विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठराव

 *विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठराव*

3 आणि 4 जुलैला महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी अभिनिमंत्रित केले आहे. अधिवेशनाचा मुख्य कार्यक्रम हा विधानसभा अध्यक्षांची निवड आणि मुख्यमंत्र्यांवरील विश्वासदर्शक ठराव हेच आहेत. त्या अनुषंगाने बऱ्याच प्रश्नांची चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि बऱ्याच बाबतीत अनेकांचे मतभेद आहेत. त्यांचा माझ्यापरीने आढावा घ्यायचा प्रयत्न.



★पीठासीन अधिकारी कोण असेल?

उत्तर - विधानसभेला पूर्ण वेळ उपाध्यक्ष असल्याने तोच पीठासीन अधिकारी म्हणून काम करेल. राज्यपाल आपला प्रतिनिधी देणार नाहीत. 

★अध्यक्षांची निवड कशी होईल?

उत्तर- महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षांची निवड ही गुप्त मतदान पद्धतीनेच होते. पण महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळ अंतर्गत कामकाजाच्या नियमात बदल करून "हात उंचावून मतदान" पद्धतीने मतदान घेण्याचा नियम केला. तो सध्याच्या स्थितीत लागू असल्याने हात उंचावून (म्हणजे प्रत्यक्षात डोकी मोजूनच) होईल. आवाजी मतदानाने होणार नाही. त्यामुळे उपाध्यक्ष कोणत्याही प्रकारची मनमानी करू शकणार नाही.

★अध्यक्षांच्या निवडणुकीत whip असतो का?

उत्तर- हो. Whip असतो.

★whip चे उल्लंघन झाल्यास आमदारांवर काय कारवाई होईल?

उत्तर - काहीही नाही. कारण विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत लागू केलेला whip हा राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच असतो. आमदारांनी cross voting केले तर त्यांच्यावर फार फार तर केवळ पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते पण आमदारकी धोक्यात येत नाही.(नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील 10 मते फुटली पण कोणत्याही आमदाराची आमदारकी धोक्यात आलेली नाही 😊). उद्या फुटलेली मते सहज कळून येतील पण कारवाई कोणावरच होणार नाही.

★अध्यक्षाची निवड झाल्यावर पुढे काय होईल?

उत्तर- सगळ्यात प्रथम पुढच्या सर्व कामकाजाची जबाबदारी त्याच्यावर येईल आणि तो पीठासीन अधिकारी म्हणून काम सुरू करेल.

आता उपाध्यक्षाची गरज संपली आणि तो परत साधा आमदार या नात्याने पुढील कामकाजात सहभागी होईल.

★अध्यक्ष पहिले काम काय करेल?

उत्तर - सर्वप्रथम अध्यक्ष (सध्याच्या अभूतपूर्व आणि रंजक परिस्थितीत) एकनाथ शिंदे गटाला अधिकृत "शिवसेना विधिमंडळ पक्ष" अशी मान्यता देईल आणि गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करतील. याच एकनाथ शिंदे गटाचे मुख्य पक्ष प्रतोद (chief whip) म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती होईल. शिंदेंसह 40 आमदारांचा गट हा अधिकृत गट/पक्ष म्हणून मान्यता मिळाल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नेमलेले गटनेते अजय चौधरी यांनी निवड रद्दबातल होईल. पर्यायाने मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू देखील पदच्युत होतील. आता फक्त 15 आमदारांचा एक गट शिल्लक राहील ज्याला विधिमंडळ पक्ष म्हणून कोणतीही मान्यता शिल्लक राहणार नाही.

★विश्वासदर्शक ठरावात नेमकं काय होईल?

उत्तर- जे जे विधिमंडळ पक्ष प्रतोद whip काढतील तो whip त्या त्या पक्षांच्या आमदारांना बंधनकारक असेल. (माझ्या माहितीनुसार अजून तरी शिवसेनेचे सुनील प्रभू वगळता कोणत्याही पक्षाने whip जारी केलेला नाही.😊). भरत गोगावले हे शिवसेनेचे अधिकृत आणि मान्यताप्राप्त प्रतोद झाल्याने शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना एकनाथ शिंदेंच्या बाजूने मतदान करावंच लागेल. 15 आमदारांनी whip झुगारला तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यास अध्यक्ष मोकळे आहेत.

उद्या एकनाथ शिंदे विश्वासदर्शक ठराव जिंकतील आणि मग पुढचे किमान 6 महिने सरकारला कोणताही धोका राहणार नाही. 

★ हे एवढं सगळं इतकं सुस्पष्ट असताना शिवसेनेचा ठाकरे गट उद्याची अध्यक्षपदाची निवडणूक का लढवत आहे? महाविकास आघाडीतील करारानुसार हे पद तर काँग्रेसकडे होते आणि त्यांनी मात्र उमेदवार दिला नाहीय.

उत्तर- आपण हरणारी निवडणूक लढतोय हे उद्धव ठाकरे गटाला माहिती आहे. पण त्यांना न्यायालयीन लढाईत लागणारे सर्व पुरावे आणि व्हिडिओ footage उद्या सभागृहात निर्माण होणार आहे जेणेकरून आपणच मूळ शिवसेना आहोत या दाव्याला पुष्टी मिळेल. याच कारणासाठी त्यांनी आपल्या निष्ठावान लोकांकडून प्रतिज्ञापत्र घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांना पक्षावर आपला दावा सोडायचा नाहीय आणि पक्ष आपल्याच मुठीत ठेवायचा आहे. उचललेले मीठ, घेतलेल्या शपथा आणि बांधलेली शिवबंधने/गंडेदोरे यांना न्यायालयीन लढाईत शून्य किंमत आहे. तिथे पुरावे म्हणून दस्तावेजच लागतो.

(11 जुलै रोजी कोर्टात उपाध्यक्ष काय करतील त्यावर मोठ्या प्रमाणात कोर्टकचेऱ्या होणार आहेत आणि 18 जुलै ला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात उपाध्यक्षवरच गंडांतर येऊन त्याची गच्छंती होईल. इथून पुढच्या सर्व नाड्या या विधानसभा अध्यक्षांच्या हातात येणार आहेत आणि पात्रता/अपात्रता हा खेळ निव्वळ वेळकाढूपणा करत 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.मूळ शिवसेना कोणती हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्यावर निवडणूक आयोगही सर्वप्रथम शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून दोन्ही गटांना तात्पुरते वेगळे चिन्ह देऊन टाकेल.

तूर्तास इतकेच ! 😊

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained