चिपळूणचा महापूर-2021

चिपळूणचा महापूर-2021

- यशवंत बर्वे

21 जानेवारी ची उत्तर रात्र. मुसळधार किंवा ढगफुटी म्हणावा असा पाऊस अजिबात पडत नव्हता. अधूनमधून परंतु थांबून थांबून मात्र जोरदार सरी कोसळत होत्या. जुलै मध्ये असा पाऊस अपेक्षित असतोच. चिपळूण मध्ये पाणी भरणे देखील काही नवीन गोष्ट नसली तरीही दरवर्षी किती पाऊस असेल तर किती पाणी भरू शकते याचं एक गणित चिपळूणकर मंडळी बांधतात आणि सहसा ते चुकत नाही. साहजिकच आज देखील चिपळूणकर पहाटेच्या गाढ झोपेत होते. आदल्या दिवशी व्हाट्सउप वर 22 जुलै रोजी दुपारी 11 वाजता कोलकेवडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे असे मेसेज फिरत असले तरी सकाळी उठल्यावर त्या दृष्टीने काही आवराआवर करता येईल अशा अंदाजाने नागरिक आणि व्यापारी निर्धास्त झोपलेले होते.

माझा मुलगा रात्री पुण्याहून निघून पहाटे जेमतेम घरी पोचला. मला फोन करून त्याने चारचाकी आणि दुचाकींची किल्ली घेऊन पार्किंग मध्ये बोलावले त्या वेळी पहाटेचे पाच वाजले होते. मी खाली पार्किंगमध्ये गेलो तेव्हा सौरभने, माझ्या मूलग्याने खेर्डी मध्ये पाणी भरले आहे त्यामुळे आपल्याकडे भरू शकते म्हणून गाड्या मार्कंडी रस्ता जो थोडा उंच आहे तिथे लावतो असे सांगून तो गाड्या लावून आला त्यावेळी म्हणजे 15 मिनिटांमध्ये पार्किंग मध्ये चवडाभर पाणी आले होते. मार्कंडी चा अथर्व बंगलो परिसर येथे सहसा पाणी भरत नाही त्यामुळे आलेच तरी फार तर दोन चार फूट पाणी येईल अशा अंदाजाने आम्ही गाड्या लावून फ्लॅटवर आलो त्यावेळी साडेपाच झाले होते आणि पार्किंग मध्ये चार फूट पाणी शिरले होते. सगळी सोसायटी जागी झाली होती आणि काहीतरी विपरित होणार याचा अंदाज येऊ लागला होता. मी मुलगा सुखरूप घरी वेळेत पोचला म्हणून देवाचे आभार मानले. पुढच्या एक दीड तासात पाणी सहा फुटावर गेले आणि आठ वाजेपर्यंत जवळ जवळ पार्किंग एरिया म्हणजे दहा फूट पूर्ण पाण्याने भरला. आता मात्र सर्वांचे धाबे दणाणले होते. 2005 चा अपवाद वगळता आमच्या या परिसरात कधी पाणी भरले नाही तेथे इतके पाणी असेल तर उर्वरित चिपळूण मध्ये काय स्थिती झाली असेल या विचारात आणि काळजीत आम्ही पडलो. एव्हाना पाण्याने आमची पूर्ण नाकेबंदी केली होती. तो कालचा पूर्ण दिवस पाणी दहा फूट धरून अनेक वस्तू, ओंडके, साप, हातगाड्या, दुचाकी, कोंबड्यांचे पिंजरे आशा अनेक  वस्तू सोबत घेऊन एकाद्या तुफान नदीच्या प्रवाहप्रमाणे धावत होते. आमच्या पुढचे मागचे धक्के कोसळत, आमची हृदये चिरत वाशिष्ठी सागराकडे धावत होती. 



पहाटे पाच वाजता लाईट आणि दहा वाजेपर्यंत मोबाईल रेंज गायब झाल्या होत्या. फ्लॅटच्या खिडकीतून विमनस्क अवस्थेत बाहेरचे दृश्य मी पहात होतो. मधूनच एकदा काळीज फाडणारा काहीतरी कोसळल्याचा आवाज, विजेचा लोळ आणि गडगडाट याने जीव घाबरा होत होता. सोसायटीतले बापये मंडळी चर्चेनंतर अचानक पाणी सोडल्यामुळेच जेमतेम अर्ध्या तासात इतके पाणी भरले या निष्कर्षावर आली होती. बाया माणसे काळजीचा चेहरा घेऊन वावरत होती. संध्याकाळ होऊन अंधार पडला आणि भीतीचा गोळा पोटात येऊ लागला. तीन मजली असलेल्या आमच्या B विंग मध्ये 36 सदनिका आणि साधारण 60 लोकसंख्या. त्यात लहान तान्ही मुले धरून 25 एक बच्चे मंडळी. सकाळी सोसायटी च्या टाक्यांमधले भरून घेतलेले पाणी संध्याकाळी संपत आले. पाऊस होता पण अधूनमधून एकादी जोरकस सर आली की सगळे वरच्या पत्र्याच्या शेडचे पाईप सोडवून येणारे पाणी बादल्यांमधून वापरासाठी भरून घेत होतो. रात्री कोणीच झोपू शकले नाही आणि तो भयानक क्षण आलाच. पाणी पायरी पायरी चढत पहिल्या मजल्यावर प्रवेश करते झाले. पार्किंग भरून जेव्हा पाण्याने मजला गाठला तेव्हा मात्र सगळे जण भीतीने गोठलेच. आता हे जीवघेणे संकट बहुधा सगळ्यांना संपवून संपणार अशी खात्री पटू लागली. आमच्या समोर असलेली दोन बैठी घरे घायकुतीला आली होती. त्यातली माणसे गच्चीवर एका चार महिन्याच्या बाळाला घेऊन आलेली पाहिली. देवाचे नाव घेत सगळेजण बसून होतो. आणि हळूहळू पाणी उतरू लागले. पहाटे 3 वाजता पाण्याने माघार घेतली आणि आम्ही जेमतेम दोन तास डोळे मिटले.

सकाळी समोरच्या बैठ्या घरातील त्या लोकांना शेजारच्या इमारतीतील लोकांनी दोरखंड फेकून आपल्या इमारतीत घेतल्याचे, त्यांना खाऊ पिऊ घातल्याचे कळले. माणुसकीचा झरा देखील पुरासोबत असा वहात होता, उर भरून आला.

सकाळी 9 वाजता सर्व पाणी ओसरले. आम्ही सगळे पुराचेच पाणी घेऊन पार्किंग, ऑफिस, बुडालेले मीटर सारे सारे धुवून काढले. मुक्या रस्त्यावर येऊन गाडीची परिस्थिती पाहिली. गाडी नशिबाने जाग्यावरच होती. परंतु गाडीभर चिखल. 

आता चिपळूण रस्त्यावर फिरायला लागले होते. वाताहत या शब्दाचा अर्थ आज सकाळी मला खऱ्या अर्थाने कळला. आमच्या पार्किंग मधल्या चार चाकी गाड्या एकमेकांवर स्वार झाल्या होत्याच. जिकडे पहावे तिकडे चिखल, राडा, अस्ताव्यस्त भेसूर गाड्या, मोटारसायकल, सायकली यांचा खच. माझ्या चिपळूण शहराची स्थिती केस भादरलेल्या विधवा बाईसारखी भयानक दिसत होती. 

कोरोना मुळे आधीच कंबरडे मोडलेले दुकानदार आपापली दुकाने उघडून सर्वस्व संपलेल्या भावना शून्य नजरेने हसत होते. मला ते त्यांचे हसणे खूप भेसूर वाटले. 27 तासांनंतर पहिली पोलीस गाडी मी पाहिली. मग कोणी पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, कुरकुरे पाकिटे अशा वस्तूंचे वाटप करताना दिसत होते. TRP वर डोळा ठेवून अनेक वाहिन्यांच्या OB व्हॅनस रस्त्यावर दिसत होत्या. मी एक बाटली घेऊन परत फ्लॅट वर आलो. वीज नसल्याने आणि मोबाइलला रेंज नसल्याने काही बातम्या कळत नव्हत्या. एअर टेल, जिओ सारख्या एकाद्या नेटवर्कला रेंज असली तर पुणे, मुंबई, सोलापूर पासून घायकुतीला आलेले नातेवाईक काळजीने चौकशा करत होते तेव्हा TV वरच्या काही बातम्या कळत होत्या. महामार्गावरच्या बहादूरशेख पूलाने  गेली तीन चार वर्षे, माझी सहनशक्ती संपली आहे असा टाहो फोडून अखेर मान टाकली होती. 1990 च्या सुमारास फरशी तिठा येथील गुहागरकडे जाणाऱ्या बायपास वरचा एक पूल खचला होता, चिपळूण मधल्या सखल भागातील एका इस्पितळात जन्म घेतलेल्या दोन दिवसांच्या बाळाने जीव सोडला होता. एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी आठ जणांनी प्राण सोडले होते, पेढे कुंभरवाडीवर हायवेवरून आलेली दरड कोसळून तीन कुटुंबे घरांसह दबली जाऊन तिघांचा करून अंत झाला होता. या केवळ उदाहरण म्हणून बातम्या. अजून अशा कितीतरी घटना उजेडात यायच्या आहेत.

हा माझ्या लेखाचा पूर्वार्ध आहे. खरी सुरवात इथून होते.

काय ही माणसाच्या जीवाची, मालमत्तेची बेपर्वाई?? याला केवळ निसर्ग जबाबदार म्हणून चालणार नाही. याची उत्तरे आता लोकांनी आता समूहाने मागितली पाहिजेत. संबंधित शासन यंत्रणेला याचा जाब विचारला पाहिजे. माझ्या मनात आलेले, उमटलेले काही प्रातिनिधिक प्रश्न :--

1.   भल्या पहाटे लोक झोपेत असताना पाणी सोडण्याची नेमकी सूचना कोणी केली??

2.   या संबंधीची पूर्वसूचना शासनयंत्रणेने योग्य वेळी ध्वनिक्षेपकावरून का दिली नाही??

3.    अवकाशात फिरत असलेल्या उपग्रहांकडून येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून लोकांना सावध का केले गेले नाही??

4.    पाण्याच्या निसर्गाचे नियोजन आयत्यावेळी करण्यापेक्षा अगोदर टप्प्याटप्प्याने का केले गेले नाही??

5.    गेली पाच वर्षे सातत्याने वाशिष्ठीचा पूल धोकादायक झालेला माहीत असूनही महामार्गावरील नवीन पूल योग्य वेळी का पूर्ण होऊ शकला नाही??

6.  महामार्गाच्या रखडलेल्या कामाचे नेमकी जबाबदारी कोणाची आहे??

7.   अर्धवट घाट रस्ता केल्यामुळे सैल झालेली दरड कोसळून झालेल्या हकनाक मृत्यूना कोण जबाबदार आहे??

8.   अचानक अमर्याद पाणी सोडल्यामुळे बेसावध नागरिक आणि व्यापारी यांच्या मालमत्तेच्या नुकासानाला कोण जबाबदार आहे??

9.   दोन दिवसांच्या तान्हुल्याने डोळे उघडण्यापूर्वीच जगाच्या घेतलेल्या निरोपाची जबाबदारी कोणाची आहे??

10. वाशिष्ठीचा घाट पक्क्या बंधाऱ्याने बांधून शहर सुरक्षित करण्याच्या दीर्घकाळ रखडलेल्या प्रस्तावाला जबाबदार कोण आहे??

हे आणि असे असंख्य प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आपण ज्यांच्याकडे मागावीत त्यांच्यातील एक प्रतिक्रिया लोकांच्या घावांवर मीठ चोळणारी आहे. *चिपळूणच्या लोकांना पुराची सवय आहे* ही ती प्रतिक्रिया. तुमचे प्रश्न, अडीअडचणी, संकटे, आपदा, गैरसोयी, नागरी सुविधा या कशा कश्याशीही काडीचा संबंध नसणारी ही प्रतिक्रिया. *केंन्द्राने भरघोस मदत घ्यावी* ही दुसरी प्रतिक्रिया. महाराष्ट्र शासन विसर्जित करून महाराष्ट्र केंद्रशासित करावा अशा अर्थाचीच. 

या आपत्तीत राजकारणावर न बोललेलेच बरे. 2019 च्या डिसेंबर पासून आपण रोज नवीन भीषण संकटांना सामोरे जात आहोत,  हे दुष्टचक्र कधी संपणार आहे??..

द्वारा राजा बर्वे

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034