कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करू*

मा मुख्यमंत्री यांनी यंदाच्या गणेशोत्सवा च्या निमित्ताने आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीतील  मा मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

*कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरे करू*
 *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गणेश मंडळांना आवाहन*

 यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळाला केले आहे.
    आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.      

       या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री  सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार , मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल,  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रवींद्रन व इतर वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*मुख्यमंत्र्यांचे आवाहन*
पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. शिर्डी सिद्धिविनायक व या सारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
     बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही.  कोरोनाचा धोका सम्पलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत.  कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता , योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. 
ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी  आपण घेऊ पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू असे ही मुख्यमंत्री म्हणाले. 

गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034