कुतुबमिनार की हिंदू विजयस्तंभ ?

 ताजमहालमधील काही दालने उघडू देत नाहीत वा संशोधनात आडकाठी आणली जाते अशी तक्रार आहे ना? येथे तथाकथित कुतुबमिनारबद्दल तर अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यांची तड लावण्यास तुम्हाला कोणी थांबवले आहे? हर्षद सरपोतदार यांची पोस्ट खाली...

कुतुबमिनार की हिंदू विजयस्तंभ ? 

भा.ज.प. चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य भा.ज.प. चे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी हे एक लेखक आणि इतिहास अभ्यासकही आहेत. 'कुतुब मिनार - भारताच्या इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार' नामक त्यांचं पुस्तक (प्रकाशक- विराट प्रकाशन, पुणे.) अलीकडेच वाचनात आलं. त्यात त्यांनी कुतुब मिनार हा मुसलमानी मिनार नसून भारतीय हिंदू परंपरेतील विजयस्तंभ असावा अशी शंका प्रदर्शित केली आहे. त्यांचं म्हणणं थोडक्यात खाली मांडतो.

१. कुतुब मिनार हा कुतुबुद्दीन ऐबक याने ११९३ साली हिंदुस्थानवरील स्वतःच्या विजयाचं स्मारक म्हणून बांधला असं आपल्याला शालेय इतिहासापासून शिकवलं जातं. पण हा स्तंभ आणि त्या परिसरातील इमारती मुसलमानी आक्रमण होण्यापूर्वीपासूनच तिथे उभ्या असल्याच्या वस्तुस्थितीला पुरावे आहेत.

२. कुतुबुद्दीन ऐबक हा महंमद घोरी याचा आधी गुलाम आणि नंतर सेनापती होता. ११८० साली भारतात स्वारीच्या निमित्ताने आलेला कुतुबुद्दीन ११८६ मध्ये अफगाणिस्तानात परत गेला. १२०६ साली घोरीचा खून करून 'बादशाह' म्हणून तो भारतात परत आला आणि लवकरच १२१० साली त्याचा मृत्यू झाला. लाहोर ही त्याची राजधानी होती, त्याचा राज्याभिषेकही लाहोरला झाला आणि त्याचा मृत्यूही तिथेच झाला. या सगळ्या घटनाक्रमात कुतुब मिनारसारखं भव्य बांधकाम करण्याचं वेळापत्रक कसं जुळतं हे आजपर्यंत कुठल्याही इतिहासकाराने उलगडून दाखवलेलं नाही. त्याचप्रमाणे लाहोर आणि दिल्ली यांचा मनोरा बांधण्यापुरता काय संबंध? याचाही खुलासा कुणी केलेला नाही.

३. मुहंमद घोरीने पृथ्वीराज चौहानवरील विजयाचं स्मारक म्हणून हा मिनार बांधायला घेतला असं काही 'मान्यवर' इतिहासकार सांगतात. पण घोरीने पानिपतजवळ तराई या ठिकाणी पृथ्वीराजचा पराभव केला असताना हा मनोरा दिल्लीजवळ का उभारला? आणि त्याचं नांव 'घोरी मनोरा' न ठेवता 'कुतुब मिनार' ठेवण्याचं कारण काय? या प्रश्नांचीही उत्तरे कुणी दिलेली नाहीत.




४. मुळात दानस्तंभ किंवा विजयस्तंभ उभारण्याची परंपरा हिंदूंमध्ये आहे (उदा मौर्य किंवा गुप्त सम्राटांचे स्तंभ.) तशी मुसलनांमध्ये असल्याचं दिसत नाही. मशिदीला मनोरे असतात पण ते मशिदीपेक्षा उंच नसतात. कुतुब मिनारच्या परिसरातही (तथाकथित) मशीद आहे. पण त्या मशिदीपेक्षा हा मनोरा उंच कसा? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नाही.

५. इब्न बतूता हा सुप्रसिद्ध मोरोक्कन प्रवासी इ. स. १३३३ ते १३३७ या काळात भारतात मोहंमद तुघलकच्या दरबारात न्यायाधीश म्हणून काम करत होता. तो या मिनारविषयी आपल्या पुस्तकात म्हणतो, 'हा स्तंभ कुणी उभा केला याची निश्चित माहिती उपलब्ध नाही.' बतूता याने काही वेळा कुतुबुद्दीन ऐबक याचा उल्लेखही पुस्तकात केला आहे. पण हा मनोरा त्याने बांधला असं चुकूनही तो म्हणत नाही किंवा या मनोऱ्याचा 'कुतुब मिनार' असा उल्लेखही करत नाही.

६. वस्तुस्थिती अशी आहे, की या मनोऱ्याचा 'कुतुब मिनार' असा पहिला उल्लेख सर सय्यद अहमद खान (१८१७-१८९७) यांनी १८५२ साली लिहिलेल्या 'असर-उस-सानादीद' नामक प्रबंधात प्रथम केला. गंमत म्हणजे या प्रबंधात 'ही इमारत व हा मनोरा हिंदूंचा असून पृथ्वीराज चौहान याने आपल्या मुलीसाठी हा मनोरा बांधवून घेतला' असं विधान त्यांनी केलं आहे. आणि तरीही ते त्याला 'कुतुब मिनार' का म्हणत आहेत याचा खुलासा होत नाही. अर्थात त्यांच्या कुठल्याच विधानाला त्यांनी कसलाही आधार किंवा संदर्भ सदर प्रबंधात दिलेला नाही.

७. कुतुब मिनारच्या आवारातील तथाकथित मशिदीचं बांधकाम अर्धवट अवस्थेतच आहे व त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर हिंदू मंगलकलशाचं चिन्ह कोरलेलं आहे. एवढंच नव्हे, तर त्या इमारतीत आणि संपूर्ण आवारात गणपती, महावीर, शिव-पार्वती, यक्ष, अप्सरा, सवत्स धेनू, घंटा, गोमुख अशी शेकडो हिंदू चिन्हे आणि मूर्ती कोरलेल्या आढळतात. खुद्द मनोऱ्याच्या भिंतीवरही वेलबुट्टी, साखळ्या, घंटा अशा हिंदू चिन्हांबरोबरच संस्कृतमधील मजकूरही आढळतो. 'घंटा' ही मुसलमानी परंपरेत निषिद्ध असून ते सैतानाचं वाद्य समजलं जातं. पण विरोधाभास म्हणजे या मनोऱ्याच्या व मशिदीच्या भिंतीवर सर्वत्र अनेक घंटा कोरलेल्या दिसून येतात.

८. या मिनाराजवळ असणाऱ्या ज्या बांधकामाला सध्या 'मशीद' म्हणून संबोधलं जातं, तो वास्तविक हिंदू सभामंडप आहे हे हिंदूंच्याच नव्हे, तर तिथे फिरणाऱ्या परदेशी पर्यटकांचाही लक्षात आल्याशिवाय रहात नाही. कारण संपूर्ण वास्तुरचना व त्यावर कोरलेली चिन्हे ही पूर्णपणे हिंदू पद्धतीचीच आहेत. त्याचप्रमाणे ज्याला 'सराई' म्हटलं जातं असा तेथील भागसुद्धा कुठल्याही हिंदू परंपरेतील धर्मशाळेच्या ओवऱ्यांप्रमाणेच असून त्यावरही कित्येक हिंदू चिन्हे कोरलेली आहेत.

९. आश्चर्याची बाब म्हणजे या परिसरात नेहरूंच्या काळात पुरातत्व विभागाने लावलेला एक फलक असून त्यावर 'कुतुबुद्दीन ऐबक याने २७ हिंदू व जैन मंदिरे उध्वस्त करून व त्या सामुग्रीचा वापर करून त्याच जागी हा मनोरा बांधला !' असं निःसंदिग्ध शब्दांमध्ये लिहून ठेवलं आहे. हिंदूंचा या मनोऱ्याशी असलेल्या निकटच्या संबंधांची ही एकप्रकारे कबुलीच आहे.

१०. प्रा. एम. एस. भटनागर या संशोधकांनी १९६१ पासून सतत १५ वर्षं या मनोऱ्याचा आणि त्या परिसराचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे, की दिल्लीजवळचा 'मेहरौली' हा परिसर प्राचीन काळी सम्राट विक्रमादित्याच्या राजधानीचं ठिकाण होतं व सुप्रसिद्ध गणिती वराह मिहीर हा त्याच्या पदरी होता. (मिहीर वरूनच मेहरौली नांव पडलं.) हा मनोरा म्हणजे 'विष्णुस्तंभ किंवा ध्रुवस्तंभ' या नांवाने ओळखला जाणारा अवकाश निरीक्षणासाठी बांधलेला त्याच्या वेधशाळेचा भाग होता. विमानातून पाहिल्यास मनोऱ्याच्या माथ्यावर २४ पाकळ्यांचं कमळ स्पष्टपणे दिसतं असा दावा भटनागर यांनी केला आहे. वर दिलेल्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर हा दावा आधुनिक अभ्यासकांनी पुन्हा एकदा तपासून पाहणं अगत्याचं आहे.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034