पावसाचा कोकणात हाहाकार

 मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील चिपळूणची स्थिती सर्वाधिक बिकट आहे. चिपळूणमधील बाजारपेठा आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे हजारो लोकांचा जीव टांगणीला आहे. पुण्यातून निघालेल्या एनडीआरएफच्या टीम अद्याप चिपळूणला पोहोचलेल्या नाहीत. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.



याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेली पूरपरिस्थिती याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीचा सामना करताना केंद्राकडून शक्य तितकी सर्व मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं. प्रत्येक जण सुरक्षित राहावा यासाठी प्रार्थना करत आहे,’ असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोकण पट्ट्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं अडचणीत भर पडली आहे. चिपळूणची स्थिती सर्वात बिकट आहे. गेल्या अनेक तासांपासून चिपळूण पाण्याखाली आहे. शेकडो घरांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतीला खूप मोठा फटका बसला आहे. नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच एनडीआरएफची टीम अद्याप दूर असल्यानं मदतकार्य वेगानं सुरू होऊ शकलेलं नाही. दुसरीकडे थोड्याच वेळात समुद्राला भरती येणार असल्यानं चिपळूणमधील पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागणार आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत माहिती दिल्याचे सांगितले आहे.



6

महाड तालुक्यातील तलाई या गावात दरड कोसळल्याची माहिती एएनआयनं दिलीय. या दुर्घटनेमुळे किती नुकसान झालंय, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

22 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणात चिपळूण आणि खेड परिसरात पुराचा तडाखा बसला असून रायगडमधील महाड-पोलादपूर भागात मोठा फटका बसला आहे.

मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे. NDRF ची 9 पथके रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF आणि हवाई मार्गाने बचाव कार्य सुरू झाले आहे.

चिपळूण आणि खेडमधील सद्य:स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड शहरामध्ये पुराचा पाणी शिरलं आहे. भरती आणि अतिवृष्टीची वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली. अनेक लोक अपार्टमेंटमध्ये अडकले आहेत.

बचाव कार्यासाठी सध्या खाजगी 6, कस्टम 1, पोलीस 1, नगरपरिषद 2, तहसील कार्यालयाच्या 5 बोटी मदत करत आहेत.

हवाई दलाचे दोन हॅलिकॉप्टर तैनात असून हवामान अनुकूल झाल्यास हॅलिकॉप्टरद्वारे तात्काळ बचावकार्य करण्यात येणार आहे.

नौदलालाही मदतीसाठी विंनती करण्यात आली असून त्यांची टिम लवकरात लवकर पोहोचेल असं सांगण्यात येत आहे.

एनडीआरएफचे 5 बोटींसह 23 जणांचे पथक चिपळूण येथे पोहोचत आहे. रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे 12 जणांचे पथक रस्सी, लाईफ जॅकेटसह बचाव कार्यासाठी चिपळूण येथे हजर आहे. 'राजू काकडे हेल्प फाऊंडेशन' चे 10 जणांचे पथक खेड व चिपळूण येथे पोहोचत आहे. जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथकही बचावकार्यासाठी पोहोचत आहे.

प्रशासनाकडून ट्रकद्वारे रत्नागिरीहून 2, दापोलीहून 2, गुहागरवरुन 2 बोटी चिपळूणकडे बचावकार्यासाठी रवाना झाल्या आहेत.

आतापर्यंत पुरामध्ये अडकलेल्या सुमारे 100 नागरिकांची सुटका करण्यात आली असून पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर आलेल्या नागरिकांसाठी चिपळूण व सावर्डे येथील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.

चिपळूणच्या आजूबाजूची 7 गावं पुराच्या पाण्याखाली असून सदर गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ व बचाव पथकाद्वारे सुरु आहे.

सद्यस्थितीमध्ये चिपळूण व खेड तालुक्यात कोणतीही मनुष्यहानी नाही. परशुराम घाट तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

खारेपाटण येथील रस्त्यावर पुराच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

भरती साधारण रात्री 11 वाजता सुरु होणार असल्याने सद्यस्थितीत पुराखाली नसलेल्या भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

(दिनांक 24 जुलै चा रिपोर्ट)

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034