उध्दवराव. . . आता बास झालं !

उध्दवराव. . . आता बास झालं !  

माननीय उध्दवराव ठाकरे,
या क्षणी कोरोना संदर्भात महाराष्ट्राची स्थिती काय आहे, 
याचा काही अंदाज आहे तुम्हाला ?
भारतात एक लाख अठ्ठावन हजार कोरोना संक्रमित आहेत.
त्यातील सत्तावन हजार संक्रमित 
एकट्या महाराष्ट्रात आहेत.
म्हणजे देशाच्या ३६% संक्रमित आणि ४०% मृत्यू,
ह्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात...! 
सहज आकडेवारी म्हणून सांगतो, 
आपल्या दुप्पट लोकसंख्या उत्तर प्रदेशाची आहे.
आपल्या तुलनेनं, खूपच मागास असलेला 
हा प्रदेश आहे.
ह्या उत्तर प्रदेशात ह्या क्षणी
कोरोना संक्रमितांची संख्या आहे,
फक्त साडे सहा हजार. आणि मृत्यू – १७०. 
म्हणजे देशाच्या ४.११% संक्रमित आणि ३.७५% मृत्यू, 
उत्तर प्रदेशात आहेत. 
कोरोंना ग्रस्तांची असलेली भली मोठी संख्या,
ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, 
असं नाही वाटत तुम्हाला..? 
उध्दवराव, 
एकट्या मुंबईत ३४,००० कोरोन रुग्ण आहेत.
१,१०० मृत्यू झाले आहेत. 
स्थिती प्रचंड गंभीर आहे.
हॉस्पिटल्स भरून वाहताहेत. 
शिवसेनेच्या आणि कामगार सेनेच्याच रुग्ण नेत्यांना, 
त्यांच्या रुग्ण नातेवाईकांना 
हॉस्पिटल्स मध्ये भर्ती करणं कठीण झालंय. 
कोरोंना शिवाय इतर रुग्णांचे हाल तर कुत्रं खात नाहीये.... 
या मुंबईनं,
या पूर्वी अनेक आघात पचवले.
९२-९३ चे दंगे, साखळी बॉम्बस्फोट, रेल्वेतले बॉम्बस्फोट, 
महापूर, २६/११ चं थरारनाट्य....
असे अनेक. 
पण या पूर्वी, मुंबई 
इतकी हवालदिल झालेली, असहाय झालेली 
मी कधीच बघितली नव्हती !
    ____    ____    ____

उध्दवराव, 
तुमच्या सरकार चा ‘गवर्नेंस’ कुठंच दिसत नाहीये.
एक मंत्री एक आदेश काढतो, 
तर दूसरा मंत्री, तोच आदेश लगेच फिरवतो. 
एका विभागाला कळत नाही, दुसरा काय करतोय ते. 
सरकार नावाची गोष्टच दिसत नाहिये. 
कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. 
सगळा सावळा गोंधळ. 
परवा, तुमच्याच प्रशासनातले,
एक जेष्ठ सनदी अधिकारी खाजगीत म्हणाले, 
‘बाबासाहेब भोसल्यांच्या काळात तरी 
शासनाला काही तंत्र होतं. 
आता मात्र ते ही नाही.’
लक्षात येतंय का तुमच्या...? 
बाळासाहेब ठाकर्‍यांच्या मुलाचं राज्य, 
आता सनदी अधिकारी, 
बाबासाहेब भोसल्यांच्या राज्यापेक्षाही 
वाईट म्हणू लागले आहेत....
खालची पातळी गाठायला, 
अजून किती खाली जाल तुम्ही...? 
    ____    ____    ____

बाकी काही पराक्रम तुमच्या खात्यावर असो / नसो,
पण बाळासाहेबांच्या, चैतन्याने रसरसलेल्या 
शिवसेनेला 
पार संपवून टाकण्याचं श्रेय 
तुमच्याच खात्यावर जाणार, अशी चिन्ह आहेत.
या महाराष्ट्राला, विशेषतः मुंबईला,
शिवसेनेचा किती मोठा आधार !
कुठल्याही संकटकाळी धावून येणार, तो शिवसैनिक.
मुंबईतले ते ऐतिहासिक दंगे, जुलै, २००५ चा तो महाभयंकर पूर, 
बॉम्बस्फोट, २६/११... ह्या सर्व काळात 
मुंबईकरांना आधार वाटायचा 
तो बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांचा.
मात्र आज मुंबई वर जीव घेणं संकट आलं असताना,
तो शिवसैनिक कुठेय..? 
परवा ती बरखा दत्त,
तिची ‘स्ट्रीट स्टोरी’ तयार करायला मुंबईत फिरत होती. 
मात्र तिला सगळीकडे दिसत होते,
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकच !
‘संघाकडे सर्व श्रेय जायला नको, 
आणि स्टोरी बॅलेन्स असावी’
म्हणून आपली बरखा आँटी,
पोटतिडकिनं शोधत होती शिवसैनिकांना...
सर्वांना विचारात होती,
“वो शिवसेना के लोग कहां हैं.?”
तिला आढळले नाहीत.
शेवटी तिनं सर्व सव्वा नऊ मिनिटांची स्टोरी 
संघ स्वयंसेवकांच्या मदत कार्यावरच केली !
असं का व्हावं ?
शिवसैनिक तोच आहे. तसाच झुंजार. मदतीला धावून जाणारा. 
पण उध्दवराव,
तुम्ही केलेल्या सत्तेच्या तडजोडींनं,
त्या उसळत्या आणि सळसळत्या शिवसैनिकाचं 
चैतन्यच शोषून घेतलंय.
त्याचा सारा उत्साहच तुम्ही संपवून टाकलाय. 
बाळासाहेबांच्या त्या दमदार आणि आक्रमक शिवसेनेला 
तुम्ही पार गलितगात्रं करून टाकलंय..!
    _____    ____    ____

तुमच्या माहिती करता सांगतो, 
उत्तर परदेशात कोरोना संक्रमण 
उगा, आपलं सहजच कमी झालेलं नाही. 
त्यामागे आहे योगी आदित्यनाथांचं 
विश्वसनीय नेतृत्व, त्यांचं नियोजन, त्यांची दूरदृष्टी, 
त्यांचं प्रशासकीय कौशल्य,
त्यांच्या कामाचा झपाटा आणि अफाट मेहनत.
पाच मार्च ला, गाझियाबाद ला,
उत्तर प्रदेशातला पहिला कोरोना रुग्ण सापडला. 
आणि देशात ‘लॉकडाऊन’ ची चर्चा ही नसताना,
१७ मार्च ला योगीजींनी 
उत्तर प्रदेशातली गर्दीची सर्व ठिकाणं बंद केली. 
शाळा / कॉलेज / मॉल / पर्यटन स्थळे 
हे सर्व बंद करणारं 
ते देशातलं पहिलं राज्य ठरलं. 
२३ मार्च पासून त्यांनी,
अत्यंत कठोरतेनं लॉकडाऊन अंमलात आणलं. 
गौतम बुध्द नगर (नोईडा) च्या कलेक्टर ने 
सांगूनही कंट्रोल रूम बनविली नाही,  
म्हणून ताबडतोप त्याची बदली 
लखनऊ ला, बिन महत्वाच्या खात्यात केली. 
कोरोना शी झुंज देण्यासाठी 
त्यांनी ११ विभाग (verticals) निर्माण केले. 
प्रत्येक विभागाचा प्रमुख 
एक वरिष्ठ सनदी अधिकारी बनविला.
त्याला पूर्ण अधिकार दिले. 
आणि ह्या ‘टीम – ११’ च्या प्रमुख अधिकार्‍यांबरोबर,
योगीजी रोज सकाळी एक तास चर्चा करतात. 
अगदी, ज्या दिवशी त्यांच्या वडिलांच्या मृत्युची बातमी आली,
त्या दिवशीही...!
या सर्वांतून एक छानसा समन्वय तयार झाला. 
रोजचे महत्वाचे निर्णय तातडीने घेतल्या जाऊ लागले. 
आणि म्हणूनच,
तब्लिगी जमात चं प्रकरण असो, की 
प्रवासी श्रमिकांचं. 
उत्तर प्रदेशाने ते अत्यंत कुशलतेने हाताळलं. 
एक उदाहरण देतो –
१५ एप्रिल ला, मुरादाबाद ला, नावाबपुरा मोहोल्ल्यात,
कोरोना ची लागण तपासायला गेलेल्या 
डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलिसांवर 
तिथल्या लोकांनी दगडफेक केली. 
मोठमोठे बोल्डर्स आणि वीटा फेकून मारल्या.
ही घटना दुपारी १२ वाजता झाली.
लगेचच योगीजींचे विशेष आदेश निघाले. 
३ वाजे पर्यंत, त्या सर्वच्या सर्व १७ लोकांना
अटक झाली. 
रात्री ७ वाजता, सर्वांवर रा सू का (NSA) लावला.
पहाटे तीन वाजता,
रिमांड मेजिस्ट्रेट ला उठविण्यात आलं. 
व्हिडिओ सहित सर्व पुरावे होतेच. कोर्ट बसलं. 
आणि सकाळी साडे पाच वाजता,
त्या सतराही आरोपींना जेल च्या कोठडीत डांबण्यात आलं.  
फक्त चोवीस तासांच्या आत. 
सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून !
राज्य असं चालवावं लागतं, उध्दवराव... 
फक्त कोमट पाणी पिऊन,
आणि एफ बी लाईव्ह करून, 
त्या दोन संतांच्या मारेकर्‍यांना पकडता येत नसतं 
आणि राज्य तर चालवता येतच नसतं...!
    ____    ____    ____

पैसे नाहीत, म्हणून तुम्ही रडताहात...
पैसे तसे कुठल्याच राज्य सरकार जवळ नाहीत. 
पण उत्तर प्रदेशानं काय केलं ते सांगतो – 
ही महामारी सुरू होताच, 
योगीजींनी, विविध खात्यातली बाजूला असलेली 
रक्कम काढली. 
आणि १,००० कोटी रूपयांचा ‘कोविड केयर फंड’ तयार केला. 
याच फंडातून 
कोरोना साठी मास्क घेण्यापासून, ते इस्पितळं उभारण्या पर्यंत 
सर्व तरतुदी झाल्या. 
राज्यात परत येणार्‍या प्रवासी मजुरांसाठी 
त्यांनी अनेक योजना आखल्या आहेत. 
जवळपास तीस लाख श्रमिकांचा डेटा तयार आहे. 
त्या साठी, त्यांच्या स्किल सेट प्रमाणे उद्योग शोधणं  
चालू आहे. 
SIDBI बरोबर करार झालाय. 
एक जिल्हा – एक उत्पन्न (OD – OP) 
सारख्या आगळया – वेगळ्या योजनांवर ते भर देताहेत. 
या कोरोना काळातच, 
मार्च मधे, योगीजींच्या सरकार ने तीन वर्ष पूर्ण केली. 
ह्या तीन वर्षात,
कधी नव्हे ते, उत्तर प्रदेशाचे दरडोई उत्पन्न ८,५९९ रुपये वाढले. 
देशाचा निर्यात वाढीचा दर आणि निर्यात,
किंचितशी कमी झाली असताना, 
उत्तर प्रदेशाची निर्यात २८% ने वाढली !
उध्दवराव, 
आपलं राज्य प्रगत म्हणवलं जातं. 
उद्योगांनी समृध्द समजलं जातं. 
हे कोरोना चे दोन महीने सोडून देऊ, 
पण सुरुवातीच्या पाच महिन्यात
तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख 
किती खाली आणला,
हे जरा प्रामाणिकपणे सांगाल का ? 
    ____    ____    ____

उध्दवराव, 
आपला देश एका फार मोठ्या गंभीर संकटातून जातोय. 
हे वैश्विक संकट आहे, यापूर्वी कधीच न आलेलं. 
ह्या अश्या प्रसंगी,
राज्य चालवणं म्हणजे खेळ नसतो,
हे लक्षात घ्या. 
तुमच्या अकार्यक्षमतेचा, अकर्मण्यतेचा, नियोजन शून्यतेचा,
तुमच्या प्रशासकीय विफलतेचा आणि 
मूर्खांसारख्या हवा-हवाई कल्पनांचा भुर्दंड, 
महाराष्ट्राला बसलेला चालणार नाही.
तेंव्हा आता बास झाले....!
तुम्हाला जे काय खेळ खेळायचे असतील 
ते आपल्या मुलाबरोबर,
मातोश्री वर खेळा...
पण सत्तेवरून पायउतार व्हा...!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained