शेतजमीन विषयक "फेरफार" भाग-2
शेतजमीन विषयक महत्वाच्या संज्ञाः भाग-2
"फेरफार"
शेतजमीन विषयक कामात फेरफार हा शब्द बर्याचदा आपल्या कानी पडतो पण बहुतांश लोकांना फेरफार म्हणजे नेमके काय, त्याचे प्रकार, फेरफार नोंदी याविषयी काहीच माहिती नसते. तर चला आजच्या लेखात आपण फेरफार बद्दल अधिक जाणुन घेऊया.
फेरफार म्हणजेच गाव नमुना नं. 6 मधील नोंदी, याचाच अर्थ जमीन हक्क संपादन पत्रक आणि फेरफार नोंदवही. या नोदवहीमध्ये सदर जमीनीचे सर्व व्यवहार, वारस, खरेदीविक्री तारीख, खरेदी रक्कम, इत्यादी संबंधीत परीपुर्ण माहितीची नोंद असते. याच फेरफार नोंदवहीतल्या नोंदी आपल्या 7/12 वर येतात. 7/12 वर कोणतीही नोंद घेण्यापुर्वी फेरफार नोंद केली जाते. गावदप्तरी याला गाव नमुना नं. 6 फेरफारची नोंदवही म्हटले जाते, अनेकदा याला नमुना 'ड' सुद्धा म्हणतात.
फेरफारची नोंदवही ही एकप्रकारे फेरफारची दैनंदिनीच आहे. जमीनीच्या मालकी अधिकारात जसाजसा बदल होत जातो, त्याच क्रमाने यात नोंदी होत जातात. या गावनमुना फेरफार नोंदवहीत वेळीच नोंदी न घेतल्या गेल्यास सदर जमीन मालकाच्या अडचणी अनेकपटीनी वाढु शकतात.
फेरफार नोंदवही ( गाव नमुना नं. 6 ) चे मुख्यतः चार प्रकार आहेत.
1. गाव नमुना नं. 6 (अ): यालाच वाद-विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही म्हटले जाते, फेरफारास हरकत घेतलेली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकार्यांच्या निर्णयाची माहिती या नोंदवहीत असते.
2. गाव नमुना नं. 6 (ब): याला विलंबशुल्क नोंदवही म्हणतात, विलंबशुल्काच्या नोंदी या वहीत घेतल्या जातात.
3. गाव नमुना नं. 6 (क): हिच वारस प्रकरणांची नोंदवही असते, वारसाहक्काच्या नोंदी इथेच सापडतात.
4. गाव नमुना नं. 6 (ड): हि असते पोट हिस्स्याची नोंदवही, या वहीत पोटहिस्स्याची वाटणी व भुसंपादनाची नोंद असते.
आता आपण या फेरफारच्या नोंदी कश्या केल्या जातात ते पाहुया:
यात चार स्तंभ आखलेले असतात.
सर्वात पहिल्या स्तंभात फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहीलेला असतो.
दुसर्या स्तंभात हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तिच्या अधिकारांचे स्वरुप लिहीलेले असते, यातच फेरफारचा दिनांक, सुचना मिळाल्याचा दिनांक, व्यवहाराचे स्वरुप, संबंधीत खातेदारांची नावे, व्यवहाराचा दिनांक आणि मोबदला रक्कम, इ तपशीलवर नोंदी असतात.
तिसर्या स्तंभात सदर जमीनीचा व्यवहार ज्या गट नं. अथवा सर्वे नं. शी संबंधीत आहे तो नंबर लिहीला जातो.
चौथ्या स्तंभात या फेरफाराच्या नोटीस संबंधीतांना देऊन, चौकशी करुन व केलेला फेरफार बरोबर करण्यात आला आहे किंवा कसे याची खात्री करुन प्रमाणन अधिकारी, मंडळ अधिकारी त्यांचा आदेश स्तंभ चार मध्ये देऊन पदनामासहीत स्वाक्षरी करतात.
या सर्व फेरफार नोंदी तलाठी करत असतात, वास्तविक तलाठींना फक्त नोंद करण्याचा अधिकार असतो, एखादी नोंद मंजुर अथवा नामंजुर करण्याचा अधिकार तलाठ्यांना नसतो, तो अधिकार फक्त प्रांत अधिकार्यांना असतो. एखादी नोंद एकदा मंजुर अथवा नामंजुर झाल्यास त्यमध्ये बदल करण्याचा अधिकार तलाठी किंवा मंडल अधिकार्यांस नाही, ते फक्त नोंदी प्रमाणित करतात.
एखादी जमीन जेव्हा खरेदी करुन किंवा वारसाहक्काने अथवा इतर कोणत्याही आधारे आपल्याला येते तेव्हा ती जमीन आपल्या मालकीची आहे याची रितसर नोंद करावी लागते आणि त्यासाठी ती जमीन आपल्याकडे कशाप्रकारे आली याचे पुरावे सादर करावे लागतात.
त्या सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सर्वात आधी फेरफार नोंद लिहीली जाते आणि नंतर ती प्रमाणित आहे किंवा नाही हे तपासण्याची कार्यवाही सुरु होते.
यासंपुर्ण प्रकियेत एखादी नोंद मंजुर अथवा नामंजुर झाल्यास त्याबद्दल बाजु मांडण्यासाठी संबंधीत प्रांत अधिकार्यांकडे अपिल दाखल करावे लागते.
एखादी कायद्याने प्रमाणित नोंद चुकीची आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती नोंद खरी मानण्यात येते, जमीनीच्या मालकी हक्कात होणार्या गेल्या शंभर वर्षांतील नोंदींची माहिती आपल्याला फेरफार नोंदवहीतुन मिळु शकते कारण त्या तश्या क्रमवारीत नोंद केलेल्या असतात.
एवढे सर्व असुनही बर्याचवेळा फेरफार नोंद होतांना चुका होऊ शकतात. अश्या चुका का होतात? त्या चुकांची दुरुस्ती कशी करावी, चुकीची नोंद होऊच नये म्हणुन काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती आपण पुढील लेखात घेऊया.
सौजन्याने: निर्माण नक्षत्र सोसायटी नाशिक
Comments
Post a Comment