अयोध्या - .या शिल्पकारांना प्रणाम* 🙏🚩🙏
प्रभू श्रीरामाच्या चरित्राचे स्मरण करताच भूमिकन्या सीतेपासून लंकापुरुष बिभीषणापर्यंत असंख्य विभूतींचे स्मरण अपरिहार्यपणे होतेच. विशेषतः बंधू लक्ष्मण, महाबली हनुमान,नल,नील, जांबुवंत, सुग्रीव,जटायू,अंगद अशा अनेक वीरांच्या आठवणी उचंबळून येतात.आता त्याच प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन काही तासांवर येऊन ठेपले असताना अशाच अनेक योद्धया महापुरुषांच्या स्मृती हिंदू समाजाच्या मनात उचंबळून येत असतील. त्यापैकी काही प्रमुख कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करीतच भूमिपूजन सोहळ्याला अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न:
*मोरोपंत पिंगळे* (1919 ते 2003) 🙏🚩
जबलपूर येथे जन्म. बालवयातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनचे स्वयंसेवक. 1941 पदवीधर झाल्यानंतर संघाचे प्रचारक. संघरचनेतील एक द्रष्टे रणनीतीज्ञ. गोविज्ञान संशोधन, सरस्वती शोध, रामजन्मभूमी मुक्ती यासारख्या,भारतीय संस्कृती जागरणाच्या संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांचा व्यापक आणि वैज्ञानिक मागोवा घेण्याच्या प्रक्रियेचे प्रणेते. *रामजन्मभूमी आंदोलनाचे फिल्डमार्शल* अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.संपूर्ण आयुष्य संघाच्या माध्यमातून समाजसेवेच्या कामी समर्पित. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि मोरोपंत या धुरंधर द्वयाने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे पडद्याआड राहून समर्थ नेतृत्व केले.
*महंत श्री रामचंद्र परमहंस दास* (1913 ते 2003) 🙏🚩
पूर्व बिहार मध्ये जन्म. निर्मोही आखाड्याचे महंत. संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे नाव चंद्रेश्वर तिवारी.1984 मध्ये झालेल्या धर्मसंसदेद्वारे स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष. 1934 पासून मंदिर मुक्तीसाठी प्रखर लढा उभारण्यात अग्रेसर. 1949 मध्ये घुमटाखाली राम लल्ला च्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पाठोपाठ रामलल्लाच्या वतीने न्यायालयात दावा दाखल करून जन्मभूमी मुक्तीसाठी अखेरपर्यंत संघर्षरत राहिले.
*महंत अवैद्यनाथ*
(1921 ते 2014)🙏🚩
उत्तर प्रदेशातील कांदी, जिल्हा पौरी गढवाल येथे जन्म. गोरखपूर येथील गोरक्षपीठाचे महंत.संन्यास घेण्यापूर्वीचे नाव कृपालसिंह बिष्ट.राजकारणातही दीर्घकाळ सक्रिय.काही काळ हिंदुमहासभेचे अध्यक्ष.हिंदू महासभा,जनता पार्टी आणि नंतर दीर्घकाळ भाजपच्या माध्यमातून पाच वेळा आमदार तसेच 1989, 1991आणि1996 च्या निवडणुकांमध्ये खासदार या नात्याने निवडून आले होते.1984 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीचे संस्थापक प्रमुख.अयोध्या आंदोलनात जीवनभर प्रमुख सहभाग.बिहारमधील सीतामढी ते अयोध्या अशी पहिली यात्रा 1984 मध्ये महंत अवैद्यनाथ यांनी आयोजित केली. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे काका तसेच (गोरक्षपीठाचे) गुरू.
*गिरिराज किशोर*
(1920 ते 2014)🙏🚩
मिसौली,जिल्हा इटावा उत्तर प्रदेश येथे जन्म,अलिगड येथे शिक्षण. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संपर्कातून संघाचे स्वयंसेवक बनले. 1948च्या बंदी काळात कारावास भोगला. त्यादरम्यान बीए आणि नंतर एमए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. 1949 पासून संघाचे प्रचारक. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक संघटन मंत्री आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष. ओरिसा प्रांत प्रचारक राहिले. मीनाक्षीपुरम येथील धर्मांतराच्या घटनेनंतर अशोक सिंघल यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून परावर्तनाच्या,म्हणजेच घरवापसीच्या अभियानात अग्रेसर. 90% दुरावलेल्या बांधवांनापुन्हा हिंदु धर्मात आणण्यात यशस्वी.कट्टर हिंदुत्वाभिमानी तसेच विज्ञाननिष्ठ कार्यकर्ते म्हणून प्रख्यात. मृत्यूनंतर नेत्रदान आणि देहदानही केले.
*अशोकजी सिंघल*
(1926 ते 2015).🙏🚩
वाराणसी येथील आयआयटीतून अभियांत्रिकी पदवीधर झाल्यानंतर 1947 पासून संघाचे प्रचारक. उत्तर प्रदेश सहप्रांत प्रचारक आणि नंतर दिल्ली प्रांत आणि हरियाणा प्रांताचे प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळली. 1980 ते 2011 विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात सक्रिय. संयुक्त महासचिव ते आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशी वेगवेगळी जबाबदारीची पदे समर्थरीत्या सांभाळली. मीनाक्षीपुरमच्या घटनेनंतर दलितांसाठी खुल्या असलेल्या मंदिरांचे अभियान मोठ्या प्रमाणावर देशभरात चालविले.तमिळनाडूमध्ये दोनशे मंदिरे बांधण्यात पुढाकार.1984 मध्ये धर्मसंसदेचे आयोजन करण्यात पुढाकार.एकूणच *राम जन्मभूमी मुख्य आंदोलनाचे शिल्पकार* अशा स्वरूपात प्रख्यात.
या सर्व महनीय कार्यकर्त्यांच्या अतुलनीय आणि त्यागपूर्ण योगदानामुळेच रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन त्याच्या तार्कीक परिणितीपर्यंत पोचले. आज मंदिरनिर्माणाचा शुभारंभ होत असताना त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. त्यांच्या पुण्यपावन स्मृतींना हृदयपूर्वक विनम्र प्रणाम..!🙏🚩🙏
Comments
Post a Comment