सावधान - धोकादायक अमूल मसाला डोसा
सावधान - धोकादायक अमूल मसाला डोसा*
संध्याकाळच्या वेळी तुम्ही रस्त्यावर फिरताय. जाता-जाता कानावर चर्र-चर्र असा आवाज येतो, तुमची नजर सहाजिकच तिकडे वळते.
समोर डोस्याचा स्टॉल दिसतो, बाहेर लावलेल्या तव्यावर एक माणूस डोस्याचं घाऊक प्रमाणात प्रोडक्शन करत असतो. लोकं डोसे, उत्तप्पा खात उभे असतात.
स्टॉलवर चकाचक रंगीबेरंगी नेमप्लेट असते. डोक्याला टोपी, अंगात दुकानाच्या ब्रँडचा टी-शर्ट घातलेल्या माणसांची कामाची लगबग सुरु असते. ते दृश्य पाहून तुमची नजर क्षणभर तिथेच खिळून राहते.
कानावर पडलेला तो आवाज, डोळ्यांनी पाहिलेला नजारा आपल्याला मधल्या वेळेच्या भुकेची जाणीव करुन देतो. तुम्ही तिथेच थबकता आणि पटकन एका ‘अमूल मसाला डोस्याची’ ऑर्डर देऊन टाकता. आता ‘अमूल’चाच डोसा का? आजच्या मुन्नाभाईच्या भाषेत बोलायचं तर, “बोलेतो मसाला डोसा किंवा पावभाजी फक्त ‘अमूलचेच’ असतात.
तुम्ही सेल्फ सर्व्हिस काऊंटरला पैसे देऊन टोकन घेऊन कारागीराकडे देत,“भैय्या अमूल जरा ज्यादा डालना, क्या? ” अशी ऑर्डर देता. तवा कारागीर तुमच्याकडे आज्ञाधारक नजरेने बघत, समोरच्या टेबलावरच्या अमूल लोण्याच्या मोठ्या पॅकमधून आपला सुरी कम चॉपर फिरवतो. हाताला येणारा एक मोठ्ठा पिवळा काप काढून तुमच्या डोस्यावर भिरकावतो. तुम्ही त्याच्याकडे कृतार्थ नजरेचा कटाक्ष टाकता, तो रिटर्न गिफ्ट म्हणून त्यातले अर्धे अमूल स्वतःच्या तोंडावर पसरल्यासारखं तुमच्याकडे कृतज्ञ नजरेनी बघतो. वातावरणात एकूणच आनंदीआनंद पसरतो.
काहीच मिनिटात प्लेटमध्ये बटर पेपरवर ठेवलेला ‘अमूल’ डोसा बाजूला भरपूर चटणी पसरून तुमच्यासमोर सादर केला जातो. मुंबई - पुण्यातल्या कुठल्याही प्रतिथयश हॉटेल्समध्ये गेल्यावर कमीतकमी 70-80 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत मिळणारा अमूल मसाला डोसा तुम्हाला फक्त 30-40 रुपयात मिळालेला असतो. अर्धे पैसे आणि हॉटेलात बसून खाण्याचा वेळ वाचवल्याच्या आनंदात तुम्ही आपल्या कामाला लागता.
विचार केलाय कधी, हे ‘ज्यादा अमूल’ लावूनही त्या माणसाला तो डोसा हॉटेलच्या अर्ध्या किंमतीत कसा परवडतो? विचार करता का, किराणा मालाच्या दुकानातून /मॉलमधून आपण घरी आणलेल्या 100 ग्रॅम बटरच्या पॅकमधला एखादा चमचा अमूल बटरचा वासही घरभर पसरतो आणि इथे तुम्ही तव्यापासून फक्त 1-2 फुटावर उभे असूनही अमूल बटरचा टिपिकल वास डोस्याला खातानाही का येत नाही म्हणून?
तर धक्कादायक वस्तुस्थिती अशी म्हणून मुंबई - पुण्यासह अनेक शहरात दोन प्रकारची ‘अमूल बटर’ मिळतात. एक आणंद, गुजरातला तयार झालेलं ‘ओरिजनल अमूल’ आणि दुसरं भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्य़ांकडून होलसेल मार्केटमध्ये विकलं जाणारं *लोकल अमूल*.
ह्याच्या मुळाशी असतं अर्थातच अर्थकारण. समजा अमूलच्या 1 किलोच्या होलसेल पॅकचा भाव 500 रुपये असेल तर ‘लोकल अमूल’चा भाव फक्त 150-200 रुपयांच्या आसपास असतो. एकावेळी 2-3 पॅक घेतले तर त्याच्याबरोबर दाखवायला ओरीजनल अमूलचं एखादं (अर्थातच जुनं, वापरलेलं) वेष्टन (कव्हर) फ्री मिळतं. कारण स्टॉलवाल्याला डोसा/पावभाजीत अमूल घालायचं नाही तर ते फक्त “दाखवायचं” असतं. एकदा अमूल बटरचे एक किलोचे कव्हर सगळ्यांना दिसेल असं ठेवलं आणि आम्ही सगळे पदार्थ फक्त अमूल बटर मधेच बनवतो असं लिहिलेला एखादा साईनबोर्ड दुकानात लावला, की तुमच्या आमच्या सारखे नावावर विश्वास टाकणारे लोक, अमूल डोस्याच्या नावाखाली वाट्टेल त्या बटरवर भाजलेला डोसा खायला आणि अमूलच्या कव्हरमधे घातलेला खोट्या बटरचा पॅक वापरून डोसे, पावभाजी बनवायला स्टॉलवाला तयार.
आता ह्या विषयात अगदीच अनभिज्ञ असतील त्यांना साध्या शब्दात सांगायचं झालं तर मुळात ज्याला ‘बटर’ म्हणलं जातं ते एक संपूर्ण ‘डेअरी प्रॉडक्ट’ असतं आणि हे ‘लोकल अमूल’ दुय्यम दर्जाच्या केमिकल प्रोसेसनी बनवलेलं असतं.
आता अजून थोडं खोलात जाऊन हे कसे बनवतात पाहिजे असेल तर, लोकल लेव्हलचे बटर हे स्वस्तातले तेल आणि यीस्ट बनवताना त्यातून निघणारे टाकाऊ (स्क्रॅप) पदार्थ डायसीटइल आणि अॅसीटोनसारखे खाण्याच्या दृष्टीने अतिशय घातक केमिकल पदार्थ वापरून बनवलं जातं. ज्यामुळे हे बटर (?) दिसायला पिवळ्या रंगाचं जरी दिसत असलं तरी खाल्ल्यावर श्वसनविकार आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासारखे गंभीर आजारही होऊ शकतात. (ह्या विषयात जास्ती रस असलेल्यांनी diacetyl आणि acetoin हे शब्द गुगल करून ह्या पदार्थामुळे नेमकं काय होऊ शकतं ह्याची माहिती अवश्य घ्यावी) अनेक देशांत ही केमिकल्स खाद्यपदार्थात वापरायलाही बंदी आहे.
हे वापरून बनवलेल्या दोन बटरमधला दिसण्यातला फरक अगदी खऱ्या अमूल बटरचे जनक साक्षात डॉ.व्हर्गीस कुरियन जरी येशूगृहातून पृथ्वीतलावर परत आले, तरी त्यांनाही पटकन समजणार नाही.
तरी स्वस्तात डोसे, पावभाजी विकणारे आणि भेसळप्रिय लोक गाडीवर/ स्टॉलवर (आणि अगदी काही हॉटेल व्यावसायिक देखील)‘लोकल अमूल बटर’ सर्रास वापरतात ते हे अनेक हॉटेल व्यावसायिकांना माहिती असलेलं उघड गुपित आहे.
तरी पुढच्या वेळी अशा कोणत्याही गाडीवरून अमूल बटर युक्त डोसा किंवा पाव भाजी खाताना दहा वेळा विचार करावा
( *जनहितार्थ प्रसिद्ध - दयानंद नेने*)
Comments
Post a Comment