ठाण्याचे पालक मंत्री श्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांना अनावृत्त पत्र

 *ठाण्याचे पालक मंत्री श्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांना अनावृत्त पत्र*

विषय: ठाणे शहराच्या समस्या आणि त्या एका ठराविक वेळेच्या बंधनात सोडवण्या बाबत

महोदय,

गेल्या वीस वर्षांत ठाणे शहराचे स्वरूप झपाट्याने बदलत गेले आहे. 

गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात स्थिरावत असलेल्या जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेने ठाणे शहराचे मॉल सांस्कृतिक रुपांतर झाले. ठाण्यात लहान-मोठे मिळून बारा-चौदा तरी मॉल असतील. इटर्निटी, स्टारसिटी, कोरम मॉल.

व्हिवियाना मॉलने तर सर्वांना मागे टाकले ते आजतागायत. कारण हा मॉल पाहायला ठाण्याबाहेरचीच नाही तर अगदी दुसऱ्या गावाहूनदेखील आलेली माणसे भेटलीत

घोडबंदर रोडपूर्वी प्रवास करताना जे जंगल वाटायचं, त्याचं आता सिमेंटचं जंगल झालंय. ओस्वाल पार्क जे आम्हाला खूपच लांब वाटायचं, त्यापुढे मानपाडा, लॉकीम्स बापरे केवढी लांब. टिकूजीनी वाडीला मुलांची सहल जायची. आता तर आम्ही घोडबंदरच्या शेवटच्या टोकाला म्हणजे भाईंदर पाड्याला असलेल्या लोढा कॉम्पेक्सलाही सहज जाऊन येतोय. 

ठाणे शहराचे नुसते बाह्य स्वरूप बदलले नाही, तर याचबरोबर या काळात ठाणे शहर एक शिक्षणकेंद्र म्हणूनही उदयाला आले. वीस वर्षांपूर्वी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळवणे, ही पालकांपुढची फारच कठीण समस्या होती

शहराच्या विस्तारात घोडबंदर रोडवर जसजशी नवीन गृहसंकुले निर्माण झाली तसतशी गृहसंकुलातील परिसरातल्या नवीन शाळांची संख्याही वाढू लागली. त्यामुळे शाळाप्रवेशाचा प्रश्न आता तेवढा गंभीर राहिला नाही. आर्थिक उत्पन्नाची सर्वसाधारण पातळीच वाढल्याने आणि अनेक शाळांचा व पर्यायाने बोर्डाचा पर्याय पालकांस उपलब्ध झाल्याने शाळा म्हणजे जणू बाजारच झाला आहे. तुमच्या राहणीमानाप्रमाणेच तुमचा ब्रँड निवडा.

तर अशा रितीने ठाणे शहर एक स्मार्ट सिटी - जागतिक दर्जाचे शहर म्हणून उभारत असताना या शहराच्या मध्यवर्ती समस्या आहेत त्यांचे समयोचित कालबध्दते मध्ये निराकरण करणे गरजेचे आहे.

एक पालकमंत्री आणि शहराचे प्रथम नागरिक म्हणून मान असल्याने आपणा दोघांना उद्देशून हा पत्र प्रपंच.

१) शहराचे घनकचरा व्यवस्थापन:

केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने ठाणे महापालिकेकडून गेल्या ३ वर्षांत सहावेळा प्रयत्न करण्यात आले. परंतु मोठी गृहसंकुले, वाणिज्य संस्था, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांच्या कचरा विल्हेवाटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

महापालिकेने कचरा उचलणे बंद केल्यानंतर नागरी संस्थांनी दबावगट तयार करून संघर्षाचा पवित्रा घेतला. 

त्यानंतर आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राजकीय नेतृत्वाने मध्यस्थीचा पवित्रा घेत कचरा उचलण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले. प्रशासनाकडून शास्त्रोक्त कचरा विल्हेवाटीसाठी अनेक चकचकीत आणि खर्चिक प्रकल्प हाती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्घाटनानंतर हे प्रकल्प यशस्वी न ठरल्याने ठाण्याचा कचरा डंम्पिंग ग्राऊंडवरच रिचवला जात आहे. ठाण्याच्या या कचराकोंडीचा प्रश्न गेल्या ३ वर्षांमध्ये सुटण्याऐवजी अधिक धुमसत आहे. भविष्यात त्याचा भडका उडण्याची शक्यता आहे.

कृपया ठाणे शहराचा घनकचरा व्यवस्थापनाचा हा महत्त्वाचा प्रश्न कधीपर्यंत सोडवला जाईल हे सांगावे?

२) ठाण्यातील कोपरी पूल –

अनेक वर्ष रखडलेल्या ठाण्यातील कोपरी उड्डाण पूलाची निविदा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने काढली. त्यामुळे कोपरी पूल मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

१३ वर्षांपूर्वी कोपरी पूलाचा विस्तार करण्यात आला होता तेव्हा रुंदीकरणाची किंमत नऊ कोटी होती. सुधारित निविदेमध्ये २५९ कोटी रुपये या प्रकल्पासाठी  खर्च येणार आहे.

कृपया हा पूल नेमका कधी पूर्ण होईल आणि वाहतूक सुरळीत होईल हे सांगावे.

३) ठाणे स्टेशनबाबत

ट्रान्सहार्बर सेवेमुळे ठाणे सुमारे दशकापूर्वी नवी मुंबर्ईशी उपनगरी सेवेने जोडले आणि मध्य रेल्वेच्या इतिहासात ठाण्याची आणखी एकदा सुवर्णाक्षरांत नोंद झाली. प्रवासी सेवेचा हा नवा अध्याय सुरू होत असताना, वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा ठाण्यावर किती ताण येर्ईल व त्यासाठी नेमक्या कोणत्या प्रवासी सुविधा द्यायला हव्यात, याचा विचारच करण्यात आला नाही. त्याचा अपेक्षित विपरीत परिणाम झालाच. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने, नवी मुंबर्ईतील स्टेशनांप्रमाणे रचना आणि एक्सटेंडेट ठाणे स्टेशन हे पर्याय तातडीने प्रत्यक्षात आणावेच लागतील...

सध्या दररोज ठाणे स्टेशनातून साडेसहा लाखांहून जास्त प्रवासी ये–जा करतात. दहा वर्षांत ही संख्या एक ते दीड लाखांनी वाढली. ठाण्यातून दररोज २२ लाखांची उपनगरी तिकीटे, मासिक पास आणि मेल, एक्सप्रेसची अनारक्षित तिकिटे काढली जातात. आरक्षित तिकिटांमधून सुमारे १३ लाखांचा आणखी महसूल ठाणेकर रेल्वेच्या तिजोरीत ओततात. म्हणजेच सुमारे ३५ लाख रुपयांचे घसघशीत उत्पन्न दररोज रेल्वेला देणाऱ्या ठाणे स्टेशनाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय वाटते.

१० फलाट असलेल्या ठाणे स्टेशनवर प्रसाधनगृहांची संख्या अगदी कमी आहे. त्यामुळे प्रवाशांचे - विशेषतः महिलांचे खूप हाल होतात.

एवढ्या मोठ्या स्टेशनवर पार्किंग व्यवस्था धड नाही.

या सर्व समस्येवर तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते ही लवकर.

 ३ ब ) ठाण्यात निर्माण होणार नवे रेल्वे स्थानक –

गेली अनेक वर्षे चर्चेत असलेले विस्तारित ठाणे स्थानक प्रकल्पाचे काम नेमके केव्हा सुरू होईल, या प्रकल्पासाठी आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील मनोरुग्णालयालगतची जागा नेमकी कधी दिली जाईल आणि हे नवे विस्तारीत ठाणे स्टेशन कधी अस्तित्वात येईल याबाबत स्पष्टता द्यावी.

४) ठाण्यात धावणार मेट्रो — मुंबई मेट्रो मार्ग 4 (वडाळा — कासरवडावली)

३२.३२ किमी असणारी मेट्रो ठाणेकरांसाठी महत्वाचा प्रकल्प असणार आहे. ३२ स्थानके असणाऱ्या या मेट्रोमुळे ठाण्याच्या विकासात आणखीन भर पडणार आहे. मेट्रोमुळे वाहतूक व्यवस्था जलद होऊन प्रवाशांची वेळेची बचत देखील होणार आहे. सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस मार्ग, मध्य रेल्वे, मोनो रेल, सध्याचे मेट्रो मार्ग २ बी (डीएन नगर ते मांडले), आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग ५ (कल्याण ते ठाणे) मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी ) व मेट्रो लाइन ८ (वडाळा ते जनरल पोस्ट ऑफिस) या सर्व प्रकल्पांमुळे ठाण्याचा कायापालट होणार हे नक्की.

मात्र सध्या कारशेड कुठे बांधावी यावरून अडकलेले काम पुन्हा कधी सुरू होईल आणि मेट्रो नेमकी कधी सुरू होईल याची माहिती द्यावी.

५) ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलचे नूतनीकरण व आधुनिकीकरण

ठाणे शहराची प्रगती होत असताना तेथे जनसामान्यांसाठी चांगले इस्पितळ नाही.

शहरांतील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील कस्तुरबाच्या धर्तीवर ठाणे सिव्हिल हॉस्पिटल सज्ज करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहिर केले होते. मात्र, प्रत्यक्षात इथे असंख्य समस्या भेडसावत आहेत. 

सिव्हिल रुग्णालयाची इमारत पाडून नवी इमारत उभारली जाणार असल्याने गेल्या काही वर्षात इथे कोणतीही मोठी दुरूस्तीची किंवा अन्य आवश्यक कामे केली जात नव्हती. 

इथल्या आयसीयूमध्ये १२ बेड असून व्हेंटिलेटर्ससह मल्टी पॅरा मॉनेटर्ससह अद्ययावत यंत्रसामग्री दाखल झाली आहे.  रुग्णालयात एकूण ९ अद्ययावत व्हेंटिलेटर्ससह वैद्यकीय कर्मचा-यांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा किटही दाखल झाली आहेत. 

ती लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षित स्टाफ नाही असे म्हणतात.

महिलांसाठी विशेष वॉर्डमध्ये ३५ बेड आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफलाही प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. 

सिव्हिल मध्ये उपचाराच्या चांगल्या सुविधा नसल्याने तेथे येणारे रुग्ण अनेकदा सायन इस्पितळात पाठवावे लागतात.

जनसामान्यांची वैद्यकीय गरज लक्षात घेऊन या सिव्हिल हॉस्पिटल चे आधुनिकीकरण आणि नूतनीकरण लवकरच करणे अत्यंत आवश्यक आहे.

ठाण्याचे ऋण

ठाणेकर जनतेने आजवर शिवसेनेवर अपार प्रेम केले आहे. त्यामुळेच शिवसेनेवर ठाणेकरांचे ऋण आहे.

ठाण्याचे पालकमंत्री आणि प्रथम नागरिक म्हणून आपण दोघे वरील प्रश्नांकडे त्वरित लक्ष घालून हे ऋण फेडण्याचा निमित्ताने ठाणेकरांना दिलासा द्याल ही अपेक्षा.

आपला,

ठाणे न्यूजमेकर्स साठी,

दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained