अफगाणिस्तानचा रक्तरंजित इतिहास
अफगाणिस्तानचा रक्तरंजित इतिहास
सध्या अफगाणिस्तानची चर्चा सुरू असली तरी ही भूमी नेहमीच चर्चेच्या आणि वादग्रस्त स्थानी राहिलेली आहे. अफगाणिस्तान हा जगाची कायम युद्धभूमी राहिला आहे. असे असले तरी अन्य देशांच्या तुलनेने आकारमान तसेच शक्तीने क्षीण असूनही या भूमीने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. एकदम ओसाड, बोडक्या वाटणार्या या भूमीवर आजही एकही सम्राट, महासत्ता स्वत:चा पाय रोवू शकल्या नाहीत हीच याची खासियत आहे. ही भूमी जिंकण्यासाठी आणि ती ताब्यात ठेवण्यासाठी अनेकानी जंग जंग पछाडले, पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. सध्या अमेरिकेने आपला हक्क सोडून दिल्यामुळे अफगाणमध्ये पुन्हा तालिबानी हुकूमत लागू होत आहे. सम्राट, महासत्तांचे पराभव पाहिले की, का या अफगाण भूमीला ‘साम्राज्यांचं कब्रस्तान’ म्हटलं जातं, याचा अंदाज येऊ शकतो.
मोठमोठ्या योद्ध्यांना या भूमीने घाम फोडल्याचा इतिहास आहे. त्यात जगज्जेता सिकंदर याचाही समावेश आहे, तसेच मोगल बादशाह औरंगजेबही आहे आणि अलीकडच्या काळातले रशिया-अमेरिकाही. म्हणून याला ‘साम्राज्यांचं कब्रस्तान’ असेही म्हटलं जातं. असं काय गुपित या भूमीत आहे की, इथं मोठ्या योद्ध्यांना हात टेकावे लागले. इथली टोळीबाज संस्कृती येणार्या प्रत्येकाला कशी काय घाम फोडते, हे पाहणे रंजक आहे. अगदी भूतकाळात डोकावले असता इतिहास आठवतो तो विश्वविजेता अलेक्झांडर द ग्रेट म्हणजे सिकंदर ग्रीसचा. त्यानं ठरवलं की, संपूर्ण जग पायाखाली घ्यायचे. त्यासाठी तो मोहिमेवर निघाला. त्याच्या मार्गात येणारे एक एक राज्य, साम्राज्य तो एकापाठोपाठ जिंकत निघाला.
मेसोपोटेमिया, पार्शियाही त्यातून सुटले नाहीत. त्याला भारतात प्रवेश करायचा होता. म्हणून तो शेवटी अफगाणिस्तानमध्ये आला. त्याला वाटलं हा तर एक छोटासा प्रदेश आहे. त्यातही राजा म्हणून असं कुणी नाहीच. सहज जिंकू. पण नेमकी तीच गोष्ट त्याच्या विरोधात गेली. अफगाणिस्तानमध्ये त्या वेळेस छोट्या छोट्या टोळ्या होत्या, त्यांचे सरदार होते, कबिले होते आणि ते सगळे एकमेकांशी तुंबळ युद्ध करायचे. लढण्याची पद्धत गनिमी होती, रानटी होती. हल्ले लपूनछपून केले जायचे. त्यातच समोरचा नामोहरम व्हायचा. सिकंदरलाही याचा मोठा सामना करावा लागला. सिकंदरनेही अफगाणिस्तान जिंकलं, पण ते एका फटक्यात नाही. त्यासाठी त्याला तब्बल तीन वर्षे लढा द्यावा लागला. तो अफगाणिस्तानमध्ये अडकून पडला त्या वेळेस त्याच्या आईने खलिता पाठवून विचारलं होतं, पुढे जाणार की इथेच अडकून पडणार? त्यावर सिकंदरनं स्वत:च्या आईला अफगाणिस्तानची माती पाठवून दिली होती म्हणतात आणि ती माती तिला त्याच्या भूमीत शिंपडायला सांगितली होती. सिकंदरच्या आईनं सांगितलं तसं केलं. थोड्याच काळात तिथं आपापसात भांडणं सुरू झाली.
अफगाणिस्तानच्या मातीचा गुण काय आहे, हे सिकंदरनं स्वत:च्या आईला सांगण्याचा हा प्रयत्न केला. हेच उदाहरण कदाचित आजही अफगाण भूमीला जसेच्या तसे लागू पडते. इथल्या मातीत रानटीपणा आणि वैर ठासून भरलेले आहे.
कंदहार हे अफगाणिस्तानातील एक प्रमुख शहर आहे. एकेकाळी त्याला काबूलपेक्षा जास्त महत्त्व होतं. कारण व्यापारामुळे त्याची भरभराट झालेली होती. भारतातूनच नाही तर इतर मसाल्याचं उत्पादन करणार्या बेटांचाही पर्शिया आणि तिथून पुढे युरोपात जो व्यापार चालायचा, तोही याच कंदहारमधून. विशेष म्हणजे कंदहारची स्थापना मुळात अलेक्झांडर द ग्रेट म्हणजे सिकंदरने केली आहे, हे विशेष. कंदहारचं जेवढं व्यापारिक महत्त्व होतं तेवढंच लष्करी आणि राजकीयही होतं. त्यामुळेच त्यावर ताबा मिळवण्यासाठी मोगल बादशाह आणि पर्शियन राजे यांच्यात नेहमी लढाया व्हायच्या. 1649 ते 1652 दरम्यान मोगलांनी कंदहारला वेढा देण्याचा प्रयत्न केला. शहाजहानचा तो काळ होता. नेतृत्व होतं औरंगजेबाचं. औरंगजेबाच्या पहिल्या स्वारीत 50 हजार सैन्य होतं. त्यानं 14 मे 1649 रोजी कंदहारच्या किल्ल्याला वेढा दिला. 3 महिने 20 दिवस झाल्यानंतरसुद्धा औरंगजेबाला कंदहार जिंकता आलं नाही. त्याला माघार घ्यावी लागली. नंतर पुन्हा औरंगजेब आणि सादुल्लाखान यांनी 2 मे 1652 रोजी कंदहारला वेढा घातला. या वेळेस औरंगजेबाची तयारी पहिल्यापेक्षा जास्त होती. तोफगोळे वगैरे सगळी रसद पुरेपूर होती. पण दोन महिन्यांनंतरही सातत्यानं कंदहारच्या किल्ल्यावर मारा करूनही औरंगजेबाला यश मिळालं नाही. शेवटी शहाजहानने त्यांना परत बोलावून घेतले, हा इतिहास आहे. कंदहारचे अपयश शहाजहानच्या जिव्हारी लागलं. मोगलांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. मोगल राजे लढाई न करता फक्त लाच देऊनच किल्ले जिंकू शकतात, असं त्या वेळेस पर्शियन राजे म्हणायचे. ते खोटं ठरवण्यासाठी शहाजहाननं पुढच्याच वर्षी दारा शुकोहच्या नेतृत्वात कंदहारवर जोरदार चढाई केली. या लढाईत दारा शुकोह याने अफाट पैसा ओतला. संपूर्ण स्वारीचा खर्च हा त्या काळी दहा कोटी रुपये होता, अशा ऐतिहासिक नोंदी आहेत. असं असतानाही दारा शुकोहलाही पराभवच स्वीकारावा लागला. मोगलांची प्रचंड मोठी नाचक्की झाली. औरंगजेबापेक्षा दाराचा पराभव दारुण होता.
अफगाणिस्तानातून रशिया हिंदुस्थानवर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती. त्यातून इराणच्या शाहाने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला 1837 मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले. याच सुमारास रणजितसिंगाने घेतलेला पेशावर प्रांत परत जिंकून घेण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महम्मदाने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महम्मद रशियाकडे गेला. आपल्या वर्चस्वाखाली राहील, असा अमीर अफगाणिस्तानात असावा. म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा यांबरोबर त्रिपक्षीय तह करून शाह शुजा याला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले. दरम्यान, 1838 मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले. सिंधच्या अमीरचा विरोध असतानाही इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड, बलुचिस्तान या मार्गाने कंदहार येथे पोहोचली. शाह शुजाचा मुलगा तैमूर याच्या नेतृत्वाखाली शीख सैनिक व इंग्रज अधिकारी वॉड यांची दुसरी तुकडी पंजाब, पेशावर, खैबरखिंड या मार्गाने कंदहारला पोहोचली. इंग्रजांनी 1839 च्या एप्रिल महिन्यात कंदहार, जुलैत गझनी आणि ऑगस्टमध्ये काबूल घेतले.
इंग्लंड व रशिया यांत अफगाणिस्तानात आपापले वर्चस्व स्थापन करण्याची स्पर्धा होती. त्यातून दुसरे अफगाण युद्ध उद्भवले. वारसा हक्काच्या भांडणाचा निकाल लागून 1868 मध्ये शेरअली हा अमीर झाला. रशियाचे मध्य आशियात वर्चस्व वाढल्यामुळे शेरअलीने इंग्रजांकडे मदत मागितली; परंतु इंग्रजांच्या धरसोडीमुळे त्याने रशियाबरोबर मैत्रीची याचना केली. रशियाचा वकील काबूलला जाताच गव्हर्नर जनरल लिटनने शेरअलीस आपलाही वकील काबूल येथे ठेवून घेण्याचा आग्रह धरला. शेरअलीने ही विनंती नाकारताच गव्हर्नर जनरल लिटनने त्याविरुद्ध युद्ध पुकारले. जनरल रॉबर्ट, जनरल स्ट्युअर्ट व सॅम ब्राउन हे खैबर खिंडीतून अफगाणिस्तानात पोहोचले. इंग्रजांनी कंदाहार घेताच शेरअली रशियाच्या हद्दीत पळाला. त्याचा मुलगा याकूबखान याने इंग्रजांबरोबर 1879 मध्ये गंदमक येथे तह केला. या तहानुसार इंग्रज वकील काबूल येथे वास्तव्यास होता. कुर्रम, पिशी आणि तिवी ही ठिकाणे इंग्रजांच्या ताब्यात आली. अफगाणांना हा तह मान्य नसल्यामुळे त्यांनी काही इंग्रज अधिकार्यांचे खून केले व याकूबखानला कैद केले. त्याचा भाऊ अयूबखान याने बंड करून इंग्रज फौजेचा मैवंद येथे पराभव केला. शेवटी गव्हर्नर जनरल रिपनने शेरअलीचा पुतण्या अब्दुर रहमान याच्याशी तह करून दुसरे अफगाण युद्ध थांबविले. इंग्रजांनी अमीराकडून खंडणी घेऊन गंदमकच्या तहाने सोडलेला प्रदेश परत मिळविला. या युद्धामुळे इंग्रजांचे वर्चस्व अफगाणिस्तानात स्थापन होऊन रशियाच्या आक्रमक धोरणाला पायबंद बसला.
दुसर्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जग दोन महासत्तांमध्ये विभागलं गेलं. कम्युनिस्ट आणि भांडवलदार. सोव्हिएत युनियन कम्युनिस्टांचं नेतृत्व करायचा आणि अमेरिका भांडवलदार देशाचे. अफगाणिस्तानमध्ये कम्युनिस्ट राजवट आणावी म्हणून त्या काळच्या सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानमध्ये थेट रणगाडे घुसवले. हे एक प्रकारचं दुसर्या देशावरचं आक्रमणच होतं. सोव्हिएत युनियन अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केली म्हटल्यानंतर अमेरिका बघ्याची भूमिका कशी घेणार? त्यांनी मग टोळ्यांना मदतीचा हात दिला. सोव्हिएत युनियनच्या विरोधात काही टोळ्यांनी उठाव केला. शस्त्र हातात घेणं त्यांना नवीन नव्हते. गनिमी काव्यानं त्यांनी सोव्हिएत युनियनला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. ह्या टोळ्यांना अमेरिका, पाकिस्तान, इराण, ब्रिटन ह्यांनी पैसा पुरवला, शस्त्र पुरवली. जवळपास 9 वर्षे हे शीतयुद्ध सुरू होते. हे सगळं 1980 च्या दशकात सुरू झालं. 90 च्या आसपास टोक गाठलं. या सगळ्या काळात अफगाणिस्तानची जवळपास 11 टक्के लोकसंख्या कमी झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे किती जीवितहानी झाली असेल याचा अंदाज येईल. शेवटी सोव्हिएत युनियनलाच माघार घ्यावी लागली. हा पराभव एवढा मोठा होता की, त्यामुळे सोव्हिएत युनियनची शकले पडली. आणि हीच ती वेळ होती ज्या वेळी तालिबानचा उदय झाला.
तालिबानचा जन्म किंवा उदय हा कंदहारमध्ये झाला. ज्या टोळ्या, गट रशियाच्या विरोधात लढले त्या तशाच राहिल्या. त्यांच्याकडे अमेरिकेनं पुरवलेला पैसा होता. शस्त्र होती. त्यातून तालिबानचा जन्म झाला. त्यांनी नवी घोषणा दिली आणि ती होती शरीयावर आधारित अफगाणिस्तान बनवण्याची. मोहम्मद नजीबुल्लाह हे राष्ट्रपती होते. त्यांना सोव्हिएत युनियनचा आधी पाठिंबा होता. पण त्यांची शकलं पडली. तो पाठिंबा थांबला. इकडे तालिबान आता सक्रिय झालेले होते. त्यांना काबूल दिसत होतं. तिथली सत्ता दिसत होती. मुल्ला ओमरच्या नेतृत्वात इस्लामिक अमीरात बनवण्याचं लक्ष्य होतं. 1992 साली राष्ट्रपती नजीबुल्लाहनं राजीनामा दिला. इतर ठिकाणी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आलं नाही. संघर्ष सुरूच होता. तालिबान्यांनी एक एक शहर पादाक्रांत केलेलं होतं. नजीबुल्लाहनं शेवटी यूएनच्या हेडक्वार्टरमध्ये आश्रय घेतला. सोबत त्याचा भाऊही होता. पण 1996 च्या सप्टेबर महिन्यात तालिबान्यांनी काबूल काबीज केलं. 27 सप्टेंबर रोजी ते यूएन हेडक्वार्टरमध्ये घुसले आणि नजीबुल्लाहसह त्यांच्या भावाला ठार मारलं. दोघांची प्रेतं चौकात लटकवण्यात आली. एवढंच नाही तर त्यांची गुप्तांगेही कापली. एवढ्या कू्ररपणे तालिबानने राष्ट्रपतीचा शेवट केला. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली.
जगाच्या इतिहासात खळबळ माजली ती 11 सप्टेंबर 2001 मध्ये. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन ट्विन टॉवरवर अतिरेक्यांकडून दोन विमानं आदळवण्यात आली. बघता बघता दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त झाली. या सर्वांसाठी अमेरिकेनं अल कायदाला जबाबदार धरले आणि त्यामधून त्यांना आश्रय देणारे तालिबान अमेरिकेच्या टार्गेटवर आले. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये थेट सैन्य घुसवले. तालिबानच्या विरोधात अनेक मोहिमा हाती घेतल्या. अनेक देशांचे बाहुलं असलेल्या अफगाण सरकारवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. दरम्यानच्या काळात काही वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आला. अमेरिकेचा बदला पूर्ण झाल्याची घोषणा आधी ओबामांनी केली. नंतर ट्रम्पनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आता जो बायडेन यांनी तर हातच वर केल.
गेल्या 20 वर्षांत तालिबानचा अजिबात बीमोड मात्र होऊ शकला नाही. एक ओसामा बिन लादेन मारला, पण तालिबानी वाढत राहिले. काही दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तानमधून गाशा गुंडाळायला सुरुवात केली. तालिबाननं पुन्हा डोकं वर काढलं आणि कंदहार, काबूलसह जवळपास अपवाद वगळता सर्व अफगाणिस्तानवर कब्जा केला. तालिबान म्हणजे अमेरिकेनेच जन्माला घातलेलाच एक भस्मासुरी राक्षस आहे, ज्याचा शेवटी बीमोड करणेही त्यांना जमलं नाही. आजच्या घडीला अमेरिकेची तशीच नाचक्की होते आहे जशी आधी सोव्हिएत युनियनची झाली. त्यामुळेच कधी काळी अमेरिकेच्या पाठिंब्यावर असलेल्या तालिबान्यांना आता चीन, रशिया पाठिंबा देताना दिसत आहेत. याला हिस्ट्री रिपीट असेही म्हटले जाते. सध्या हाच जुना इतिहास नव्याने लिहिण्याचा काळ या भूमीत सुरू आहे.
Comments
Post a Comment