कोपरी पुल: कहाणी 18 वर्ष रखडलेल्या पुलाची आणि ठाणेकरांच्या दैन्येची

 कोपरी पुल: कहाणी 18 वर्ष रखडलेल्या पुलाची आणि ठाणेकरांच्या दैन्येची


१९५८ मध्ये बांधलेला, रेल्वे रुळांवरील मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा एक पुल.

२००३ मध्ये वाढलेल्या वाहतुकीमुळे या पुलाच्या रुंदीकरणाची मागणी केली जाते

२०११ मध्ये सदर अस्तित्वात असलेला पुल धोकादायक असल्याचे घोषित केले जाते

२०२१ आले तरी अद्याप नवीन पुल बांधण्यात आलेला नाही - जुन्या पुलाचे रुंदीकरण सुद्धा झालेले नाही.


ही कर्मकहानी आहे ठाण्याच्या कोपरी येथील रेल्वेवरील पुलाची.


आता दुसरी बाजू बघा: २००३ मध्ये ठाणे महानगरपालिकेत सत्ता शिवसेना - भाजपा ची. आमदार शिवसेनेचा. खासदार शिवसेना - भाजपा युतीचा.

२००९ व २०१४ मध्ये ठाणे महानगरपालिकेत सत्ता शिवसेना - भाजपा ची. आमदार शिवसेनेचा. खासदार शिवसेना - भाजपा युतीचा (२००९-१४ खासदार राष्ट्रवादी चा होता).

शिवसेना, भाजपा, काँगेस व राष्ट्रवादी - सर्वांना नवीन कोपरी पुल किंवा सदर पुलाचे नूतनीकरण व रुंदीकरण हवे आहे. 

तरीही पुल अद्यापपर्यंत रखडतो - रोज प्रवास करणाऱ्या ठाणेकरांच्या जीवनाची दैना करतो - याला जबाबदार कोण?


लक्षात घ्या - त्याकाळात केंद्रात काँग्रेस प्रणित आघाडीचे सरकार होते तर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे राज्य होते.

केंद्रातील सरकारात त्याकाळचे रेलवे मंत्री होते लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी आणि शेवटी दिनेश त्रिवेदी.

लालूप्रसाद यादव बिहारचे तर ममता बॅनर्जी व दिनेश त्रिवेदी बंगालचे.

राज्यात मुंबई आणि ठाणे येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ची विशेष ताकद नव्हती - अशी ही त्यावेळची परिस्थिती. ठाण्याची बाजू दोन्ही ठिकाणी नीटपणे मांडून त्याचा पाठपुरावा करण्यात त्यावेळच्या राजकीय परिस्थिती मुळे जनप्रतिनिधी कमी पडले असू शकतील.

त्याचप्रमाणे केन्द्रात त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी या पुलाच्या मागणीला योग्य प्रतिसाद दिला नसल्याची शक्यता आहे.


आता थोडा या पुलाचा इतिहास व प्रवास.


पूर्वदृतगती महामार्गावरील अरूंद कोपरी पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतुन सुटका मिळवण्यासाठी कोपरी रेल्वे पुलाचे  काम सुरू व्हायला २०२१ साल उजाडले. .  

१९५८ साली बांधलेला या रेल्वे पुलाला ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९५ नंतर पूर्व दुती महामार्गावरील रेल्वे पूल सोडून हायवे च्या दोन्ही बाजूस 8 मार्गिका करण्यात आल्या होत्या. परंतु कोपरी पुल चार मार्गिकांचाच असल्याने गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीचा (bottleneck) सामना नागरिकांना करावा लागत होता. 


नवीन पुलाचा प्रस्ताव निधीअभावी रखडला होता.

अगोदर हा नवा पुल MSRDC बांधणार का PWD असा वाद होता. नंतर तो MMRDA ने बांधावा असे ठरले.

पण सदर पुल हा रेल्वे ट्रॅक वरून जाणार असल्याने खर्चाचा काही भाग रेल्वेने उचलावा असा धोरणात्मक निर्णय MMRDA ने घेतला आणि गाडा अडकला.


दरम्यान २०१४ मध्ये केंद्रात नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेवर आले. राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले.

केंद्रात प्रथम सुरेश प्रभू व नंतर पीयूष गोयल असे मुंबईत राहणारे रेल्वे मंत्री झाले.

ठाण्यात एकनाथ शिंदे हे पालकमंत्री झाले. 

कोपरी पुलाचे महत्त्व आणि गरज कळणारी सारे जण असल्याने अखेर पुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला.


पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा आराखडा रेल्वे प्रशासनाने तब्बल १२ वर्षांनंतर मंजूर केला. 

मात्र, १२ वर्षांच्या काळात या कामाचा खर्च कित्येक पटींनी वाढल्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) साकडे घालण्यात आले.


ठाणे पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपरी येथील ब्रिटिशकालीन पुलाची मुदत संपल्याने तसेच तो वाहतुकीस अपुरा पडू लागल्याने ठाणे महापालिकेने या पुलाच्या समांतर असा नवीन पूल उभा केला. मात्र, त्यानंतरही या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटू शकलेली नाही. 

आनंदनगर टोल नाका ते घोडबंदपर्यंतच्या पूर्व द्रुतगती महामार्गाला अनेक उड्डाणपूल जोडलेले आहेत. 

कोपरी येथे नव्याने बांधलेल्या पुलाचा प्रामुख्याने ठाणे पूर्वेतून पश्चिमेकडे वाहतूक करण्यासाठी उपयोग होत असून त्याच्यावर वाहनांची कायम वर्दळ असते. मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना मात्र जुन्या पुलाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे गेली दहा ते बारा वर्षांपासून या पुलाच्या रुंदीकरणाची मागणी केली जात आहे.


राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या रुंदीकरणासाठी केलेल्या मुळ आराखडय़ानुसार या प्रकल्पासाठी नऊ कोटींचा खर्च येणार होता. 

मात्र, रेल्वे प्रशासनाने रुंदीकरणास नकार दिल्याने हा प्रस्ताव रखडला होता. त्यानंतर पुलाच्या रुंदीकरणाचा नवीन आराखडा सादर करण्यात आला. त्याला रेल्वेने अखेर मंजुरी दिली. 


वाढीव खर्च करायचा कोणी?


कोपरी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचा खर्च एव्हाना ९ कोटींवरून ९० कोटींपर्यंत पोहोचला होता. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवाक्याबाहेर हा खर्च गेल्यामुळे असून आता हा खर्च करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला व काम सुरू होणे पुन्हा रखडले.


राज्यात भाजपा सेनेचे सरकार आल्यानंतर याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करून हा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावा अशी मागणी ठाण्याच्या जन प्रतिनिधींनी केली.


ऑक्टोबर २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कोपरी पुलासाठी २५८ कोटी ची मान्यता दिली. 

या प्रकल्पामध्ये ४+४ लेन करून शेजारी प्रस्तावित नवीन रेल्वे स्थानकाजवळ वाहतुक कोंडी होऊ नये या दृष्टिकोनातून ज्ञानसाधना ते भास्कर कॉलनी या ठिकाणी भुयारीमार्ग तसेच चिखलवाडी येथे हे पावसाळ्यात होणारी घरबुडी टाळण्यासाठी नवीन नाल्याची व्यवस्था करण्यासाठी त्याप्रमाणे नियोजित आराखड्यामध्ये पुन्हा बदल करून रेल्वेकडून परवानगी घेण्यात आली.

 

त्यानंतर २०१८ मध्ये या कोपरी रेल्वे पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 

पुलाचे काम आता सुरू होणार असे वाटत असता कोविड ची महामारी आली, लॉक डाउन लागला आणि काम पुन्हा रखडले.


अखेर नोव्हेंबर २०२० मध्ये रेल्वेच्या आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना फेज 1 च्या कोपरी पुलाचा गर्डर  लॉन्च करून फेब्रुवारी - मार्च पर्यंत हा पूल नागरिकांसाठी खुला करून द्यावा आणि त्यानंतर फेज २ च्या गर्डरचे काम सुरु करण्याच्या सूचना अधिक-यांना प्रशासनाने दिल्या. 

या पुलाच्या गर्डर साठी काही कालावधीसाठी हा मार्ग बंद करावा लागणार होता त्यासाठी वाहतूक शाखेची परवानगी घेण्यात आली.


अखेर स्वप्न साकारणार


गेली अनेक वर्षे कोपरी पुलावर होणारी वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र हा प्रश्न आता लवकरच सुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून असे कळते की मुंबई आणि ठाण्याच्या वेशी दरम्यान असलेल्या कोपरी उड्डाण पुलाच्या नव्या मार्गिकेचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे रखडलेले हे काम पुन्हा जोमाने सुरु झाले असून जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे.


या पुलाच्या पहिल्या टप्प्याचे हे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या कोपरी उड्डाण पुलावर बॉटल नेक तयार होत असल्याने दिवस-रात्र प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. 

त्यात २२ जून २०१७ ला रेल्वे वरील ब्रिज आय आय टी च्या सर्वेक्षणात हा पूल धोकादायक निष्पन्न झाल्याने या पुलाचे तातडीने पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता होती. 

अखेर २१ मे २०१८ ला या पुलाच्या पुनर्निर्माण याच्या कार्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनमुळे हे काम रखडले होते.

आता जून अखेरीस उर्वरित काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला करण्यात येईल अशी शक्यता सांगितले जात आहे. 

गर्डर टाकून नवीन मार्गिका बांधणे हे या फुलाचा पहिला टप्पा पूर्ण करेल. 

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात १९५८ साली बांधलेला जुना कोपरी पूल पाडून त्या जागी नवीन पूल निर्माण करण्यात येईल. मात्र त्याचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. असे असले तरी अधिकच्या चार लेन उपलब्ध झाल्याने या पावसाळ्यात कोपरी पुलावर वाहतूक कोंडी होणार नाही अशी अपेक्षा आहे. 

यामुळे एक प्रकारे मुंबई आणि ठाणेकरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.


@ दयानंद नेने

(With media inputs)

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034