सरकारी इतिहासाकारांना उभे करून शिवचरित्रा वरून जाणीवपूर्वक घातलेला - राजाश्रय असलेला वाद

 *सरकारी इतिहासाकारांना उभे करून शिवचरित्रा वरून जाणीवपूर्वक घातलेला - राजाश्रय असलेला वाद*

छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सर्वात उत्तुंग महापुरुष.

मध्यम युगात जेव्हा भारतावर मुघल लोकांचे साम्राज्य होते - अत्याचार होते, लाचारी होती, गुलामी होती तेव्हा "हे हिंदवी स्वराज व्हावे ही श्रींची इच्छा मी पूर्ण करणारच " असा पण करून ते सत्यात ज्याने उतरवले  ते आपले दैवत शिवाजी महाराज.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज. मुघल शत्रूला धूळ चारणारे शिवाजी महाराज. आदर्श राजा आणि आदर्श राज्य कसे असावे याचे जिवंत उदाहरणं म्हणजे शिवाजी महाराज.

महाराष्ट्रात इतिहासकार नसलेल्यां दोन अशी व्यक्तीमत्वे होती ज्यातील एका व्यक्तीने शिवाजी जनमानसात पोचवला - बाबासाहेब पुरंदरे - तर दुसरी व्यक्ती दुर्दैवाने त्या विषयावर ज्याला "समग्र" म्हणता येईल असे लेखन करण्याआधीच निवर्तली - ते म्हणजे नरहर कुरंदकर. त्यांचे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचा.

बाबासाहेब पुरंदरे. यांनी शिवाजी महाराजांना एक राज्यकर्ता म्हणून पाहीले. त्यातील चमत्कार बाजूला ठेवले. त्यांचे कर्तुत्व, त्यांच्या योद्धा आणि शासक म्हणून प्रतिक्रीया पहाताना त्या काळाचा संदर्भ घेऊन बघितल्या. बाबासाहेबांनी त्यांच्याच शब्दात (स्वतःस इतिहासकार/इतिहाससंशोधक असे न संबोधिता) शाहीरी केली. शाहीराला कालानुरूप शब्दरचना आणि अलंकार त्यांनी वापरले. शिवचरित्र त्यांनी घरोघरी पोचवले.


दुर्दैवाने गेल्या पंधरा वीस वर्षात महाराष्ट्रातील काही पुरोगामी राज्याकर्त्यांनी शिवचरित्रावरून राजकारण चालवले आहे.

काही सरकारी (सरकार पुरस्कृत )इतिहास अभ्यासकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हे राजकारणी 'शिवाजी महाराजांचा शिकवलेला इतिहासाच चुकीचा असल्याच्या कांड्या पिकवत आहेत. कसं ते पाहुयात.

• शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेवरून घोळ :

भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.

ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.

संत तुकाराम, बसवेश्वर जी , शिवाजी महाराज , गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.

आज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजी महाराजांच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते.

इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती.

शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.

असो.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर नजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.

शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती.

शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले.आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.

आम्ही शाळेत असताना जे शिवाजी महाराजांबद्दल शिकलो त्यानुसार मार्गदर्शक युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांचेकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण माता जिजाबाईंकडून मिळाले.

जिजाबाई यांनी बाल शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले.

• दुसरा घोळ - शिवाजीचे गुरु कोण होते?

शिवाजी महाराज्यांच्या माता जिजाऊ या शिवाजी महाराज्यांच्या पहिल्या गुरु आहेत. ज्या मातेने शिवाजी महाराज्याना महाभारत आणि रामायण सांगून आणि तोंडपाठ करून अधर्मा विरुद्ध धर्म शिकवून पहिला पाया घातला कारण याच मोघलांनी जिजाऊ साहेबांचे जाधव घराणे पूर्णपणे निर्बीज केले होते त्या मोघलांना धडा शिकवण्यासाठी जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराज्याना धर्माचे बाळकडू पाजून तयार केले आणि वेळो वेळी त्यांना मार्ग दर्शन हि केले.

शिवाजी महाराज्यांचे दुसरे गुरु होते शहाजी राजे ज्यांनी दोन वेळा स्वराज्य स्थापन करायचे प्रयत्न केले पण दोन्ही वेळा त्याच्या पदरात निरास्याच पडली मग त्यांनी आपण केलेल्या चुका परत होवू नये म्हणून शिवाजी राज्यांना भगवा ध्वज आणि राजमुद्र देवून योग्य मार्ग दर्शन केले

तिसरे गुरु होते दादोजी कोंडदेव. कोणी काही म्हणो दादोजी कोंडदेव यांबद्दल जरी वाद असले तरी शस्त्र शिक्षण आणि पुणे परत बनवण्यास शिवबांना त्यांनी दिलेले मार्ग दर्शन कोणीही नाकारू शकत नाही .

शिवचरित्र

छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व असे होते की त्यांच्याबद्दल लिहावे तितके कमी आहे.

महाराजांचे व्यक्तिमत्व हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जावे !

पुरावे जोडणे आवश्यक 

इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल.

शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र क एखाद-दुसरं पुस्तक वाचून शिवचरित्र कळणारंच नाही. किमान दोन वेगवेगळ्या इतिहासकारांनी लिहिलेली शिवचरित्रं तरी वाचायला हवीत.

श्री. बाबासाहेब पुरंदरे व श्री. गजानन मेहेंदळे या दोन इतिहासाच्या अभ्यासकांची पुस्तके ही सर्वात जास्त लोकप्रिय आणि सत्याच्या जवळ जाणारी मानली जातात..

किमान या दोन गुरुजनांनी लिहिलेली शिवचरित्रे प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजेत.

पाच-पन्नास पानांत आटोपलेली, चर्चांचं गुऱ्हाळ फिरवून मोठाले निष्कर्ष काढल्यागत ठाम विधानं करणारी काही गल्लाभरू पुस्तकं उपलब्ध आहेत. अशा पुस्तकांपासून व ती पुस्तकं वाचून शिवचरित्रावर लंबीचौडी व्याख्यानं देणाऱ्यांपासून सुज्ञ वाचकाने व शिवप्रेमींनी लांब राहिले पाहिजे.

शिवचरित्रावरील आधुनिक संशोधनपर ग्रंथ:

१. राजा शिवछत्रपती (पुर्वाध आणि उत्तरार्ध) - बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रविषयक उपलब्ध पुराव्यांचा वापर करून बाबासाहेबांनी अतिशय रसाळ भाषेत हे चरित्र लिहिले आहे. शिवचरित्राचे मर्म जाणून बाबासाहेबांनी ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी बऱ्याच वाचकांना ही साधारण कादंबरी वाटत असे. पण गेल्या काही वर्षांपासून या शिवचरित्रांच्या आवृत्त्यांमध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या विधानांस कोणकोणते पुरावे आहेत, ते त्या त्या प्रकरणाच्या शेवटी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चोखंदळ वाचकांना ते सहज अभ्यासण्यासारखे झाले आहेत व अभ्यासकांसाठी हे चरित्र एक महत्वाचे साधन ठरले आहे.

२. श्री राजा शिवछत्रपती (भाग १ व २) - गजानन मेहेंदळे

हे एक साधार व वस्तुनिष्ठ चरित्र आहे. या चरित्रात कोणत्याही प्रकारचे लालित्य लेखकाने प्रकर्षाने टाळले आहे. समजा, शिवचरित्रातील एखाद्या प्रसंगाचे पुरावे तुम्हाला हवे असतील, तर खुशाल हे पुस्तक काढून बसावे. त्या त्या प्रसंगाशी निगडीत सर्व विश्वसनीय पुरावे एका ठिकाणी मिळतील. एखादा पुरावा विश्वसनीय नसेल, तर तो का विश्वसनीय नाही; याचेही विवेचन लेखकाने केले आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा ज्याला अभ्यास करायचा आहे, त्याने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. दुर्दैवाने हे शिवचरित्र अपूर्ण आहे, पण पुढील भाग येत्या काही वर्षांत प्रकाशित होतील.

३. Shivaji his life and times - Gajanan Mehendale

मेहेंदळे यांनीच लिहिलेले हे इंग्रजी शिवचरित्र असून, ते संपूर्ण (१६३० ते १६८०) आहे.

४. शककर्ते शिवराय (खंड १ व २) - विजयराव देशमुख

हे शिवचरित्र साधार, तसेच सोप्या भाषेत लिहिलेले आहे. चरित्र वाचत असताना आपण एक प्रमाणित शिवचरित्र वाचत असल्याचा वाचकाला आनंद होतोच, शिवाय चरित्राची भाषा सोपी व रोचक असल्याने वाचक मुग्ध होतो. शिवचरित्रावरील उपलब्ध सर्वच साधनांचा विजयरावांनी लिखाणात समावेश केला आहे, तिथे साधनांची विश्वसनीयता फारशी गृहीत धरली नाही, ही या शिवचरित्राची एक मर्यादा मानावी लागेल.

५. Shivaji the Great vol. 1 to 4 - Dr Balkrishna

या शिवचरित्राची पहिली आवृत्ती १९३२साली आली होती. बाळकृष्ण यांनी परकीय साधनांचा वापर करून एक विस्तृत शिवचरित्र लिहिले आहे. हे चरित्र वाचायचे असल्यास सध्या डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेले, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे उपलब्ध आहे. किंवा National digital library of India या वेबसाईटवर जुन्या आवृत्तीचे सर्व खंड पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत.

६. क्षत्रियकुलावंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र - कृ. अ. केळूसकर

आधुनिक काळात लिहिलेले शिवाजी महाराजांचे सगळ्यात जुने पण साधार चरित्र म्हणता येईल. पण त्याकाळी फारसे संशोधन झालेले नसल्याने केळूसकर यांचा भर बखरींवर आहे. शिवाय या चरित्रावर आता प्रताधिकार (कॉपीराईट्स) नसल्याने काही प्रकाशकांनी यात मनाजोगते बदल करूनही हे पुस्तक छापल्याचे समजते. तेव्हा वाचकांनी पुस्तक तपासून घ्यावे किंवा जुनीच प्रत अभ्यासावी.

७. शिव-चरित्र निबंधावली

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या 'शिवचरित्र कार्यालयाने' प्रकाशित केलेला ग्रंथ ! अवघ्या चारशे पानांत शिवचरित्राची साधार व सुगम मांडणी दहा दिग्गज इतिहासकारांनी केली आहे. शिवचरित्राच्या कोणत्याही अभ्यासकांना या ग्रंथाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

८. Shivaji - Setumadhavrao Pagadi

(हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे, ज्यांंना थोडक्यात शिवचरित्राचा आढावा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी उत्तम आहे)

याशिवाय काही चरित्रांची नावे सांगतो -

९. छत्रपती शिवाजी महाराज चरित्र (पुर्वाध व उत्तरार्ध) - वा. सी. बेंद्रे.

१०. श्री. छत्रपती आणि त्यांची प्रभावळ - सेतुमाधवराव पगडी.

११. अशी होती शिवशाही - डॉ. अ. रा. कुलकर्णी.

१२. छत्रपती शिवाजी महाराज - प्र. न. देशपांडे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ.

१३. समरधुरंधर (डॉ. केदार फाळके यांच्या Shivaji's visit to Agra या पुस्तकाचा मराठी अनुवाद) - विद्याचरण पुरंदरे.

१४. Shivaji and his times - Jadunath Sarkar.

१५. The Grand Rebel - Dennis kincaid.

१६. युगप्रवर्तक शिवाजी महाराज यांचे चरित्र - वा. कृ. भावे.


१. शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वच ग्रंथ वाचले पाहिजेत का ?

या प्रश्नाचे उत्तर अर्थातंच 'हो' असे आहे. शिवाय ही एक किमान यादी आहे. यापुढेही संशोधनास वाव आहे.(

संदर्भ : डॉ. सागर पाध्ये)


सरकारी शिवचरित्रकार

अलीकडे दोन-चार पुस्तके वाचून स्वत:स शिवव्याख्याते, शिवलेखक, शिवश्री म्हणवणाऱ्या ठेकेदारांचे तण उगवले आहे ! या ठेकेदारांनी शिवचरित्राचा खेळ करून ठेवला आहे.

वास्तविक शिवचरित्राचा अभ्यास म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे.

एक मराठी माणूस म्हणून मला शिवाजी महाराजांविषयी प्रेम आहे, शिवचरित्राविषयी आस्था आहे; म्हणून जेव्हा मी शिव चरित्रला बद्दल जो सरकारी राजाश्रय असलेला खेळ सुरु झाला त्याने व्यथित झालो  - संतापलो आणि मला समजलेले सत्य लोकांसमोर मांडावे म्हणून हा लेखन प्रपंच केला.

महाराष्ट्रात शिवशाही सरकार :

स्वातंत्र्या पासून 1995 पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. अपवाद 1978-80 ची दोन वर्षे जेव्हा पुलोद सरकार होते. पण त्या सरकार चे मुख्यमंत्री शरद पवार होते - जे मुळचे काँग्रेसी होते.

1995 मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि  बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना - भाजपा चे शिवशाही सरकार स्थापन झाले. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन राज्य चालवेल असे घोषित केले होते.

पुरोगामी महाराष्ट्र :

त्यानंतर जेव्हा 1999 साली पुन्हा सत्तांतर होऊन काँग्रेस - राष्ट्रवादी चे सरकार आले. आधीचे शिवशाही तर यांचे पुरोगामी - शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने राज्य चालवले.

मात्र हे पुरोगामी सरकार असताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारस्या मध्ये त्यांनी ढवळा ढवळ अप्रत्यक्षपणे सुरु केली.

शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कसा सेक्युलर होता आणि आहे हे प्रत्येक क्षेत्रात सिद्ध करण्यासाठी जणू स्पर्धा सुरु झाली.

मग सांस्कृतिक वारसा बहुजनांचा आहे हे दाखवण्यासाठी अण्णाभाऊ साठे या मुळचे कम्युनिस्ट लोकशाहीर यांना अचानक महत्वाचे स्थान दिले जाते.

सेक्युलर शिवाजी महाराज 

त्याचप्रमाणे शिवाजी महाराज हे कसे मुसलमानांच्या विरुद्ध नव्हते, धर्मनिरपेक्ष म्हणजेच सेक्युलर होते हे दाखवण्याचा चंग सुरु झाला.

त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे शिवाजी महाराज घराघरात पोचवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना बदनाम करणे जरुरी होते.

ते काम केले सरकारी इतिहासकार श्रीमंत कोकाटे या माणसाने. त्याने पुरंदरे सांगत असलेला इतिहासच चुकीचा आहे असा अपप्रचार सुरु केला.

त्यासाठी बाल की खाल काढतात त्या रीतीने पुरंदऱ्यांच्या वक्तव्याचा आणि लिखाणाची चिरफाड सुरु केली. पुरंदरे यांनी जिजाऊ माईंचा अपमान केला अशी खोटी वावडी उठवण्यात आली.

दादोजी कोंडदेव तसेच समर्थ रामदास यांच्याबद्दलही आरोप केले गेले.

इतिहासाबद्दल बोलताना प्रत्येक घटनेला काही प्रूफ नसते. अनेकवेळा पाण्याचे भांड अर्ध भरलेलं की अर्ध रिकामे अशी स्थिती असते.

खरे तर दोन्ही गोष्टी बरोबर असतात पण कोणी भांडायचं ठरवले की काय करणार? कोकाटेनी नेमक तेच केलं.

जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव यांच्यातल्या संभाषणाचा उल्लेख 'कुजबुज ' असं केला म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागले. जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी चुकीचे अर्थ लावले गेले - प्रसिद्ध केले गेले. अशी मानसिकता ही केवळ विकृत लोकांची असू शकते.

जेम्स लेन या परदेशी पत्रकाराने आपल्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्य मजकूर छापला त्याचे खापर पण बाबासाहेब पुरंदऱ्यांवर फोडण्यात आले. राज्यातील काही पुरोगामी नेत्यांनी तर पुरंदर्यान्विरुद्ध रानच पेटवले. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये म्हणून जंग जंग पच्छाडले. का तर पुरंदरे ब्राह्मण होते म्हणून.

आम्हाला काही करून शिवाजी महाराजांची छबी एक बहुजनांचा राजा - जो मुसलमान लोकांचा आदर करायचा - अशी करायची आहे मग घाला ब्राह्मण्णांना शिव्या - मग त्यासाठी कोणा एका कुलकर्णी नावाच्या सरदाराने महाराजांवर हल्ला केला की जणू साऱ्या ब्राह्मण जातीच्या लोकांचे हे कृत्य आहे अशा आविरभावात हे सर्व वागतात.

जेम्स लेन प्रकरण :

शरद पवार यांनी नुकतेच उल्लेख केलेल्या जेम्स लेनच्या पुस्तकावर ते पुस्तक प्रकाशित झाले तेव्हाच वाचल्या बरोबर त्यातील मजकूर आक्षेपार्ह वाटल्याने त्या पुस्तकावर बंदी घालावी म्हणून पुण्याचे तत्कालीन खासदार प्रदीपदादा रावत, बाबासाहेब पुरंदरे, जयसिंग पवार,निनाद बेडेकर, सदाशिव शिवदे, वसंत मोरे आदी इतिहासकार मंडळी यांनी सरकार व प्रकाशकाकडे पत्र दिले, प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे या पुस्तकावर बंदी घातली गेली. 


पण हे प्रकरण एवढ्या वरचं थांबत नाही. 'शिवाजी ; अ हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या जेम्स लेन लिखित पुस्तकावरील बंदी उठवावी असं महाराष्ट्रातील काही लोकांना वाटलं आणि त्यांनी त्यासाठी न्यायालयीन कारवाई चालू केली. महाराष्ट्रात असलेल्या तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकार तर्फे न्यायालयात सबळ बाजू मांडता न आल्याने या पुस्तकावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. 

या पुरोगामी लोकांची मोडस ऑपरेंडी लक्षात घ्या. हे लोक एका मुखवट्या आडून समाजात अस्वस्थता निर्माण करणारे साहित्य, कला,इतिहास प्रसारित करतात. दुसऱ्या तोंडाने त्यावर गदारोळ निर्माण करतात. तिसऱ्या तोंडाने समाजाला चिथावणी देतात. चौथ्या तोंडाने हिंसाचाराची ठिणगी टाकतात आणि समाजाचे सगळं नुकसान घडून गेल्यावर स्वतःच एक सत्यशोधन कमिटी निर्माण करून भलत्याच व्यक्तींवर खापर फोडतात. वेळप्रसंगी पोलिसांवरच चौकशी कमिटी बसवून त्यांना निलंबित करायला लावतात, कधी कधी न्यायालयीन खेळ करून पोलिसांनाच अटक करायला लावतात व संपूर्ण पोलीस दलाचे मानसिक खच्चीकरण करतात. 

कायम काही विशिष्ठ समाजापुढे भाषण करणारे, ब्रिगेडी राजकारणी आणि सरकारी इतिहासकार कोकाटे एका भाषणात म्हणाले होते -  की फक्त अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्य्राहून सुटका म्हणजेच शिवचरित्र नव्हे. शिवरायांची लढाई ही हिंदू - मुस्लिम लढाई नव्हती. रामदास महाराज शिवरायांचे गुरू कधीच होऊ शकत नाहीत. आई जिजाऊंमुळे त्यांना मुळात बाह्य गुरूची गरजच नव्हती. दुर्दैवाने आजपर्यंत शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहासच लोकांपर्यंत पोचवला गेला. खरा इतिहास समाजापर्यंत पोचवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 😡😡

शिवाजी महाराजांबद्दल वाटेल ते लिहीणारे अनेक होऊन गेले आहेत. नेहरूंच्या १९३४ च्या "Glimpses of world history" पुस्तकातला उल्लेख असाच नकारात्मक होता. (उदा.: When only a boy of nineteen he started on his predatory career) अजून एक उदाहरणादाखल: (आऊटलूकच्या) विनोद मेहतांनी इंडिपेंडन्स नावाचे वर्तमानपत्र मुंबईत चालू केले त्यात उगाच जाता येता - यशवंतराव आणि शिवाजीमहाराजांसंदर्भात वाटेल ते लिहीले... प. बंगालमधले देखील असे काही इतिहासकार होते ज्यांनी शिवाजीबद्दल काही अंंशी का होईना नकारात्मक कधीकाळी लिहीले होते. अगदी जेम्स लेन प्रकरण जेंव्हा प्रकाशात आले तेंव्हा म्हणजे २००४ च्या सुमारास आउटलूक इंडीया मधे प्रकाशीत झालेल्या शिवाजी आणि सद्य राजकारणा संदर्भातील लेखाचे शिर्षक देखील बरेच काही सांगून जाते...

See how derogatory references made by Sambhaji Brigade about Purandare and spreading false stories that he apologized.

शिवाजी महाराजा च्या जयंती चा वाद निर्माण करणार्या बाबा पुरंदरे नी मरते शेवटी मान्य केले की २ वेळा जयंती साजरी करून मोठा वाद निर्माण करण्या मध्ये त्याचा हात आहे

शिवाजी महाराजा ची जयंती तिथी प्रमाणे साजरी करून त्यांना फक्त महाराष्ट्र मधील पुणे पुरते मर्यादित करण्याचा बाबा पुरंदरे चा बामणी कावा होता

पण जागृत शिव प्रेमी नी हा बामणी कावा उधळून लावला

बाबा पुरंदरे ने स्वत च्या हस्तक्षारा मध्ये शिवप्रेमी भटांचे कर्दनकाळं अमरजित पाटील याना माफीपत्र लिहून दिले

बाबा पुरंदरे ने स्वत च्या हाता ने लिहिलेले पत्र पाहून तरी बामना ना अक्कल येईल त्यांना समाजात असेल की मराठे त्यांची बिन पाण्याने का करत आहेत.

(प्रत्यक्षात बाबासाहेब पुरंदरे यांचे पत्र फोटो सोबत दिला आहे तो पहा म्हणजे कळेल बाबासाहेब यांना काय म्हणायचे होते.)


बाबासाहेब पुरंदरे स्वःता म्हटलेले आहेत, त्यांनी लिहिलेला ६० ते ७०% इतिहासच खरा आहे आणि बाकी तर्क लावून लिहिलेला आहे. त्यांनी गड किल्ले सर करत इतिहासाच्या पाऊल खुणा तपासत जेवढे पुरावे मिळाले तेवढा खरा मांडला आणि हि गोष्ट सहाजिक आहे. कोणत्याच इतिहासकाराला महाराजांचा १००% खरा इतिहास मांडता येणं शक्य नाही. विशेष पुरंदरे स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नाहीत, हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मी काही इतिहासकार नाही म्हणूनच त्यांना शिवशाहीर म्हणतात. विशेष त्यांच्यापेक्षा कमी कष्ट घेतलेले, नीट अभ्यास न केलेले दुसर्यांच्या कादंबऱ्यांवर अवलंबून असणारे लोकं स्वतःला इतिहासकार म्हणवून घेतात.

पुरंदरेंच्या इतिहासात नक्कीच चुका आढळणार त्यात काही चूक नाही कारण इतिहासकारांना मांडायला काही नोंदी, काही पत्रे, संदर्भ, गडकिल्ले या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. दुसरी गोष्ट प्रत्येक इतिहासकाराची वेग वेगळी मते असू शकतात आणि असणारच पण प्रत्येक इतिहासकार स्वतःच्या जातीमधील पात्रांना श्रेष्ठत्व, महत्व प्रदान करण्याचा प्रयत्न करत असतो. खरंतर हे चुकीचं आहे. पण हेच वास्तव आहे.

कोकाटे आणि पुरोगामी ब्रिगेड ची आणखी एक धूळफेक म्हणजे शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्य स्थापले नाही. तर शिवाजी राजे सेक्युलर होते.

*हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचे राज्य असं होत का?*

प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ हेगेल यांनी इतिहासाच्या तत्वज्ञानाची भूमिका मांडताना असे सांगितले की, "विशिष्ट काळी विशिष्ट राष्ट्राला एक पूर्वनियोजित कार्य करावे लागते. तेच त्या राष्ट्राचे अवतार कार्य."

'हिंदवी स्वराज्य' हे महाराष्ट्राचे 'अवतार कार्य' ठरले. 'हिंदवी स्वराज्य' हे शब्द भूभागाशी निगडित आहेत, धर्माशी नाही. हे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी दादाजी नरस प्रभू याना लिहिलेल्या पत्रात आढळतात. ही भूमी हिंदवासीयांची आहे आणि येथे हिंदवी स्वराज्य नांदले पाहिजे, हीच मराठयांची भूमिका राहिली. कर्नाटकच्या स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपडे यांना सविस्तर पत्र लिहिले होते. त्यात महाराजांनी लिहिले होते की, "….आपली पातशाही जितकी वाढवू ये तितकी वाढवणे. पठाणांची नेस्तनाबूद करणे, दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे हे करावे."

नियतीने महाराष्ट्रावर सोपवलेले अवतारकार्य बऱ्याच प्रमाणात पूर्ण केले असे म्हटले पाहिजे, कारण मराठयांचा घोड्यांच्या टापानी तुडवलेल्या भूमीवरच आजचा भारत देश शिल्लक उरला आहे.

शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांना, अगदी मुस्लिमांना सुद्धा खुप मानाने वागविले. त्यामुळे शिवाजी महाराजांची "हिंदवी" स्वराज्याची मनी आस बाळगली.

या मागे जिजामाता यांची पण शक्ती उभी होती. म्हणून जिकडे तिकडे नारे गुंजत असत, "जय जिजाऊ - जय शिवराय !" एवढी रयत जनता शिवमय झाली होती. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा ! असे महाराज म्हणत यामागचा उद्देश अशा प्रकारे शिवधर्मीय मातृप्रधान समतावादी व न्यायवादी समाजनिर्मिती. सामाजिक, आर्थिक, व राजकीय समता व समानता स्त्री-पुरुष भेद नाही. महाराजांनी स्त्रियांचा समाज निर्मितीत संपूर्ण सहभाग घेतलेला होता. त्यांना घरच्या घरी युद्धसामुग्री तयार करणे राज्यासाठी उपयुक्त साहित्य तयार करणे. असे काम दिले जाई.

शिवरायांचा सर्व पत्र व्यवहार व दैनंदिन जीवन याच "श्री" ने सुरु होत असे. म्हणूनच हे राज्य व्हावे ही "श्रीची" इच्छा आहे असे महाराज म्हणत असत. महाराजांच्या स्वराज्याच्या माता म्हणजे जिजामाता होय.

असो

आमची महाराष्ट्राच्या सर्व पुरोगामी राजकारण्यांना एकच विनंती आहे की फालतू राजकारण बंद करा.

छत्रपती शिवाजी महाराज  - व्यक्ती, विचार, सामर्थ्य तुमच्या कोत्या विचारसरणीच्या खूप पुढे आहेत.

तेव्हा कोती राजनीती थांबवा.

शिवाजी महाराज की जय!!

@दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained