देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

देशात कोरोनाची दुसरी 
लाट येण्याची शक्यता

नवी दिल्ली :- जानेवारीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात सापडला होता. मात्र, त्यानंतर दीड महिन्यांनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. ही कोरोनाची लाट ओसरलेली नसताना आता दुसरी लाट येण्याची शक्यता सिक्युरिटी रिसर्च फर्म नोमुराने वर्तविली आहे.
        कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जेव्हा देशात ५०० रुग्ण सापडले होते, तेव्हा लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता अडीज महिन्यांच्या काळात हा लॉकडाऊन जवळपास संपूर्ण उठविण्यात आला आहे. मात्र, देशातील रुग्णांचा आकडा तीन लाखांकडे वाटचाल करत असताना पुन्हा येत्या १५  जूनपासून देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज फिरत होते. हे मेसेज फेक असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, नोमुराने देशात पुन्हा लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता वर्तविताना तो आधीपेक्षाही कठोर असणार असल्याचे म्हटले आहे.
      नोमुरानुसार भारताचे नाव त्या १५ धोकादायक देशांच्या यादीमध्ये टाकले आहे, ज्या देशांमध्ये लॉकडाऊन काढल्यानंतर किंवा सूट दिल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसली आहे. या १५ देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये लोकांची ये-जा आणि कोरोनाच्या रुग्णांची संख्येमध्ये झालेल्या वाढीवरून अंदाज लावण्यात आले आहेत. भारतामध्ये २० मे पासून सूट देण्यास सुरुवात झाली होती. तर ८ जूनपासून जवळपास सर्वच प्रकारचे व्यवसाय आणि मंदिरे, कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
       ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी १७  देश योग्य दिशेने जात आहेत. या देशांमध्ये दुसरी लाट येण्याचे कोणतेही संकेत दिसलेले नाहीत. तर १३ देशांमध्ये दुसरी लाट येण्याचे कमी प्रमाणात संकेत दिसत आहेत. मात्र, भारतासह१५  देशांमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता धोकादायक पातळीवर आहे.
       लॉकडाऊन हटविल्याने दोन प्रकारची परिस्थिती उद्भवणार आहे. दिलासा दायक म्हणजे लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने लोकांची ये-जा वाढेल आणि व्यवसाय सुर होती. तसेच नवीन रुग्णांमध्ये किंचित वाढ होणार आहे. मात्र, दुसरी परिस्थिती खूप वाईट असणार आहे.
     यामध्ये कोरोनाच्या ग्राफमध्ये कोणतेही बदल दिसून येत नाहीत. अर्थव्यवस्था सुरु करण्यासाठीची सूट रोजचे रुग्ण कमालीचे वाढविणार आहे. यामुळे लोकांमध्ये भीती उत्पन्न होणार असून त्यांच्या हालचालींवर परिणाम होणार आहे. या परिस्थितीत लॉकडाऊन पुन्हा लागू केला जाण्याची दाट शक्यता आहे.
      हे विश्लेशन अशावेळी आले आहे जेव्हा अनेक देश लॉकडाऊन हटविण्याच्या तयारीत किंवा हटविले आहेत. यामध्ये ५४ देशांना तीन श्रेणींमध्ये वाटण्यात आले आहे.
भारतात आज ९९९६  एवढे कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३५७  मृत्यू झाले आहेत. रुग्णांचा एकूण आकडा २८६५७९ वर पोहोचला आहे.
       भारताच्या धोकादायक श्रेणीमध्ये चिली, पाकिस्तान, ब्राझील, मेक्सिको, स्वीडन, सिंगापुर, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आहेत.

Comments