श्रीलंकेवर अस्तित्वाचे संकट

श्रीलंका-चारही बाजूने समुद्राने वेढलेला एक छोटासा देश. आपल्या पुराणात ‘सोन्याची लंका’ असा उल्लेख. म्हणजे एकेकाळी खूप श्रीमंत असा देश. आता कुणालाही आयुष्यात एकदा तरी तिथे जाऊन सुट्टी साजरी करावी असं वाटणारच. 

जगभरातील प्रवासी तिथं येतात. प्रचंड निसर्गसौंदर्य. त्याच देशाच्या सैन्य दलातील एक अतिशय उच्च अधिकारी. राजकीय घराण्याचा वारसा लाभलेला. आपल्या दैदीप्यमान कामामुळे अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त करतो. अतिशय हुशार. १९९८मध्ये अचानक स्वेच्छा निवृत्ती घेतो. माहिती तंत्रज्ञान मध्ये आपलं करिअर करायचं ठरवतो. आपला देश सोडतो. अमेरिकेत जातो. तेथेच रमतो.

२००५ मध्ये आपल्या मोठ्या भावाच्या प्रचारासाठी परत आपल्या देशात येतो. भाऊ राष्ट्राध्यक्ष बनतो. आणि त्याला त्या देशाचे डिफेन्स सेक्रेटरी बनवले जाते. अतिशय महत्त्वाची जबाबदारी दिली जाते. संरक्षण व त्यासोबत नागरी विकास  अशी महत्त्वाची खाती त्याच्याकडे येतात.  दहा वर्षे तो तेथील अल्पसंख्यांक असलेल्या तमिळ लोकांची कत्तल करतो. तमिळ दहशदवाद नष्ट करतो. मानवी हक्कांचा नाश होतोय असे संपूर्ण जग बोलत असतं. पण तो बनतो तेथील बहुसंख्य लोकांचा मसीहा. त्याने केलेल्या कत्तलीमुळे त्याचे पाठीराखे त्याला ‘एक्स टर्मिनेटर’ म्हणू लागतात. आपल्या देशाला असंच मजबूत नेतृत्व पाहिजे असं सगळ्यांनाच वाटू लागतं.  त्याच्याच काळात हम्बनतोटा पोर्ट, एमआर इंटरनॅशनल एअरपोर्ट, क्रिकेट स्टेडीअम, मोठमोठे सहा पदरी हाय वे, अशा प्रकारचे  इतिहासाने दखल घ्यावी असे विकास प्रकल्प राबवण्यात येतात.  त्याचं देशप्रेम, त्याची विकासाची दृष्टी, त्याचं मजबूत नेतृत्व, त्याचा बहुसंख्य लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि अल्पसंख्याकांना ठेचून काढायची वृत्ती यामुळे तो प्रचंड लोकप्रिय होतो.  अधून मधून त्याच्या जीवाला धोका आहे, दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे-अशा बातम्या येत राहतात. लोकांची सहानुभूती, निष्ठा आणि प्रेम वाढतच जातं. 

प्रखर राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय सुरक्षा, कमी कर आणि आर्थिक सुधारणा करून सर्वच देशवासियांना सुबत्ता मिळेल हा वादा देऊन तो २०१९ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवतो. आणि प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून येतो. त्या सत्तर वर्षाच्या नेत्याचं नाव आहे : एन. गोताबया राजपक्ष.    

श्रीलंकेतील बहुसंख्य असलेल्या सिंहली बुद्ध लोकांना वाटतं की आता आपला देश मजबूत हातात आहे. आपल्या व आपल्या देशाच्या सुरक्षेला काही धोका नाही. आपण आर्थिक दृष्ट्या प्रचंड संपन्न होऊ. आपल्याला मानसन्मान मिळेल. म्हणजे तेच सुरक्षा, सन्मान, सुबत्ता आणि प्रखर राष्ट्रप्रेम. ‍‍‌तरुणांना वाटतं की आपल्याला नोकऱ्या मिळतील. भरपूर कमाई होईल. 

मग एकेक गोष्ट लक्षात येऊ लागते. राज्यकर्त्यांच्या चुका लक्षात येऊ लागतात. विकास सर्वांनाच हवा असतो. पोर्ट, एअरपोर्ट, मोठमोठे रस्ते, स्टेडीअम पाहिजे असतात. पण एकदम भव्य दिव्य अतिशय महागडे बनवायची गरज नसते. विशेष म्हणजे तज्ज्ञ मंडळीचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. संपूर्ण देशातील लोक माझ्या सोबत आहे, मी काहीही करू शकतो, असं म्हणून चालत नाही.

प्रचंड महागडा, भव्य दिव्य, नेत्रदीपक एमआर इंटरनॅशनल एअरपोर्ट बांधण्यात येतो. सर्व पर्यावरण वाले आरडा ओरडा करतात. पण ऐकलं जात नाही. अनेक हत्तींना बेघर करून आणि पर्यावरणाची राखरांगोळी करून तो  एअरपोर्ट बांधण्यात येतो. असंख्य दुर्मिळ ‘मायग्रेटेड’ पक्षी त्या ठिकाणाहून येतजात असतात. विमान आलं की त्या रनवे वर चिरडले जातात. व्यावहारिक दृष्टीकोन न ठेवल्यामुळे व तज्ज्ञ मंडळींचा सल्ला न घेतल्यामुळे तो प्रकल्प अपयशी ठरतो. त्यांना इतिहास घडवायचा होता. आणि जगाच्या इतिहासात त्याची नोंद होते the Quietest Airport किंवा  the Most Silent Airport. कुणीही येत नाही. कुणीही जात नाही. तसंच काहीसं होतं भव्य दिव्य रस्ते आणि स्टेडीअम बद्दल. नुसता नुकासानिशी सामना.

आता हम्बनतोटा पोर्ट चं बघा. असं म्हटलं जातं की चीन ने मुद्दाम होऊन भरपूर कर्ज देऊन श्रीलंकेला ते बंदर बांधायला लावलं. प्रचंड पैसा खर्च करून त्या बंदराची स्थापना होते. हेतू हाच काही तरी भव्य दिव्य करायचं. इतिहास घडवायचा. खर्च खूप उत्पन्न काहीच नाही. त्या छोट्याशा देशाला हा पांढरा हत्ती पाळणं जमत नाही. परिस्थिती अशी होते की ते संपूर्ण बंदरच ९९ वर्षाच्या कराराने श्रीलंकेला हातापाया पडून चीनला विकावे लागते.     

आपल्या देशातील उद्योगपतींना व व्यावसायिकांना फायदा व्हावा म्हणून तो जीएसटी एकदम कमी करतो. कदाचित त्यांना वाटत असावं की असं केल्यानं मोठ्या प्रमाणावर व्यापार होईल. खरेदी विक्री वाढेल. आणि त्या प्रमाणात जीएसटी ही वाढेल. पण दुर्दैव! अचानक कोरोनाचे दिवस सुरु होतात. वर्ष दोन वर्ष असेच निघून जातात. जगभरातून विशेषतः रशिया व युक्रेनमधून मोठ्या प्रमाणावर येणारे व महिनोनमहिने तेथे राहणारे प्रवासी बंद होतात. मोठ्या प्रमाणावर मिळणारं परकीय चलन आटायला सुरुवात होते.  गोताबया तेथील देशाची सेन्ट्रल बँक सुद्धा आपल्या मर्जीप्रमाणे चालवतो.  

माननीय राष्ट्राध्यक्ष एन. गोताबया राजपक्ष चे अनेक कारनामे समोर येऊ लागतात. पण तो हटत नाही. त्याचा डॉक्टर मित्र त्याला सांगतो की रासायनिक अन्नधान्य, भाजीपाला खाल्ल्यामुळे लोकांना किडनीचे आजार होत आहेत. लगेच एक दिवस तो जाहीर करतो की रात्री बारा वाजल्यापासून आपल्या देशात कुणीही रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशके वापरणार नाहीत. शंभर टक्के सेंद्रिय शेती. संपूर्ण देशाला एक जबरदस्त धक्का. सामान्य लोक म्हणतात आपल्या नेत्याने निर्णय घेतलाय म्हणजे काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. त्याचे कट्टर पाठीराखे म्हणतात, हा आपल्या नेत्याने मारलेला एक ‘मास्टर स्ट्रोक’ आहे. एकीकडे संपूर्ण प्रजेला उत्कृष्ट आरोग्य लाभेल आणि दुसरीकडे रासायनिक खते वगैरे ची आयात करावी लागणार नाही. आपले परकीय चलन वाचेल. आहे की नाही ‘डबल मास्टर स्ट्रोक’!  

पण तेथील कृषी व आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी त्यांच्या SAEA या संस्थेमार्फत या निर्णयाचे काय वाईट परिणाम होऊ शकतात हे सांगायचा प्रयत्न करतात. पण राजाच तो. संपूर्ण प्रजा सोबत आहे, म्हणाल्यावर. निर्णय लवकर बदलत नाही. 

‘एका रात्रीतून शंभर टक्के सेंद्रिय शेती करता येत नाही. त्याला टप्प्याटप्प्याने नियोजनबद्ध करावी लागते. आठ दहा वर्षे जातात. संपूर्ण रबराची झाडं जळतील, भात शेतीचं उत्पादन खूप कमी होईल. फळे भाजीपाला नष्ट होईल, इतर पिके हातातून जाईल. आपण नष्ट होऊ. आपला देश बरबाद होईल. कृपया असं करू नका...’ असे सर्व सल्ले ऐकण्यात त्या देशाच्या सर्वच लोकांचा पाठींबा असलेल्या नेत्याला  रस नसतो. 

परिणाम व्हायचा तोच होतो! सर्वच पिकांची बरबादी. रबराची निर्यात बंद. मसाल्याचे पदार्थ, चहा, वगैरे ची निर्यात ही जवळपास बंद. पहिल्यांदाच इतर पदार्थासोबत भात ही आयात करायची वेळ येते. परकीय चलन संपू लागतं.

मग गोताबयाचा आणखी एक मास्टर स्ट्रोक! तीनशे पेक्षा जास्त वस्तूंची यादी जाहीर करतो आणि त्या वस्तू आयात करू नये, असं फर्मान काढतो. श्रीलंका रेडीमेड कपड्यांचीही निर्यात करतो. पण त्यासाठी लागणारे बटन्स त्यांना आयात करावे लागतात. पण त्या बटनच्या आयातीवर बंदी येते. आणि थोडेफार परकीय चलन मिळू शकेल असा व्यवसाय बंद होतो. तेथे ऑटोमोबाईल पासून इलेक्ट्रोनिक च्या सर्वच वस्तू आयात कराव्या लागतात. एका रात्रीतून त्या आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंचा व्यापार करणारे सर्वच दुकानदार आपली दुकाने बंद करून बेकार होऊन जातात.     

इतर देश, जागतिक बँक, आय एम एफ-सर्वांच्याच लक्षात येतं की आता श्रीलंकेला कर्ज द्यायचं म्हणजे ती रक्कम आधीच बुडीत खात्यात जमा करायला पाहिजे. परतफेड अशक्य. तरीसुद्धा  सर्वात आधी मदत करायला पुढे येतो एक शेजारी देश. जगातील एक गरीब देश म्हणून हिणवल्या गेलेला देश. मोठ्या प्रयासाने आपली अर्थव्यवस्था सुधारून उभा राहिलेला देश. आपला शेजारी बांग्लादेश. पुढे मदत करतो आपला भारत देश. पण हे काही पुरेसं नसतं.  

मग जगभरात पसरलेल्या अनिवासी लोकांना विनंती केली जाते. कृपया डॉलर जमा करा. आपल्या देशाला गरज आहे. पण आभाळच फाटलं म्हणल्यावर कुठं कुठं थिगळ लावणार?       

आता परिथिती एकदम भयानक आहे. विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जाऊ शकत नाही. कारण प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका साठी कागद नाही. असंख्य रुग्ण तडफडत आहेत. औषधं नाहीत. सर्वच व्यावसायिक गुपचूप बसलेत. पावर सप्ल्याय नाही. सामान्य लोक पेट्रोल पंपावर रांग लावून आहेत. थोडंसं पेट्रोल मिळावं म्हणून एकमेकांचा जीव घेताहेत. श्रीलंकन सेनेला पेट्रोल पंप मॅनेज करावे लागतेय. काही दिवसांपूर्वी गोताबयाला देव मानणारे लोक आता ‘गो बॅक, गोता’ चे पोस्टर्स हातात घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.

===============

खरी गम्मत तर अशी आहे की ‘इमोशनल इश्यूज’ मुळे जनतेकडून प्रचंड पाठिंबा मिळाल्यामुळे तेथील राज्यकर्त्यामध्ये आसुरी आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. त्यांच्या बेलगाम हुकुमशाही वृत्तीमुळे त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय श्रीलंकेला व तेथील लोकांना जगापुढे भिक मागण्यास भाग पाडत आहेत. इतक्या सुंदर देशाचे रुपांतर एका भिक मागणाऱ्या कटोरी मध्ये झालेले आहे. 

आणि किंमत मोजत आहे तेथील सामान्य लोक!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034