रा. स्व. संघ सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे मनोगत - अयोध्या राममंदिर भूमिपूजन...🚩

🚩रा. स्व. संघ सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे मनोगत – 
अयोध्या राममंदिर भूमिपूजन...🚩

नृत्यगोपाल दास जी यांच्यासह उपस्थित सर्व श्रद्धेय संत, भारताचे आदरणीय आणि जनप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सर्व नागरिक, सज्जन, माता भगिनी, 

हा आनंदाचा क्षण आहे. अनेक प्रकारचा आनंद होतो आहे. एक संकल्प केला होता. मला आठवते आहे, रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांनी आम्हाला पाउल पुढे टाकण्यापूर्वीच सांगितले होते की प्रचंड मेहनतीने २० ते ३० वर्षे काम केले तरच यश मिळेल. २०-३० वर्षे काम केले तेव्हा कुठे ३०व्या वर्षाच्या सुरुवातीला आम्हाला संकल्पपूर्तीचा आनंद मिळतो आहे. जीवतोड प्रयत्न केले, अनेकांनी बलिदान दिले. ज्यांनी बलिदान दिले ते सगळे आज सूक्ष्म रूपाने येथे उपस्थित आहेत. अनेकजण आज येऊ शकले नाही. रथयात्रेचे नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवाणी आज घरातून हा कार्यक्रम पाहत असतील. अनेक जण येऊ शकतात पण परिस्थितीमुळे त्यांना बोलावणे शक्य नाही. ते ही आपापल्या घरी आनंद साजरा करत असतील. संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली आहे. कित्येक शतकांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पण मोठा आनंद आहे तो देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आवश्यकता होती, ज्या आत्मभानाची आवश्यकता होती त्याचे सगुण साकार अधिष्ठान निर्मितीच्या कार्याला आज प्रारंभ होत आहे. हे अधिष्ठान आहे आध्यात्मिक दृष्टीचे. सियाराम मय सब जग जानी! सारे जग आपल्यात आणि साऱ्या जगात आपण आहोत असे समजण्याची भारताची दृष्टी आहे. त्यामुळे येथील सर्वांचा जगासोबत असणारा व्यवहार हा सर्वाधिक सज्जनतेचा आहे. या देशाचा सर्वांसोबत सामुहिक व्यवहार वसुधैव कुटुंबकम असा आहे. असा स्वभाव व असे कर्तव्य निभावणे आहे. व्यावहारिक जगताच्या मायेच्या गुंत्यातून मार्ग शोधून शक्य तेवढ्यांना शक्य तेवढ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची पद्धत असते त्या पद्धतीचे अधिष्ठान येथे होत आहे. परमवैभव संपन्न आणि सर्वांचे कल्याण करणारा भारत निर्माण करण्याचा हा शुभारंभ आहे. या निर्माणाचे व्यवस्थात्मक नेतृत्व ज्यांच्या हाती आहे अशा त्या नेतृत्वाच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे याचाही आनंद आहे. 


अनेकांचे या प्रसंगी स्मरण होते. वाटते की, आज अशोक जी असते तर किती बरे झाले असते. महंत परमहंस रामचंद्रदास असते तर किती बरे झाले असते. पण त्याच्या(परमेश्वराच्या) इच्छेप्रमाणे सारे होत असते. पण मला विश्वास आहे की जे उपस्थित आहेत ते मानाने आणि जे नाहीत ते सूक्ष्म रुपात हा आनंद घेत आहेत. तो आनंद शतगुणीत करत आहेत. या आनंदात एक स्फुरण आहे, एक उत्साह आहे. आपण हे करू शकतो, आपल्याला करायचे आहे ही भावना आहे. 

एतद्देश प्रसुतस्य साकाशा सक्र जन्मनाद 

स्वं स्वं चरित्रं शिक्षेरं पृथिव्या सर्व मानवा

जगण्याचे शिक्षण द्यायचे आहे. सध्या कोरोनाचा काल सुरु आहे. संपूर्ण विश्व अंतर्मुख झाले आहे. विचार करत आहे की काय चुकत आहे. कोणता मार्ग निवडावा. दोन मार्ग तर आपण शोधले. तिसरा मार्ग आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. तिसरा मार्ग आपल्याकडे आहे. आपण तो देऊ शकतो. ते काम आपल्याला करायचे आहे. त्याची तयारी करण्याचा, संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. त्यासाठी आवश्यक तो पुरुषार्थ आपण केला आहे. श्रीरामांच्या चरित्रापासून आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की सारा पुरुषार्थ, पराक्रम, वीरवृत्ती आपल्या नसानसांत आहे. ती आपण गमावलेली नाही. आपण सुरुवात तरी करू, कार्य पूर्णत्वास जाईल असा विश्वास, असे स्फुरण, प्रेरणा आजच्या या दिवसाकडून आपणां सर्व भारतीयांना मिळते. यात कोणीही अपवाद नाही कारण सगळेच रामाचे आहे. सगळ्यांतच राम आहे. 

इथे आता मंदिर उभे राहील. भव्य मंदिर तयार होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जबाबदाऱ्यांचे विभाजन झाले आहे. प्रत्येकजण आपापले काम करेल. त्यात आपले काम काय असेल? आपल्याला आपल्या मनातील अयोध्या सजवायची आहे. या भव्य कार्यासाठी प्रभू श्रीराम ज्या धर्माचे विग्रह मानले जातात तो जोडणारा धर्म, सर्वांची उन्नती करणारा धर्म आहे त्याचा ध्वज आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण विश्वाला शांती देणारा भारत आपल्याला उभा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला मनात अयोध्या तयार करायची आहे. इथे जसजसे मंदिर उभे राहिल, तसतशी ही अयोध्याही उभी राहिली पाहिजे. मंदिर पूर्ण होण्याच्या आत आपले मनमंदिर उभे राहणे गरजेचे आहे. त्याची आवश्यकता आहे. कसे असेल हे मनमंदिर?

काम क्रोध मद मान न मोहा
लोभ न छोब न राग न द्रोहा
जिनके कपट दंभ नही माया
तिनके हृदय बस हुं रघुराया

जात पात धनु धर्म बढाई 
प्रिय परिवार सदन सुखदाई 
सब कछी तुम हुं उर लायी 
ते ही के हृदय रहुं रघु राई

आपल्या हृदयात रामाचा निवास असला पाहिजे. म्हणूनच सर्व दोष, रोष, विकारांपासून, द्वेषापासून, शत्रुत्वापासून ते मुक्त असले पाहिजे. जगाची माया कशीही असो. त्या मायेशी सर्व व्यवहार  करण्यास समर्थ आणि हृदयातील सर्व भेदांना तिलांजली देत देशवासीयांसह संपूर्ण जगतास स्वीकारण्याची क्षमता असणारी व्यक्ती व समाज घडवायचा आहे. या घडविण्याचे एक सगुण साकार प्रतीक - जे सदैव प्रेरणा देत राहील – इथे उभे राहत आहे. भव्य राम मंदिर निर्माणाचे कार्य हे भारतातील अनेक मंदिराप्रमाणे एखादे मंदिर उभे करण्यासारखे नाही. त्या सर्व मंदिरांच्या मूर्तींच्या आशयाचे पुनर्स्थापन आणि पुनर्प्रकटीकरण करण्याचा हा समारंभ समर्थ हातांनी संपन्न झाला आहे. या समयी, आनंदाच्या क्षणी मी आपले सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझ्या मनात जे विचार उमटले ते चिंतनाकरिता आपल्यासमोर मांडून आपला निरोप घेतो.🚩

From : विश्वसंवाद केंद्र पुणे

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034