शेतजमीन विषयक महत्वाच्या संज्ञाः भाग-1

 शेतजमीन विषयक महत्वाच्या संज्ञाः भाग-1

आजच्या काळात शेती आणि शेतजमीन यांची चांगलीच मागणी वाढतांना दिसत आहे, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जमीनीची मागणी वाढते आणि पर्यायाने वाढणार्या लोकसंख्येला शहरांमध्ये सामावुन घेण्यासाठी नवनवीन पायाभुत सुविधा, गृहप्रकल्प, रस्ते, बस, रेलवे, इ साठी सुद्धा जमीनीची आवश्यकता वाढतीच रहाणार आहे.


जमीनीच्या वाढत्या मागणीबरोबरच त्या विषयक आर्थिक फसवाफसवी आणी गुन्हे सुद्धा वाढणे स्वाभाविकच आहे. यापासुन वाचायचे असेल तर आपल्याला शेतजमीनीसंबंधी महत्वाच्या संज्ञा समजुन घेणे गरजेचे आहे.

इथुन पुढील काही लेखांद्वारे आपण कूळ हक्क, 7/12 मधील फेरफार, शेतजमीनीचा रस्ता, जमीन खरेदी-विक्री नोंदणी, इ विषयांसंबंधी माहिती पाहु.

"कुळ हक्क":

सर्वप्रथम कुळ हक्क म्हणजे काय आणि कुळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे समजुन घेऊ.

(1) सन 1939 च्या कुळ कायद्यात दिनांक 01.01.1938 पूर्वी सतत 6 वर्षे कुळ म्हणून जमीन करणार्या व्यक्तीला किंवा दिनांक 01.01.1945 पुर्वी सतत 6 वर्षे जमीन कसणारा आणि दिनांक 01.11.47 रोजी जमीन कसणारा कुळ या सर्वांची नोंद नोंदणीपत्रकात संरक्षित कुळ म्हणून केली गेलेली आहे.

(2) सन 1955 साली कुळ कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणा करण्यापुर्वी वहिवाटीमुळे किंवा रुढीमुळे किंवा कोर्टाच्या निकालामुळे ज्या व्यक्तींना कायम कुळ म्हणून संबोधण्यात आले व त्यांची नोंदणी हक्कनोंदणी पत्रकात कायम कुळ म्हणून नोंद केली गेली आणि त्या सर्वांना कायम कुळ असे म्हटले जाते.

(3) आज रोजी दुसर्याच्या मालकीची कोणतीही जमीन कायदेशीररित्या जर एखादा माणूस कसत असेल व अशी जमीन, जमीन मालकाकडून जातीने कसण्यात येत नसेल तर त्याला कुळ असे संबोधले जाते. याचाच अर्थ तो माणूस जमीन मालकाच्या कुटुंबातील नसला पाहिजे किंवा जमीन गहाण घेणारा नसला पाहिजे किंवा पगारावर ठेवलेला नोकर नसेल किंवा मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर त्याला कुळ असे म्हणतात.

(4) कुळ होण्याच्या नियमाला काही महत्वाचे अपवाद करण्यात आले आहेत. विधवा किंवा अवयस्क व्यक्ती किंवा शरीराने किंवा मनाने दुर्बल झालेला माणूस किंवा सैन्यदलात काम करणारा माणूस, यांची जमीन दुसरी व्यक्ती जर कसत असेल तरी, त्या व्यक्ती स्वत:च जमीन कसतात असे मानले जाते.

(5) कुळ हक्काच्या संदर्भातील दुसरी बाजू म्हणजे जमीन मालकाने स्वत:हून जमीन कसणे होय. याची व्याख्या सुध्दा कुळ कायद्यात करण्यात आली आहे. एखादा इसम स्वत: जमीन कसतो का, हे ठरविण्यासाठी खालील नियम लावले जातात.

(अ) स्वत: अंगमेहनतीने तो जमीन कसत असेल तर,

(ब) स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही इसमाच्या अंगमेहनतीने जमीन कसत असेल तर,

(क) स्वत:च्या देखरेखीखाली मजुरीने लावलेल्या मजुरांकडून जमीन कसुन घेत असेल तर, असे मजुर की ज्याला पैसे दिले जात असोत किंवा मालाच्या रुपाने वेतन दिले जात असो. परंतु पिकाच्या हिश्श्याच्या रुपाने जर मजुरी दिली गेली तर तो कुळ ठरु शकतो.

(6) कुळ ही संकल्पना समजण्यास थोडी अवघड आहे, परंतु कुळ होण्यासाठी खालील महत्वाचे घटक मानले जातात.

(अ) दुसर्याच्या मालकीची जमीन अन्य इसम वैध किंवा कायदेशीररित्या कसत असला पाहिजे.

(ब) जमीन मालक व कुळ यांच्यात तोंडी का होईना करार झाला असला पाहिजे व तोंडी करार कोर्टात सिध्द देखील झाला पाहिजे.

(क) असा इसम प्रत्यक्ष जमीन कसत असला पाहिजे व त्या बदल्यात तो मालकाला खंड (उत्पादीत काहीतरी हिस्सा) देत असला पाहिजे.

(ड) जमीन मालक व कुळ यांच्यात पारंपारिकरित्या जपलेले मालक व कुळ असे विशिष्ठ सामाजिक नाते असले पाहिजे.

आता आपण कुळ कायद्यातील काही महत्वाचे कलम पाहु.

कुळ कायदा कलम 43 च्या अटी:

जी कुळे यापूर्वी जमीनीचे मालक झाले आहेत त्यांच्या दृष्टीने कुळ कायदा कलम 43 नुसार जमीन विकायला बंदी केली जाते व तसा शेरा त्याच्या 7/12 वर इतर हक्कात लिहिला असतो.

“कुळ कायदा कलम- 43 ला पात्र”, अशा प्रकारचा हा शेरा 7/12 वर लिहिला जातो. शहरीकरणामुळे किंवा स्वत:च्या गरजेनुसार जमीन विकण्याची आवश्यकता असल्यास, कुळांना अशी जमीन विकण्यापूर्वी प्रांत अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. जमीन विक्रीची परवानगी कोणाला द्यावी याबाबतचे नियमदेखील शासनाने बनविले आहे.

त्यानुसार कुळ कायदा कलम-43 ला पात्र असलेली जमीन खालील अटींवर विकता येते.

(1) बिगर शेती प्रयोजनासाठी.

(2) धर्मादाय संस्थांसाठी किंवा शैक्षणिक संस्थेसाठी किंवा सहकारी संस्थेसाठी.

(3) दुसर्या शेतकर्याला परंतु जर असे कुळ कायमचा शेती व्यवसाय सोडून देत असेल तर किंवा जमीन कसायला असमर्थ ठरला असेल तर.

(4) अशी जमीन विकण्यापूर्वी शासकीय खजिन्यात अतिशय नाममात्र म्हणजे जमिनीच्या आकाराच्या 40 पट एवढी नजराण्याची रक्कम भरावी लागते. याचा अर्थ अशी जमीन सार्वजनिक कामासाठी किंवा संस्थांना विकतांना फारशा जाचक अटी नाहीत. परंतु सर्रास दुसर्या जमीन मालकास अतिशय किरकोळ पैसे भरुन मालकीच्या झालेल्या जमीनी, कुळांनी परस्पर विकू नयेत म्हणून वरील क्रमांक 3 ची महत्वाची अट ठेवण्यात आली आहे व त्यांना शेवटचा उपाय म्हणून शेती व्यवसाय सोडतानाच अशी कुळ हक्काची जमीन विकली पाहिजे असा याचा अर्थ आहे.

आता नव्याने कुळहक्क निर्माण होतो का हे पाहु.

आज एखादा इसम कुळ होऊ शकतो का? तर कुळ कायदा कलम क्र. 32 (ग) नुसार दिनांक 01.04.1957 रोजी जमीन कसणार्या माणसाला मालक म्हणून जाहिर केले आहे, परंतु आजरोजी जमीनीत नव्याने कुळ निर्माण होऊ शकतो का? व असल्यास कशा पध्दतीने कूळ निर्माण होतो याबाबत शेतकर्यांमध्ये कुतुहुल आहे.

याबाबतची तरतूद कुळ कायद्याच्या कलम क्र. 32 (ओ) मध्ये नमूद करण्यांत आली आहे.

कुळ कायदा कलम क्र. 32 (ओ) नुसार आजही दुसर्याची जमीन कायदेशीररित्या एक वर्ष जरी दुसरा इसम कसत असेल तर तो कुळ असल्याचा दावा करु शकतो. तथापी त्यासाठी खालील महत्वाच्या अटी कायम आहेत.

(अ) वहिवाटदार व मालक यांच्यात करार झाला असला पाहिजे.

(ब) तो मालकाकडून जमीन कसत असला पाहिजे.

(क) तो खंड देत असला पाहिजे.

(ड) जमीन मालक व कुळ असे विशिष्ठ नातेसंबंध असले पाहिजेत.

पण आजकाल जमीन मालक स्वत:हुन कोणतेही करार वहिवाटदाराशी करीत नसल्यामुळे, कलम क्र. 32(ओ) च्या दाव्यांची संख्या अतिशय कमी आहे. जमीन मालकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे अशा पध्दतीचे कोणतेही करार तो वहिवाटदाराबरोबर करीत नाही. तथापी आधी पिक-पाहणीला नांव लावून घ्यावयाचे व एक वर्षाच्या पिक पाहणीचा 7/12 जोडून दिवाणी न्यायालयातुन जमीन मालकाला जमीनीत यायला मनाई आदेश आणावयाचे व त्यानंतर काही दिवसांनी कलम क्र. 32 (ओ) नुसार कुळ असल्याचा दावा करावयाचा अशाप्रकारे वहिवाटदार व्यक्ती कूळ असल्याचा दावा सर्वसाधारणपणे करतात, याबाबत जमीन मालकांमध्ये सजगता आली पाहीजे.

तर वाचकांनो आपल्याला या लेखाद्वारे "कुळ" या संज्ञेबाबत साधारण माहिती मिळाली असेल शी आशा करतो, पुढील काही लेखांद्वारे आपण शेती आणि शेतजमीन विषयक इतर संज्ञा पाहुया.

सौजन्याने: निर्माण नक्षत्र सोसायटी नाशिक


************************

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034