मणीज" या प्रसिद्ध उपाहारगृहाचे मालक नारायणस्वामी गेले
माटुंग्याच्या रुईया आणि पोदार महाविद्यालयाजवळच्या "मणीज" या प्रसिद्ध उपाहारगृहाचे मालक नारायणस्वामी गेले.
बातमी ऐकून आत काळीज गलबलून आलं. मुंबईतल्या माझ्या शाळेच्या ग्रुपवर 'हे गेले आज' अशी बातमी कुणीतरी टाकली तेव्हा...
माझी शाळा दादरची, IES English Medium.
मी रहायचो माहीम ला..
सकाळी घरून पावणे दहाला निघायचो शाळेत आणि संध्याकाळी पावणेपाचला शाळा सुटली की धावतपळत माटुंगा जिमखान्यात जायचो क्रिकेट खेळायला सात वाजेपर्यंत....
जबऱ्या भूक लागलेली असायची, दोन सुट्ट्यांचे दिवसभराचा डबा संपलेला असायचा आणि मग रुईयावरून पुढं जिमखान्यात जाताना पावलं आपोआप आतल्या बाजूला असलेल्या मणीजकडं वळायची...
आकर्षणाचा मुद्दा एकच असायचा...
गरमागरम वाफाळत्या इडली आणि वड्यांसोबत इथं मिळणारं 'अनलिमिटेड' ऑथेंटिक दाक्षिणात्य टेस्टी सांबार आणि चटणी...
एक इडली घेतली तरी मणिजचे वेटर प्रेमाने आणि पोटभर वाफाळतं सांबार आणि चटणी वाढायचे परत परत या मालकाच्या निर्देशानुसार अजिब्बात कटकट न करता...कितीही वेळा...आम्हा शाळकरी मुलांना.
अक्षरश: दोन रुपयात दोन इडल्या आणि पोटभर सांबर आणि चटणी हपसायचो तेव्हा आम्ही शाळकरी मुलं तिथं...मणीजमध्ये
तेव्हा तब्बल चाळीसेक वर्षांपूर्वी शाळेत आमचं पोट प्रेमाने भरणाऱ्या या सद्गृहस्थांच्या आत्म्याला शांती मिळो ही सदिच्छा
*दयानंद नेने*
Comments
Post a Comment