*रडीचा डाव* -इथेच शिवसेना स्वतःलाच उघडं पाडतेय.


*निकाल लागले, आणि सत्तेचा घोडेबाजार उसळी घेऊ लागला. आमचं ठरलंय, 50-50 चा फॉर्म्युला मान्य कराच, 95 चा फॉर्म्युला, त्यात भाजप खोटं बोलतेय,  भाजपला आम्ही दाखवू, मुख्यमंत्री आमचाच, आम्हांला वेगळा पर्याय स्वीकारायला भाग पाडू नका, हिंम्मत असेल तर भाजपने आमच्याशिवाय सत्ता स्थापन करून दाखवावीच, अशी एक ना अनेक संतापजनक वक्तव्ये संजय राऊतांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर केली. 
त्यातच संजय राऊत म्हणताहेत की मिडीयाच्या कॅमेऱ्यासमोर फडणवीसांनी हॉटेल ब्लू सी मध्ये 50-50 चा फॉर्म्युला नक्की केला. आणि जर हे सत्य असेल तर मग कॅमेऱ्यात बंद झालेली चर्चा जनतेसमोर शिवसेना उघड का करत नाही ? का मिडिया या प्रश्नावर मूग गिळून गप्प आहे ? जर मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत तर मग उघड करा ना सगळा खोटेपणा. पण नाही.....जे घडलेलंच नाही ते दाखवणार तरी कसं ? 
इथेच शिवसेना स्वतःलाच उघडं पाडतेय. वर मानभावीपणे संजय राऊत म्हणताहेत की फडणवीस खोटं बोलत आहेत आणि असं काही ठरलेलंच नाही तर सत्या असत्याची परिभाषा बदलावी लागेल. संजय राऊतांनी आजपर्यंत 2014 नंतर केलेली सर्व वक्तव्ये तपासून पहिली तर एकच दिसून येईल की सत्तेच्या चाव्या हाती न मिळाल्याने तेंव्हाही आक्रस्ताळेपणा केला होता अन आजही करत आहेत. एका प्रमुख दैनिकाच्या संपादकाला आणि राज्यसभेच्या खासदाराला न शोभणारी वक्तव्ये संजय राऊत यांनी थांबवायला हवीत. पण सांगणार कोण ? उद्धव ठाकरे की आदित्य ठाकरे ? की पक्षातील अन्य ज्येष्ठ नेते ? संपूर्ण शिवसेना मीच चालवतो अशा अविर्भावातच संजय राऊत कायम बोलताना दिसतात.*

*जर तुम्हांला भाजपचा एव्हढा तिटकारा होता तर 5 वर्ष फडणवीस सरकार चालू का दिलंत ? 5 वर्ष केंद्रात सत्तेत जागा अडवून का राहिलात ? 5 वर्ष भाजपवर नुसती आगपाखड करत विरोधी वक्तव्ये का केलीत ? राम मंदिर ची नाटकं का केलीत ? हिंदुत्वाची कास धरल्याचं दाखवून हिंदूंचा शत्रू असलेल्या अजमेरच्या दर्ग्यावर जाऊन डोकं का टेकवलं ? का मराठी माणसांची सेना म्हणत महाराष्ट्राच्या मराठी माणसांना भुलवलंत ? का लोकसभेच्या जागा हिंदुत्ववादी संघटना म्हणून युती करून लढवलीत ?*

*आहेत का या प्रश्नांची उत्तरे या सेना नेतृत्वाकडे ? माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांनी या नेत्यांना असे प्रश्न विचारले तर या प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीतच उलट दबाव टाकून प्रसंगी धमकावले जाईल यात शंका नाही. पण म्हणून माझ्यासारख्या अनेकांनी शिवसेनेला प्रश्न विचारायचेच नाहीत का ? शिवसेना म्हणजे फक्त गुंडांचा पक्ष, शिवसेना म्हणजे दंगलखोर ही प्रतिमा एकेकाळी सर्वांच्या मनांत होती, ती सन्मा. स्व. बाळासाहेबांनी महत्प्रयासाने पुसून टाकली. कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार अंगीकारून हिंदूंची मने जिंकली. जनतेनेही हिंदू हृदय सम्राट अशी पदवीही उदार मनाने उत्स्फूर्तपणे देऊन शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा दिला. गेली अनेक वर्षे मुंबईची महानगर पालिका दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबई तुंबून सुद्धा ताब्यात दिली. का...का...का...? का अशी दिशाहीन भटकू लागलीय आजची शिवसेना आणि तिचं नेतृत्व ?*

*वरील सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेच देऊ शकतील कदाचित....आणि तेही त्यांची इच्छा असेल तर.*

*या सगळ्यांत फडणवीस एकाच वाक्यावर ठाम राहिले की जे ठरलंय त्याप्रमाणेच होणार. त्यातच राऊतांनी 29 ला TV वर ZEE 24 तासवर बाईट दिला की आमची दिल्लीत बैठक ठरली होती ती फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे रद्द झाली. मुळात आधी अशी काही बैठक दिल्लीत ठरलेलीच नाही हे  प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन स्पष्ट केले.*

*2014 नंतर शिवसेना नेतृत्व आजकाल जास्तच उथळ होत चाललंय की काय अशी शंका येऊ लागलीय नव्हे तर खात्रीच पटत चाललीय.*

*संजय राऊत हे नको तेव्हढं बडबडू लागले आहेत. जर तुमचं ठरलंय आणि अमित शहा 30 तारखेला मुंबईत येणार आहेत तर त्या आधीच एव्हढा आक्रस्ताळेपणा करून उलटसुलट वक्तव्ये का करत आहात ? प्रत्येकवेळी राउतच का येत आहेत कॅमेऱ्यासमोर ? आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा फारतर उपमुख्यमंत्री पदावर बसवायला शिवसेना एव्हढी आतुर का झालीय ? मिटिंग होईपर्यंत का गप्प राहू शकत नाहीत ? की जनतेच्या प्रतिक्रियांची वाट पाहताय ? हरियाणा मध्ये JJP बरोबर यशस्वी वाटाघाटी होऊन शपथविधी होऊन सरकार स्थापन झालंसुद्धा पण महाराष्ट्रात मात्र फक्त उलटसुलट वक्तव्य करून नाहक गोंधळ माजवला जातोय.*

*शिवसेना नेतृत्व का स्वतःच डोकं वापरून शांतपणे विचार करून थोडं धीराने घेत नाहीये, हे मात्र अनाकलनीयच आहे. जो पक्ष फक्त दोन खासदारांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात करून देशात दुसऱ्यांदा निवडून येऊन तीन चतुर्थांश पेक्षा जास्त राज्यांत सत्ता स्थापन करून काँग्रेस सारख्या पक्षाला त्याच्या साथीदारांसहित चारी मुंड्या चित करून आज शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा राज्य प्रमुखपदी बसण्याची तयारी करतोय त्यात चुकीचं ते काय ? की केवळ आता आमच्या हातात सत्तेचा रिमोट असल्याच्या आसुरी आनंदात राहून भाजपला स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागवून घेऊन जे मिळणारच नाही ते स्वतःकडे ओरबाडून घेऊन स्वतःचच हसं करून घेत आहेत हे मात्र अत्यंत क्लेशदायक आहे.*

*ज्या फडणवीसांनी 5 वर्षांत अनेक मानव निर्मित, तर कधी नैसर्गिक जटील प्रश्न यशस्वीपणे हाताळून स्वतःचं नेतृत्व स्वतःची पकड तसूभर देखील ढिली होऊ दिली नाही, ज्यांच्या अंगावर भ्रष्टाचाराचा साधा ओरखडा नाही त्यांना पुन्हा म्हणून मुख्यमंत्रीपदावर बसूच द्यायचे नाही याची सुपारी कुणी दिलीय की तशी सेनेचीच आवास्तवाधिष्ठित इच्छा आहे तेही स्पष्ट झाले नाही. राजकीय महत्वाकांक्षा असाव्यात पण तुटेपर्यंत ताणून नंतर त्यात नमतं घेऊन पुन्हा तडजोड करण्यासाठी निश्चितच नसाव्यात असं मात्र आवर्जून सांगावसं वाटतं. एकंदरीत 30 ते 3 या तारखांमध्ये काय घडेल ते आजतरी कुणी सांगू शकणार नाही पण आजच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं वक्तव्यसुद्धा ऐकीवात आलं की आधी सरकार बनू द्यावं, ते पडलं तर मग पुढे आम्ही बाहेरून पाठिंबा द्यायचा की सेना आणि काँग्रेसच्या साथीने सरकार बनवायचं ते नंतर ठरवू. खरंतर हे विधान अत्यंत सूचक आहे. केवळ सत्तेसाठी कायपण हे गणित न ठरवता जनतेच्या म्हणजेच पर्यायाने महाराष्ट्राच्या भल्यासाठी जे म्हणून चांगलं करता येईल ते करण्याचा संकल्प प्रत्येक पक्षाने केला पाहिजे. जर महाराष्ट्राच्या जनतेने कोणत्याही एका पक्षाला जर एकमुखी कौल दिला नाही तर मग सर्वात मोठ्या पक्षाला निमुटपणे सत्तास्थापना करू देऊन त्या सरकारने जर जनतेच्या विरोधात काम केलं तर तिथे सरकारला रोखण्याचं काम जरूर करावं.*

*शिवसेनेने खरंतर आपल्या स्थापनेपासूनच्या आजपर्यंत मिळालेल्या जागांचा सर्वंकष अभ्यास करून लगेचच निर्णय देऊन मोकळं व्हायला हवं होतं, पण तसं होईल असं आत्तातरी दिसत नाहीये. स्वबळावर सोडाच पण युती असतांना सुद्धा कधीही पंचाहत्तरी न ओलांडू शकलेली सेना आज जो मार्ग अवलंबतेय तो मार्ग म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल. त्याचे परिणाम निश्चितपणे येत्या महानगरपालिकांच्या, पंचायतींच्या निवडणुकांतून दिसतील, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये.*

*उद्धव ठाकरे यांनी आडमुठेपणाची भूमिका सोडून सर्वप्रथम राऊतांना कॅमेऱ्यासमोर जाऊ देणं रोखून भाजप नेतृत्वाबरोबर शांतपणे चर्चा करून मगच स्वतः कॅमेऱ्यासमोर एकतर एकट्याने किंवा संयुक्तपणे येऊन आपली भूमिका आणि त्या भूमिकेला अनुसरून घेतलेला निर्णय जाहीर करावा, असं सांगावसं वाटतंय.*

*कारण निकाल लागल्यापासून शिवसेनेचा डरकाळी मारणारा वाघ आता रोज म्हाताऱ्या वाघाप्रमाणे गुहेतल्या गुहेतच डरकाळ्या फोडत केवळ सत्तालालसेपोटी फडणवीस आणि भाजप विरोध करतांना पाहून या महाराष्ट्राच्या जनतेला वीट येऊ लागलाय.*

*.......पुन्हा धाकट्या भावाचे स्थान जनतेनेच दिले असल्याने त्या स्थानाला शिरसावंद्य मानून या महाराष्ट्राच्या मतदार जनतेला रोज होणाऱ्या छळापासून वाचवा आणि श्री. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बसवा, एव्हढीच नम्र विनंती.*

*महायुती म्हणून एकत्र लढलात आणि सरकार स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असूनही जर अशी बेताल वक्तव्ये करून महाराष्ट्रातील मतदारांना गृहीत धरून आडमुठेपणाची भूमिका पकडून ठेवलीत तर त्याला रडीचा डाव म्हटलं तर ती अतिशयोक्ती मुळीच ठरणार नाही.*

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained