भारतीय मतदार अतिशय प्रगल्भ आहे*
*भारतीय मतदार अतिशय प्रगल्भ आहे*
आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या लोकशाही राज्यपद्धतीने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा हा हक्क बजाविण्यासाठी मतदान करायलाच पाहिजे ही भावना प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये आता पूर्णपणे रुजली आहे.
या गोष्टीची पुष्टी आणि खात्री नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकींनी पुन्हा एकदा दिली.
या पाच राज्यातील निवडणुकींनी हे सिद्ध केले की भारतीय मतदार हा बहुतांशी गरीब असला तरी तो राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे. त्याला कोणत्या पार्टीला कधी आणि कसे मतदान करायचे हे पक्के माहीत असते.
हल्ली हा मतदार राजकीय भूलथापांनी बहकत नाही.
खरे तर भारतीय मतदारांच्या प्रगल्भतेचा उगम हा 1967 च्या निवडणुकांपासून सुरू झाला.
1952 ते 1966 पर्यंत देशात काँग्रेस ची एककल्ली सत्ता होती.
स्वतंत्र लढ्यात काँग्रेस चे योगदान, त्याकाळातील नेहरूंची लोकप्रियता, त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी 1965 च्या युद्धात पाकिस्तानला दिलेली शिकस्त या सर्वांच्या पुण्याई वर आणि काँग्रेस समोर ठोस आणि प्रबळ विरोधी पक्ष नसल्याने काँग्रेस ची अमर्याद सत्ता सुरू होती.
1967 च्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी काँग्रेस विरुद्ध एक फळी (फ्रंट) निर्माण केली.
ज्याची जेथे ताकद जास्त त्याने तेथे जोर लावायचा असे ठरले.
आणि चमत्कार झाला : त्यावेळी केंद्र आणि राज्यात एकत्रित पणे निवडणुका व्हायच्या.
1967 साली जनतेनी केंद्रात काँग्रेसला निवडून दिले खरे पण उत्तर भारतात तब्बल नऊ राज्यात काँग्रेस चा पराभव करून विरोधी पक्षांच्या हातात सत्ता दिली.
त्यावेळी टीव्ही वगैरे काही नव्हते. रेडिओ सत्ताधारी पक्षाच्या तावडीत असे - तरीसुद्धा गरीब भारतीय जनता राजकीय दृष्ट्या किती प्रगल्भ आहे त्याचे प्रत्यंतर आले.
त्यानंतर वेळोवेळी त्याच जनतेने राजकीय पक्षांना आपली चुणूक दाखवली होती त्याची उदाहरणे:
• 1971 च्या पाकिस्तान युद्धानंतर इंदिरा गांधी यांना भरगोस विजय देणे
• त्याच इंदिरा गांधींचा 1977 मध्ये आणीबाणी लादून लोकशाहीचा मुडदा पडल्याबद्दल जनतेनी त्यांना व काँग्रेस ला पराभूत केले. जनता पार्टीला विजयी केले.
• त्याच जनतेनी आपसात भांडत बसणाऱ्या जनता पार्टीच्या नेत्यांना 1980 च्या मध्यावधी निवडणुकात घरी पाठवले व इंदिरा गांधींना परत विजयी केले.
• 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांनी तरुण व होतकरू राजीव गांधींच्या हाती 415 जागा असा भूतो ना भविष्यती विजय दिला.
• मात्र त्यानंतर विविध भ्रष्टाचार व अकार्यक्षमता यांनी राजीव गांधी यांचे पितळ उघडे पडल्यावर जनतेनी त्यांची सत्ता काढून त्यांना पराभूत केले.
• 1991 ते 2004 सालात याच जनतेने मोडीत निघालेल्या काँग्रेस ऐवजी संमिश्र आघाडी सरकारांना सत्ता देणे पसंद केले.
• 2004 साली केंद्रात चांगले काम करणाऱ्या वाजपेयी सरकारला फाजील आत्मविश्वास व जनतेला गृहीत धरण्याच्या वृत्तीबद्दल देशातील जनतेने पराजीत केले व धक्कादायक रित्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी च्या हाती सत्ता दिली.
• 2014 मध्ये भ्रष्ट्राचार व नाकर्तेपणाने बुजबुजलेल्या काँग्रेस ला नाकारून जनतेने भारतीय जनता पक्षाच्या आणि नरेंद्र मोदी यांच्या सारख्या प्रबळ नेत्याच्या हातात सत्ता दिली व पुढे 5 वर्षांनी त्यांना जास्त बहुमताने पुन्हा विजयी केले.
• पण असे करताना जनतेने त्यांना अगदीच मोकाट सोडलेले नाही.
• 2015 व 2020 मध्ये दिल्ली, 2015 मध्ये बिहार, 2016 व 2021 मध्ये बंगाल, मध्यंतरी ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड अशा राज्यात जनतेने भाजपला साफ नाकारले आहे.
• स्वतःबद्दल चा फाजील आत्मविश्वास आणि पुन्हा जनतेला गृहीत धरण्याच्या वृत्तीने महाराष्ट्रात सुद्धा भाजपने सत्ता घालवली आहे.
• आपल्या घरी गडी ठेवायचा असेल तरी आपण त्याची चौकशी करतो, माहिती घेतो आणि त्यानंतरच त्याची निवड करतो. मग लोकप्रतिनिधी म्हणून पुढील पाच वर्षांसाठी ज्याची निवड करायची आहे, ती व्यक्ती कशी आहे, त्याचा पक्ष कसा आहे ते पाहून आणि सारासार विचार करून हल्ली लोक मतदान करतात.
• *पूर्वी जास्त मतदान हे सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध दिशेने आहे असे मानले जायचे. पण 2019 ची लोकसभा, 2020 ची दिल्ली आणि बिहार आणि नुकतीच पार पडलेली बंगालच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे की जास्त प्रमाणात होणारे मतदान हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूने सुद्धा असू शकते.*
• जो कोणी उमेदवार निवडणुकीला उभा आहे, त्याच्याबद्दलची माहिती, प्रसारमाध्यमातून आलेल्या त्याच्या संदर्भात आलेल्या बातम्या, प्रचारसभा या सगळ्यातून सर्वसामान्य माणूस विचार करतो आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये
त्याला जो उमेदवार योग्य
वाटतो, त्यालाच तो मतदान करतो.
• आपल्याला पाहिजे आहे अशी व्यक्ती निवडून देणे हे मतदारांच्याच हातात असते. मतदानाच्या माध्यमातून ही संधी सर्वसामान्य नागरिकांना मिळत असते. ही संधी हल्ली जनता वाया घालवीत नाही.
• त्याही पुढे जाऊन जेव्हा मतदारांचे जातीच्या आधाराने, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि अन्य असे कोणतेही वर्गीकरण न करता या देशाचा नागरिक आणि जागरूक मतदार म्हणून प्रत्येकाने मतदान सुरू केले तर आपली लोकशाही अधिक मजबूत होईल.
@ *दयानंद नेने*
Comments
Post a Comment