शेतजमीन विषयक फेरफार नोंदवहीत झालेल्या चुकांची दुरुस्ती
शेतजमीन विषयक महत्वाच्या संज्ञाः भाग-3
मागील लेखात आपण "फेरफार नोंद" करण्याबद्दलची माहिती घेतली, मात्र अनेकदा अश्या नोंद फेरफार नोंदवहीत घेतांना चुकीच्या नोंदी केल्या जाऊ शकतात.
आजच्या लेखात आपण फेरफार नोंदवहीत झालेल्या चुकांची दुरुस्ती कशी करावी आणि त्याही पुढे जाऊन आपल्या व्यवहाराची नोंद करतेवेळी चुक होऊ नये म्हणुन कार खबरदारी घ्यावी याबद्दल माहिती घेऊ.
फेरफार नोंदवहीत नोंद करतेवेळी झालेली चुकीची नोंद जशीच्या तशी 7/12 वर घेतली जाते, मात्र अशी चुक लक्षात आल्यावर लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करणे क्रमप्राप्त ठरते.
साधारणपणे नोंदवहीत होणार्या चुका-
अ. लेखनातील चुका व त्यांची दुरुस्ती: शक्यतो नावात चुका होतात, गट नंबर वगळला जातो अश्या चुकांसाठी पुन्हा नोंद घेण्याची आवश्यकता नसते. अश्या चुका दुरुस्तीसाठी खातेदाराने संबंधीत तहसीलदार साहेबांकडे लेखी अर्ज करावा. तहसीलदारांना महाराष्ट्र महसुल अधिनियम कलम 155 अंतर्गत संबंधीत दुरुस्तीचे अधिकार असतात. ज्या प्रकरणात महसुल खात्याची चुक असते तशा प्रकरणात तहसीलदार स्वतः निर्णय घेऊन चुकीची दुरुस्ती करु शकतात. मात्र आदेश देतांना "जमीन महसुल कायद्यातील संबंधीत तरतुदीनुसार चुक दुरुस्त व्हावी" असा सुस्पष्ट आदेश असावा.
ब. हक्कांबाबत होणार्या चुका व त्यांची दुरुस्तीः जमीनीचे मालकी हक्क, कुळ, वारस, इ. हक्कांमध्ये आपल्याला स्थान देण्यात यायला हवे होते पण तसे स्थान दिलेले नाही असा दावा सांगणार्या व्यक्तिला सबळ पुराव्यांसह सदर जमीनीत आपला हक्क आहे असे अपिल सदरच्या फेरफार नोंदीविरोधात दाखल करता येते.
क. जमीन खरेदी-विक्री व्यवहाराबाबतच्या नोंदीमध्ये झालेल्या चुका व त्यांची दुरुस्ती: पुर्वी झालेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती संबंधी, नोंदणी दुबार होणे कामी अपील करावी लागते, सदर अपील अर्ज केल्यानंतर फेरतपासणी केली जाते व सदर दुरुस्तीसंबंधी निर्णय घेण्यात येतो. साधारणतः खातेदार तहसीलदार कार्यालयात दुरुस्ती अर्ज दाखल करतात आणी फेरफार नोंदणी दुरुस्तीची मागणी करतात पण तसे योग्य नाही, त्यासाठी न्यायालयीन प्रक्रीयेतुन जावे लागते.
आता या सर्व अडचणीतुन जावे लागु नये म्हणुन आपल्या जमीनीबाबत नोंदवहीत चुकीची नोंद होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे साधारणतः दरवर्षी एकदा तरी आपण जमीनीचा 7/12 काढुन तपासुन घ्यावा व त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास तलाठ्यांच्या निदर्शनास आणुन द्यावे.
अ. पिक पाहणीच्या काळात जमीनमालक सोडुन दुसर्या कुणाचेही नाव वाहिवाटदार म्हणुन दाखल करण्याचे अधिकार तलाठ्यांना नाहीत. त्यामुळे जर जमीन मालकाव्यतिरिक्त अन्य कोणीही वाहिवाटीचा दावा करत असेल तर फक्त तसा अहवाल तहसीलदारांकडे पाठवण्याची जबाबदारी तलाठ्यांची आहे. त्यानंतर योग्य ती चौकशी करुन वाहिवाटदार सदरी कोणाचे नाव लावावे याचा निर्णय तहसीलदार घेतील आणी मग सदर व्यक्तिचे नाव नोंद करण्याचे काम तलाठी करतील.
ब. पिक पाहणीच्या काळात शेतातील पिके व त्यांचे क्षेत्र, तसेच इतर झाडे यांची नोंद 7/12 वर घेणे. पिक पाहणीवेळी स्वतः जातीने हजर राहणे.
क. आपल्या शेतजमीनीवर किती क्षेत्रावर कोणते पिक घेतले आहे याची नोंद 7/12 वर अचुकपणे झालेली आहे याची काळजी घेणे गरजेचे आहे.
ड. एखाद्या प्रकल्पासाठी अथवा शासकिय उपक्रमासाठी जमीन अधिग्रहणाबाबत काही माहिती प्रसिद्ध होते आहे का याकडे लक्ष ठेवणे.
इ. शेजारील जमीन मालकाने मोजणीच्या खुणेचा दगड हलवल्यास अथवा काढुन टाकल्यास त्याबद्दल तलाठी तसेच मंडल अधिकारी यांना ताबडतोब लेखी अर्ज देणे.
फ. पाझर तलाव, स्मशानभुमी, गावठाण रस्ता, पाण्याचा पाट, तसेच इतर सार्वजनिक तसेच सरकारी उपक्रमासाठी जमीन संपादीत केली जाते. अश्यावेळी गैरहजर न राहता समक्ष हजर राहुन किती जमीन व कोणत्या बाजुची जमीन संपादीत केली जाणार आहे याची योग्य माहिती घ्यावी. त्याबाबत काही हरकत असल्यास भुसंपादनाची अंतिम अधिसुचना जाहीर होण्यापुर्वीच आपली हरकत योग्य त्या सक्षम अधिकार्यांकडे दाखल करावी.
कोणतीही नोंद प्रमाणित झाल्यावरच त्याची नोंद गाव नमुना 6 म्हणजेच 7/12 वर घेतली जाते. आणी 7/12 वर आळे करुन जुन्या हक्कधारकाच्या नावाला कंस करुन नविन हक्कधारकाचे नाव तपशीलासह नोंदवले जाते.
पुढच्या लेखात आपण अश्याच एका महत्वाच्या विषयाची माहिती घेऊया.
*****************************************
Comments
Post a Comment