कुठे शोधीसी रामेश्वर अन कुठे शोधीसी काशी..
*कुठे शोधीसी रामेश्वर अन कुठे शोधीसी काशी*
अध्यात्म या शब्दाचा अर्थ काय ? आत्म्याचा अभ्यास आत्म्याचे अध्ययन म्हणजे अध्यात्म.
आपल्याकडे आपण वेद प्रमाण मानतो. वेदाचे सार असणारी चार महावाक्ये आदि शंकराचार्यांनी चार स्थापन केलेल्या पिठांना अनुक्रमे दिलेली आहेत.
ती महावाक्ये म्हणजे प्रत्येक जीवात्म्याने करायचा उद्घोष आहे. केवळ उद्घोष नाही तर स्वतःला कसाला लावून ते महावाक्य आत्मसात करायचे आहे. त्या महावाक्याला पुरेपूर समजून घेऊन आपल्या नित्य आचरणाचा भाग करणे अभिप्रेत आहे.
अहं ब्रह्मास्मि : मी अर्थात जीवात्मा हाच अंशात्मक ब्रह्म आहे.
अयमात्मा ब्रह्मः : माझा आत्मा हाच ब्रह्म आहे.
तत्वमसि : तो तूच आहेस. अर्थात आपले शरीर/ मेंदू आत्म्याला जाणीव करून देतोय तो तूच आहेस. तूच तो ईश्वर आहेस.
प्रज्ञानं ब्रह्मः : पूर्ण ज्ञान हेच ब्रह्म आहे. अर्थात ईश्वर हा ज्ञानघन आहे. बाकी त्याला काहीही भौतिक स्वरूप नाही. आणि ज्ञान हे चेतनामय असते त्याला भौतिक अस्तित्व नाही.
ब्रह्म तत्व हे अनिवर्चनिय आहे. त्याला शब्दात मांडता येत नाही. ते निर्गुण निराकार आहे. पूर्ण ज्ञान हेच ब्रह्म आहे.
हे पूर्ण ज्ञान म्हणजे आत्म्याला स्व स्वरुपाची जाणीव होणे.
तो अविनाशी आहे आणि ब्रह्माचेच अंशात्मक रूप आहे हे समजणे आणि आपल्या सभोवताली असणारे सगळे काही सुद्धा त्याच ब्रह्माची अंशात्मक रूपे असल्याचे उमजणे.
संपूर्ण विश्वाचा पसारा त्यातील एक जीवात्मा म्हणून आपले स्थान आणि आपण या स्थानी या काळात घेतलेल्या जन्माचा कार्यकारणभाव ज्ञात होणे.
कर्मफलाचा सिद्धांत पूर्णपणे उलगडून त्यातील गुह्य उमगणे.
या सगळ्या आणि इतरही बऱ्याच गोष्टी या आत्मज्ञान या व्याख्येत समाविष्ट होतात.
हे सगळे ज्ञान आपण आपली ज्ञानेंद्रिये जोपर्यंत अंतर्मुख करत नाहीत तोपर्यंत आपल्याला प्राप्त होणे अशक्य आहे.
ध्यान, चिंतन, योग वगळता अन्य कोणत्याही मार्गाने आपल्याला आपल्या षड्रिपुंना अंतर्मुख करणे दुरापास्त आहे.
ध्यान आणि चिंतनाचे जर महत्व असेल तर ते हे आहे.
तुम्ही ध्यान करायला बसला कि हे लगेच साधत नाही. सर्वस्वाचा त्याग करून बारा वर्षे तप केल्यावर सिद्धार्थ गौतमाला ज्ञान मिळून तो बुद्ध झाला. वाल्याचा वाल्मिकी झाला.
रोज १० -१५ मिनिटे बसून आपल्याला हे साधणे अशक्यच आहे.
पण नित्य ध्यान करण्याची सवय लावून घेणे म्हणजे त्या दिशेने एक अत्यंत महत्वाचे पाउल टाकणे आहे.
मी जे काही लेखन करतो तो सर्वांच्या साठी आणि सर्व सामान्य लोकांच्या साठी आहे.
त्यातून कोणताही चमत्कार होणे मला अपेक्षित आणि अभिप्रेत नाही.
परंतु आपण ज्या कर्मकांड रुपी उपासनेत गुंततो आहेत ती उपासना आपल्याला या आत्मस्वरुपाला ओळखून घेण्याच्या मार्गावर नेणारी नसून त्या पासून दूर नेणारी आहे. म्हणूनच मी वारंवार सांगतो कि ध्यान करायला सुरुवात करा. ते पहिले पाउल आहे. अंतर्मुख होणे अत्यंत महत्वाचे आहे.
नरेंद्र मोदी आपल्या वर्तनातून सुद्धा तीच प्रेरणा देत आहेत. म्हणून मी त्या अनुषंगाने लेख लिहिला.
जे लोक पोचलेले आहेत त्यांना माझे लेखन हास्यास्पद वाटणे स्वाभाविक आहे. कारण मी पूर्णपणे तर्काचा आधार घेऊन लिहितो.
मला कधीही कोणतीही अनुभूती आली नाही. येणार सुद्धा नाही. हे मला नक्की माहिती आहे. जे लिहितो आहे त्यातील प्रत्येक शब्द या पूर्वी शेकडो विचारवंत मंडळीनी त्यांच्या त्यांच्या शब्दात आणि त्यांच्या काळाच्या अनुरूप सांगायचा प्रयत्न केला आहे. मी आजच्या काळाच्या अनुरूप शब्दात मांडतो आहे.
माझा गुरु सुद्धा हयात नाही. ते चेतना स्वरूप आहेत. माझ्या गुरूने दिलेले ग्रंथ आणि श्लोक रुपी ज्ञान हेच माझ्या गुरुचे मार्गदर्शन आहे. माझ्या गुरुचे जीवन भरातील आचरण हेच माझ्यासाठी पथप्रदर्शन आहे.
ज्या मार्गाने चालून माझ्या सारखा तद्दन नास्तिक सुद्धा चार ज्ञान तुषार प्राप्त करू शकतो त्या मार्गाने जाऊन अजून चार लोकांचे भले व्हावे हि वेडी तळमळ माझ्या लेखनातून नेहमीच व्यक्त होते. अर्थात गेल्या २४०० वर्षात जे काही आपल्या लोकांनी प्रमाण मानले आहे त्यापेक्षा पूर्ण भिन्न माझे लेखन असते. कारण मी सत्य सनातन वैदिक धर्माचे मत मांडतो. माझे आचार्य आदि शंकराचार्य सुद्धा त्याच धर्माचे अनुयायी होते. ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो त्याचे ते मूळ स्वरूप आहे. त्यामुळे माझे विचार तुम्हाला वेगळे वाटतील. पटणार नाहीत.
परंतु त्याच विचारांचे पालन करत आपले पंतप्रधान लोकांच्या पुढे योग्य आदर्श निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कृतीला मी शब्दबद्ध केले.
गेल्या २४०० वर्षातील कोणत्याही महानुभावाच्या पंच्याला हात घालायची मला इच्छा नाही. गरज सुद्धा नाही. मला कोणत्याही स्वरूपाचा परंपरांवर भाष्य करायची सुद्धा आवश्यकता वाटत नाही.
अन्य कोणत्याही मार्गाच्या पेक्षा स्वतःला ओळखणे आणि अंतर्मुख होणे हेच मानव जातीला उर्ध्वगामी नेणारी उपासना आहे हा माझा ठाम विश्वास आहे.
हे अंतर्मुख होणे म्हणजे अशी शाळा आहे कि तिच्यात तुम्ही फक्त दाखल व्हायचे आहे. पुढील सगळी प्रगती तुमचा अंतरात्माच घडवतो. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. हि अशी शाळा आहे कि जिच्यात तुम्ही या जन्मात दाखला घेता आणि हिच्यातून तुम्ही जीवन्मुक्त होऊनच बाहेर पडता. हि प्रक्रिया किती जन्म चालणार आहे हे तुमच्या आजच्या आत्मिक पातळीवर ठरते. हि एकमेव उपासना आहे जी तुमचा आत्मा त्याच्यासह घेऊन पुढील जन्मी वापरू शकतो.
सगळे संत महंत सुद्धा याचेच गुणगान करत होते. आपण समजून घ्यायचे का नाही ते आपण ठरवायचे असते.
कुठे शोधीसी रामेश्वर अन कुठे शोधीसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
शोधिसी मानवा राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी
पटले तर स्वीकारा नाही पटले तर सोडून द्या..
Comments
Post a Comment