळात एक शायरी लक्षात येते. ती अशी की, 'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना…मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा'.

पण शिवसेनाचा हा गेम करताना फडणवीसांना सुद्धा जाणीव नसावी की त्यांच्यासाठी काळाने पुढे काय ताट मांडले आहे. करत होतो एक पण झाले भलतेच अशी अवस्था त्यांची झाली.

राज्याच्या राजकारणाला अनपेक्षितपणे मोठी कलाटणी देणारा निर्णय मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या घोषणेने झाला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांना धक्का दिला. 

राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचेच अंदाज चुकवत महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकणारी घोषणा केली.



फडणवीस यांनी सांगितले की, भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले जाणार असले तरी मी यामध्ये सहभागी होणार नाही.

पण या घोषणेनंतर काही वेळातच भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील, असे जाहीर केले. आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतचे ट्विट केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि  पक्षादेश स्वीकारून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

अशा रीतीने गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात जे सत्तानाट्य सुरु होते त्या नाटकाचा शेवट मात्र असा अतिशय अनपेक्षित झाला.

शेवट असाही धक्कादायक असू शकतो, याची खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कदाचित स्पष्ट  कल्पना नसावी. मात्र दिल्लीतून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व धुरंधर राजकारणी अमित शहा यांनी फासे टाकले व  एका डावात अनेक तीर मारले.

अमित शहा हे भविष्यात भारताच्या पंतप्रधान पदासाठी दावेदार मानले जातात. मोदी यांच्यानंतर शहा यांच्याकडे याबाबत पहिले जाते.

शहा यांच्यासारखेच देवेंद्र फडणवीसही या शर्यतीत आहेत अशी सर्वासामांन्यांची समजूत आहे.

या दोघांकडेही पंतप्रधान पदासाठी लागणारे बरेचशे गुण व धमक आहे.

फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद पाच वर्षे यशस्वीपणे सांभाळले होते. ते उत्तम प्रशासक, वक्ते आहेत तसेच शहा यांच्या मानाने वयाने तरुण आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ते दिल्लीत जाऊन मोठी जबाबदारी घेऊ शकतात.

त्यामुळे  मागील ७ ते ८ वर्षांपासून शहा यांनी फडणवीस यांना पक्षांतर्गत शह दिला असल्याचे दिसून येते. 

याच शह - काटशहाचा भाग म्हणून अमित शहा यांनी फडणवीसांसारख्या मुत्सुद्दी व धुरंधर राजकारण्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून सन २०१९ व आता लांब ठेवले आहे असे जाणकर म्हणतात .

आजही त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची पोस्ट देऊन डिमोशन केले. यातूनच त्यांचे खच्चीकरण करण्याचे शहा यांचे षडयंत्र दिसून येते.

वास्तविक फडणवीस यांना संघाचा पाठींबा आहे, मात्र त्यालाही मोदी - शहा जोडगोळी जुमानत नसल्याचे दिसून येते.  

झालेल्या या अपमानामुळे फडणवीस आतून निराश आहेत. तेच नैराश्य त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून शपथविधी वेळी थोड्याफार प्रमाणात जाणवतही होते. मात्र फडणवीस हे उत्कृष्ट अभिनेतेही आहेत. कितीही संकट समोर दिसले, तरी शरद पवार यांच्यासारखेच ते वागतात. त्यांचा चेहरा किंवा बॉडी लँग्वेज जराही बदलत नाही. मात्र सध्या फडणवीस यांची अवस्था मात्र 'सहन होत नाही आणि सांगताही येत नाही', अशी आहे.

फडणवीस यांच्यात एक मोठा गुण आहे. ते नैराश्य लवकर झटकून टाकतात आणि समोर असलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यातून चांगले काय करता येईल यासाठी स्वतःला झोकून देतात.

आताही नैराश्य झटकून, राज्याच्या सकारात्मक राजकारणात सक्रिय होऊन ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना योग्य मार्गदर्शन आणि साथ देतील याबद्दल दुमत नाही.

मुंबई व इतर महानगरपालिकेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत, या निवडणुकांत प्रस्थापित शिवसेनेला शह देण्यासाठी शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे पाऊल उचलले असावे.

शिवसैनिकांची सहानुभूती मिळावी व त्यांचा रोष  कमी व्हावा, हाही त्यामागे उद्देश असावा . अर्थात हा त्यांचा उद्देश तितकासा यशस्वी न होण्याची शक्यता खूप आहे कारण सामान्य शिवसैनिकांना ठाकरे आणि शिवसेना ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि अविभाज्य आहेत.

महाराष्ट्रातील या सत्ता नाट्यात निश्चितपणे फडणवीसांचा अपमान झालाय का ? तर झालाय. ते मुख्यमंत्री मटरेल होते पण त्यांना डावललं गेलं. डावलल्यापेक्षा त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून त्यांना जाणीव करून देण्यात आली की तुम्ही काय स्वयंभू नेतृत्व नाही तर आम्ही जे सांगतो तेच तुम्ही ऐकायला हवं !

काही वर्षांत म्हणजे विशेषतः २०१४ नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून सर्वांना खूप आनंद झाला. आनंद होणं स्वाभाविक आहे. मात्र काही नेत्यांचा अपवाद वगळले तर या आनंदाचं, अभिमानाचं रूपांतर कधी माजात झालं हे कार्यकर्त्यांना कळलंच नाही.

निश्चितच फडणवीस चांगलेच होते व आहेत. त्याबद्दल कोणाला शंका नाही. मात्र त्यांच्या भोंवती एक खूषमसकऱ्यांची टोळी निर्माण झाली होती जीने माज सुरू केला.

तो एवढा माज हळूहळू इतर पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत पोचला. माज असा की हे लोकं अतिशय खालच्या पातळीवर येऊन सर्व विरोधी नेते यांच्यावर काहीबाही टीका करायचे. अत्यंत खालची भाषा असायची. त्यापुढे जाऊन सामान्य कार्यकर्त्यांनाही सोडले नाही.

परवाच्या नाट्याने या सर्वांना जमिनीवर आणलं असावं. भाजपने सत्तांतर केलं मात्र शिंदेंची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर या खूष मस्कऱ्यांच्या गल्लीबोळात शुकशुकाट पसरलाता, काहीजणांनी गोडधोड जेवणाचा बेतही रद्द केला. एवढी शोककळा सत्ता येऊनही पसरावी ही म्हणजे मोठी गंमतच आहे.

भाजपा केंद्रीय नेत्यांचा संदेश कुणाला होता ? फडणवीस आणि टीमला ? तर नाही. तो संदेश तमाम महाराष्ट्र भाजपाला होता. जो तो नेता म्हणजे राणेंपासून ते विखेपर्यंत तसेच तो प्रवक्ता उपाध्ये पासून भंडारी पर्यंत यांना मेसेज होता. तुम्ही फडणवीसांच्या आरत्या ओवाळणे बंद करा. यात एक अपवाद आहेत ते म्हणजे गडकरी !

भाजपने हा संदेश एवढा लाऊड एँड क्लिअर दिला की , भाजपा मध्ये विशेषतः फडणवीस ग्रुपमध्ये स्मशानशांतता पसरली. हे लोक विधानपरिषद, राज्यसभेवेळी एवढे ढोल, डांगोरे पिटले , फडणवीस यांना चाणक्य, डॉन अशा उपाध्या दिल्या मात्र अख्या महाराष्ट्रात सत्ताबदल झालेला असताना ही गल्ली शांत होती, शोकात होती.

असो. महाराष्ट्रात सत्ता नात्याचा जो खेळ सुरु होता तो संपला आहे. यात कोण जिंकले आणि कोण हरले आणि कोण जिंकून हरले?

उद्धव ठाकरेंना आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळाला. राजकारण हे 24x7 करायचे असते - टाईम पास म्हणून स्वतःच्या मर्जीने, स्वतःला पाहिजे तेव्हा करायची गोष्ट नाही हा तो धडा आहे. तसेच जनसंपर्क, जनतेशी connect किती महत्वाचे आहे हेही त्यांना उमजले असेल.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरुद्ध आवाज उठवून आपले राजकीय अस्तित्व डावाला लावले होते. त्यांनी शांतपणे आमदारांना जमवून त्यांना एकत्रित करून त्यांच्या तक्रारींना वाचा फोडली, त्यांना नव मार्ग दाखवला आणि त्याचे फलित म्हणून आज ते मुख्यमंत्री झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस मात्र जिंकून ही बाजी हरले असे दुःखाने म्हणावे लागते आहे. त्यांनी सगळा गेम रचला, व्युह रचना केली, यशस्वी झाले पण शेवटी त्यांचाच गेम झाला. पण ते बाउन्स बॅक करतील.

असो. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी  एकनाथ  - देवेंद्र या "इडी टीमला " मनापासून शुभेच्छा 🌹

@ दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034