कुंभमेळ्यात शाही स्नान म्हणजे काय असते?

 कुंभमेळा (Kumbha Mela) आणि त्यानिमित्ताने तीर्थक्षेत्री शाही स्नानाला (Shahi Snan) साधु आखाड्यांमध्ये महत्वाचं स्थान आहे. कुंभमेळ्यात विविध आखाड्यांमधील साधुंना एखाद्या राजाप्रमाणे मान दिला जातो. हरिद्वार (Haridwar) येथे कुंभमेळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. 11 मार्चला महाशिवरात्री निमित्ताने पहिलं शाही स्नान होत आहे. त्यानंतर होणाऱ्या 3 शाही स्नानांची तारीख आणि वेळ घोषित करण्यात आली आहे. पहिल्याच शाही स्नानावेळी साधुंमध्ये वादविवाद होऊ नये, शाही स्नान शांततामय वातावरणात पार पडावं यासाठी प्रत्येक आखाड्याला क्रम आणि स्नानची जागा नेमून दिली जाते.

शाही स्नान म्हणजे काय? वैराग्य स्विकारलेल्या साधुंशी त्याचं नातं काय जाणून घ्या.

शाही स्नान शतकानुशतके चालू आहे. यात 13 आखाडे (Aakhade) सहभागी होतात. ही कोणतीही वैदिक परंपरा नाही. या शाही स्नानाची सुरुवात 14 ते 16 शतकादरम्यान झाली असावी, असं मानलं जातं. या काळात मुघलांच्या आक्रमणाला सुरुवात झाली होती. धर्म आणि परंपरेचे मुघल आक्रमणांपासून संरक्षण होण्यासाठी हिंदू राज्यकर्ते आखाड्यातील साधूंची विशेषतः नागा साधूंची (Naga Sadhu) मदत घेत असत.


नागा साधू हळूहळू आक्रमक होऊ लागले आणि देशापेक्षा धर्माला अधिक महत्व देऊ लागले. अशा परिस्थितीत मध्ययुगीन हिंदू राज्यकर्त्यांनी नागा साधूंच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी राज्यकर्त्यांनी साधूंना राष्ट्र, धर्म कार्याचे ध्वज आणि साधू, शासनकर्त्यांना कार्याचे वाटप करुन दिले. साधुंना विशेष मान दिला आहे, असं जाणवावं म्हणून कुंभमेळ्यातील शाही स्नानावेळी त्यांना प्राधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली. या कुंभमेळ्यात साधुंचं वैभव राजांप्रमाणे असतं, त्यामुळे याला शाहीस्नान असं म्हणतात. यानंतर शाही स्नानाची परंपरा सुरू झाली.

1760 मध्ये शैव आणि वैष्णवांमध्ये स्नानासाठी संघर्ष झाला. त्यानंतर ब्रिटीशांच्या काळात विविध आखाड्यांचा शाही स्नानासाठी एक क्रम तयार करण्यात आला. या क्रमवारीचं अद्याप पालन केलं जातं.

शाही स्नान म्हणजे काय?

शाही स्नानासाठी विविध आखाड्यांशी संबंधित साधू सोने, चांदीच्या पालखीत बसून किंवा हत्ती, घोड्यांवर बसून येतात. यावेळी प्रत्येक आखाडा शक्तीप्रदर्शन करतो. याला राजयोग स्नान असंही म्हणतात. यावेळी साधु आणि त्यांचे अनुयायी पवित्र नदीच्या पाण्यात एका विशिष्ठ वेळेपर्यंत डुबकी मारतात. शुभ मुहूर्तावर हे स्नान केलं तर अमरत्वाचे वरदान प्राप्त होतं असं मानलं जातं. त्यामुळेच कुंभमेळ्यातील महत्वाचा विधी असलेलं शाहीस्नान हे कायमच चर्चेत असतं. शाही स्नानानंतर सर्वसामान्य लोकांना नदीत स्नान करण्यास परवानगी दिली जाते.

हे स्नान ठरलेल्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होतं. या वेळेपूर्वी आखाड्यातील साधु-संत घाटावर जमतात. यावेळी त्यांना हातात पारंपारिक शस्त्रास्त्र घेतलेली असतात. त्यांच्या शरीरावर भस्म असतं. यावेळी हे साधू संत नामघोष करत असतात. मुहूर्तावेळी हे साधू निर्वस्त्र किंवा कमी कपड्यांनिशी पाण्यात डुबकी मारतात.

कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी आखाड्यांची क्रमवारी ठरलेली असते. यावेळी जुना आणि अग्नि आखाडा सर्वप्रथम शाहीस्नान करतील. त्यानंतर निरंजनी आणि आनंद आखाडा गंगा नदीत डुबकी मारतील. यानंतर महानिर्वाणी आणि अटल आखड्याचे संत हरकी पाडीच्या ब्रम्हकुंडात कुंभ स्नान करतील.

कोरोना संसर्गाच्या (Corona Pandemic) पार्श्वभूमीवर यंदा कुंभमेळ्यासाठी स्थानिक प्रशासनाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचं पालन सर्वसामान्य नागरिक आणि साधूसंतांना करणं आवश्यक आहे. यावेळी भाविकांना कोविड-19 निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र आणणं सक्तीचं करण्यात आलं होतं. मात्र अनेक बैठकांनंतर हा सक्ती शिथील करण्यात आली. मात्र अन्य नियमांचं पालन करणं सक्तीचं आहे.

(लोकमत सौजन्याने )

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained