बर्लिन बडोदा करार ! तो_ऐतिहासिक_करार

#तो_ऐतिहासिक_करार !!!

७ फेब्रुवारी १९३९ ! सारा बडोदा शोकसागरात बुडाला होता . लक्ष्मी विलास राजवाड्यावर मुंगीला पाउल ठेवता येणार नाही अशी गर्दी झाली होती . कारणच तसे होते . बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड ह्यांचे आदल्याच दिवशी म्हणजे सहा तारखेला मुंबईत दुखःद निधन झाले होते . राजघराण्याच्या खाजगी स्मशानभूमीत " किर्तीमंदिरात " आज त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार होते . 

राजाचे खाजगी सचिव विष्णुपंत नेने त्यावर जातीने लक्ष ठेऊन होते . त्याचवेळी त्यांना एक तार आली 

#Greatly_Grieved - #Adolf_Hitler !

विष्णुपंतांनी ती तार खिश्यात ठेऊन दिली . पण विष्णुपंतांना ती मिळण्याच्या अगोदरच ती पाठवणार्याच्या नावावरून साऱ्या बडोद्यात गोंधळ उडाला होता . पोस्ट ऑफिसमधून ती गोष्ट तत्काळ बडोद्याच्या जिल्हाधिकार्याला कळवण्यात आली होती . तिथून ती भारताच्या व्होईसरॉयला कळवण्यात आली आणि ती त्याने ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या कानावर घातली . कारणच तसे होते ! जगाला दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागली होती . जर्मनीचा अडोल्फ हिटलर हा ब्रिटनचा शत्रू होता आणि सयाजीराव हे ब्रिटिशांचे मांडलिक होते . " आपल्या शत्रूने आपला दुसरा शत्रू मरण पावल्याबद्दल दुःख व्यक्त केले होते " हा ब्रिटीशांच्या दृष्टीने काळजीचा विषय होता . ब्रिटिशांनी ह्या तारेची चौकशी करण्यास सुरुवात केली . हाती नेमके काही लागत नव्हते . तेवढ्यात एक सप्टेंबरला दुसरे महायुद्ध सुरु झाले आणि ही चौकशी अर्धवट पडली .

का आली होती ती तार ? भारतीयांचा द्वेष करणाऱ्या हिटलरने एक भारतीय राजा , ब्रिटिशांचा मांडलिक मरण पावल्यावर का दुःख व्यक्त केले होते ? का हिटलरने " greatly " हा शब्द वापरला होता ? का ती तार विष्णुपंत नेने ह्यांच्या नावाने केली होती ? 

देतो ! सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो .

ही कथा तशी सुरु होते ती 1902 च्या अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनापासून ! त्या निमित्ताने लोकमान्य टिळक आणि सयाजीराव प्रत्यक्ष भेटले होते . त्या दीर्घ चर्चेत लोकमान्यांनी " राजा म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन परराष्ट्रात जाऊन ब्रिटिशांच्या शत्रूंशी संबंध प्रस्थापित करून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांची मदत घ्या . लक्षात ठेवा आपल्या शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो ". असा सल्ला दिला होता . त्याला अनुसरून सयाजीरावांनी आपले काम पुढे चालू ठेवले . 

हा सल्ला देण्यासाठी टिळकांनी सयाजीरावांची निवड का केली होती ? हा टिळकांचा सल्ला राजाने कसा आचरणात आणला ? 

सयाजीराव राजे असले तरी शिवछत्रपतींचे राज्य ब्रिटिशांनी ताब्यात घेतले आहे आणि आपण नामधारी राजे आहोत हे त्यांना व्यवस्थित माहीत होते . ब्रिटिशांचा स्वार्थ त्यांनी बरोबर ओळखला होता .
 ब्रिटिशांचे राज्य कधीच भारताच्या हितासाठी नाही हे त्यांना माहीत होते . भारताची ठराविक नेतेमंडळी ब्रिटिशांकडून कसे फायदे आणि सोयी लुटतात हे त्यांना दिसत होते . भारत स्वतंत्र करणे हेच त्यांचे ध्येय होते .

त्यांचे सगळे सल्लागार तसेच होते . बडोद्यात महर्षी अरविंद घोष ह्यांच्यासारखा ज्वालामुखी त्यांचा प्रमुख सल्लागार होता . सतत परदेशात फिरणारे " गैरहजर राजा " सयाजीराव ह्यांचे इंग्लंडमधील सल्लागार होते पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आणि मादाम कामा ! आपले स्वीय सहाय्यक असलेल्या रियासतकार सरदेसाई ह्यांच्याकडून ते आपला इतिहास समजून घेत होते . पूर्वी चापेकर बंधूंशी संबंध असणाऱ्या सयाजीरावांचा नंतर सावरकर बंधूंशी संबंध होता तो आपले सहकारी माणिकराव ह्यांच्यामार्फत ! आपल्याच राजवाड्याच्या आवारात त्यांनी बॉम्ब बनवण्याचा कारखाना सुरु केला होता . राणी चिमणाबाई साहेब भरपूर खड्या भावाने सारखे दागिने विकत घेत आणि जवाहिरे बँकर बंधू ते पैसे क्रान्तिकारकांना पोचवत . मादाम कामा ह्यांना ठराविक पैसे सतत पाठवले जात .

थोडक्यात क्रान्तिकारी मार्गावर सयाजीरावांचा विश्वास होता . परदेशात निरनिराळ्या ठिकाणी मालमत्ता विकत घेवून ठेवणे सुरूच होते . राजाने नंतर फ्रेंच भाषा शिकणे सुरु केले होते . स्वित्झर्लंड मध्ये त्याला भारताचे Government in exile सुरु करायचे होते .
 पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्याने , रासबिहारी बोस आणि लोकमान्य टिळक ह्यांनी मिळून एका सशक्त कार्यक्रमाद्वारे ब्रिटिशांचे राज्य उलथून टाकण्याचे ठरवले होते . असो . फितुरीमुळे ते फसले .

हे सर्व चालू असतांना 1931 साल उजाडले ! आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने 1936 मध्ये बर्लिन येथे भरणाऱ्या ऑलिम्पिक सामान्यांचे यजमानपद जर्मनीला देऊ केले होते . लवकरच सत्तेत आलेल्या हिटलरला खेळाची फारशी आवड नव्हती . जर्मनीचा पैसा वाया जाईल असे ऑलिम्पिक सामने जर्मनीत भरवायची त्याची इच्छा नव्हती . पण त्याचा सल्लागार गोबेल्स ह्याने " ह्या खेळांचा आपली नाझी विचारसरणी जगभर पसरवायला आणि नवी आंतरराष्ट्रीय नाती तयार करायला आणि आंतरराष्ट्रीय चलन गोळा करायला मदत होईल " असे हिटलरला समजून सांगितले . हिटलर त्याला तयार झाला . 

ही वार्ता सयाजीरावांना समजली . सयाजीरावांचे खाजगी मदतनीस विष्णुपंत नेने जर्मनीला पोहोचले . कोणीही ओळखीचे नव्हते . आणि प्रत्यक्ष हिटलरपर्यंत जायचे होते . त्या काळात " संस्कृत " बोलणे अभिरुची आणि विद्वत्तेचे लक्षण होते . त्यांनी संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली व बोलण्यात " संस्कृत " हा शब्द आणला ! लवकरच त्यांची गाठ संस्कृत भाषेच्या तज्ज्ञ लोकांशी घालून देण्यात आली आणि तिथून त्यांनी लवकरच जर्मन सरकारच्या उच्चपदस्थ लोकांशी संपर्क साधला . जर्मनीत त्यावेळी सुरु असलेल्या " आर्य - अनार्य " वादाचा फटका त्यांना बसला का नाही ह्याबद्दल इतिहास मूक आहे . 

लवकरच नेन्यांनी काही कागदपत्रे तयार केलीत .

इकडे भारतात सयाजीरावांनी बर्लिन ऑलिम्पिकसाठी जर्मनीत जाऊ द्यावे असा अर्ज भारताच्या व्हॉइसरॉयकडे पाठवला . अमरावती येथील " हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला " सयाजीरावांनी बर्लिन ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी भरपूर आर्थिक मदत केली . अमरावतीची हनुमान व्यायाम प्रसारक मंडळी ही संस्था ऑलिम्पिक सामन्यांत बडोदा संस्थान तर्फे उतरली .

सयाजीराव बर्लिनला पोहोचले . 

1 ऑगस्ट 1936 रोजी उदघाटनाचा कार्यक्रम सुरु झाला . हिटलर , कार्यक्रमाचा मुख्य यजमान जिथे बसला होता त्या गच्चीच्या खालीच सयाजीरावांना मानाचे बसण्याचे स्थान देण्यात आले . संचलन सुरु झाले . प्रत्येक राष्ट्राचे खेळाडू आपल्या राष्ट्राचा ध्वज घेऊन मुख्य आयोजकाला मानवंदना देत होते . भारताचे खेळाडू युनियन जॅक हातात घेऊन आले . लवकरच भारतीय माणसांचा दुसरा संघ हातात " भगवा ध्वज " घेऊन पाहुण्यांना मानवंदना देऊ लागला . तो बडोदा संस्थानचा संघ होता आणि तो बडोद्याचा राष्ट्रीय ध्वज होता .( चौकोनी पण भगवा ) !
 सयाजीराजांवर लक्ष ठेवणारे ब्रिटिश गुप्तहेर चपापले .
 ही बातमी लगेच इंग्लंडला कळवण्यात आली .

पण त्यापेक्षा भयानक गोष्ट रात्री घडली ! हिटलरने रात्री सयाजीराव आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व खेळाडू ह्यांना शाही भोज दिला . आणि त्याच वेळी सयाजीराव आणि हिटलरने एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या . जगाचा राजा होऊ पाहण्रार्या एका माणसाने तोच ज्यांचा द्वेष करत होता त्या भारतीयांच्या एका राजाशी एक करार केला होता - बर्लिन बडोदा करार ! काय आणि कशाबद्दल होता तो करार ? 



सयाजीराजांनी फार पूर्वीच दुसरे महायुद्ध होणार असून त्यात जगाची उलथापालथ होणार आहे हे ओळखले होते . भारतीय राजांच्या संघटनेची कल्पना होती त्यांची ! हैदराबादच्या निजामानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मान त्यांना होता . भारतातल्या काही राजांशी आणि नंतर त्यांनी एकमेकांशी बेटी व्यवहार करून सयाजीरावांना सर्व राजांना एकमेकांशी नात्याने जोडायचे होते . त्यांचा उपयोग मग भारतीय स्वातंत्रयलढ्यासाठी करायचा होता .

ह्या करारानुसार सयाजीरावांनी " दुसऱ्या महायुद्धात सर्व हिंदू राजे एक होऊन हिटलरला मदत करतील " असे वचन हिटलरला दिले होते . आणि त्याबदल्यात हिटलरच्या सेना भारताला स्वातंत्र्य मिळवून देतील , त्यांना ब्रिटीशांविरुद्ध लढायला मदत करतील असे वचन हिटलरकडून घेतले होते . 

पण काही वर्षातच दुसरे महायुद्ध सुरु व्हायच्या आधीच सयाजीरावांचे निधन झाले होते . त्यामुळे हा करार अस्तित्वात येऊ शकला नाही .

"दुर्दैव " हा शब्द भारतीयांच्या पाचवीला पूजला आहे .

#बडोदा #बर्लिन #भारत #जर्मनी #ऍडोल्फ_हिटलर #लोकमान्य_टिळक #सावरकर #ब्रिटिश #चापेकर #अरविंद_घोष #मादाम_कामा #शामजी_कृष्ण_वर्मा #बडोदा_बर्लिन_पॅक्ट #दुसरे_महायुद्ध #ऑलिम्पिक

#इतिहास #रियासतकार_सरदेसाई

Courtesy Dr Subodh Naik

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained