Letter to CP Mumbai and Thane regarding rowdy traffic
- Get link
- X
- Other Apps
सतर्क नागरिक फौंडेशन ®
एकविरा अपार्टमेंट, उथळसर, ठाणे (प) ४००६०१
डिसेंबर २९, २०२०
प्रति,
मा. पोलिस आयुक्त,
मुंबई
मा. पोलिस आयुक्त,
ठाणे
महोदय,
येणाऱ्या नववर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
कोविड महामारीतून आपण बाहेर पडत असताना हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत असताना मुंबई व ठाणे शहरातील वहातुक समस्येविषयी काही गोष्टी आपल्या नजरेस आणून द्याव्या म्हणून हा पत्र प्रपंच.
एकेकाळी अत्यंत शिस्तशीर वाहतुकीसाठी प्रसिद्ध असणार्या मुंबईमध्ये आणि ठाण्यात आजकाल वाहतुकीचे नियम पाळणारे लोकच मूर्ख ठरू लागले आहेत.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यास वाहतूक पोलीस विभागही बऱ्यापैकी जबाबदार आहे.
आपल्या समोरून चुकीच्या दिशेने किंवा हेल्मेट न परिधान करता सुसाट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना हटकणे तर दूरच राहिले, वाहतूक पोलीस त्यांच्याकडे बघतही नाही. हे दृश्य संपूर्ण मुंबईत आणि ठाण्यात दिसते.
अशी परिस्थिती मुंबईत असल्यास महाराष्ट्रात किंवा देशात काय परिस्थिती असेल याचा विचार करता अंगावर काटा येतो.
मास्क वापरण्यास नकार, हेलमेट वापरण्यास नकार, वाहतूक नियंत्रण नियमांचे पालन करण्यास नकार आणि दुचाकीवर तीन - प्रसंगी चार - जण जाणे हा शिष्टाचार बनला आहे.
असे नियमभंग करणाऱ्यांना अडवणे सामान्य नागरिकाच्या जीवावर बेतू शकते एवढी अनागोंदी आता जाणवू लागली आहे.
केवळ CCTV कॅमेरे लावून ही बेशिस्त काबूत येणार नाही.
आपणास असे सूचित करू इच्छितो की मुंबईच्या आणि ठाण्याच्या निवडक भागात अचानक अशा नियम भंगाविरुद्ध कारवाई केल्यास तो संदेश सर्वत्र पसरेल आणि नियमभंग करणारे थोडे सावध होतील.
मुंबईचा विस्तार आणि वाहन संख्या लक्षात घेता पोलिसांना एकट्यालाच दोष देणे अन्यायाचे ठरेल. तरीही थोडेफार करता येईलच.
मुळात कोणताही समाज कडक शिक्षा असल्याशिवाय कायद्याचे पालन करत नाही. म्हणूनच युरोप किंवा अमेरिकेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अत्यंत कठोर शिक्षा ठोठावण्यात येते.
आपल्याकडे शिक्षाच नसल्यामुळे हे नियम धाब्यावर बसवले जातात. हे दुर्दैवी चित्र बदलणे आवश्यक आहे. कारण लहान मुले, महिला किंवा ज्येष्ठ नागरिक यांना आता सार्वजनिक ठिकाणी चालणेही दुरापास्त झाले आहे. जणू हे कमी म्हणून की काय, आता सर्रास पदपथावरूनही दुचाकीस्वार बेबंदपणे जाताना दिसतो.
प्रत्येक बाबतीत जनहित याचिका करून न्यायालयीन निर्देश प्राप्त करण्याची गरज पडणे म्हणजे प्रशासन अयशस्वी झाले याची पावतीच आहे. म्हणूनच आपल्या अधिकारात शक्य आहे तेव्हढे तरी करून मुंबई पोलिसांनी सर्वसामान्य पादचार्यांना दिलासा देण्याची वेळ आलेली आहे.
आपणास विनंती आहे की आपण या बाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देऊन जनतेला दिलासा देण्यासाठी सहकार्य करावे.
आपला,
दयानंद नेने
सतर्क नागरिक फौंडेशन®
Comments
Post a Comment