महत्वाची आणि उपयुक्त माहिती - इन्स्टंट मनी ऑर्डर (iMO).

महत्वाची आणि उपयुक्त माहिती
समजा, तुम्ही बाहेरगावी गेलाय आणि तिथे तुमच्याकडे असलेली नगद रक्कम संपली तर? समजा, तुम्ही प्रवासात आहात आणि कुणीतरी तुमची पर्स चोरली तर? समजा, तुम्ही शिक्षणासाठी दुसऱ्या शहरी राहताय आणि तुम्हाला तात्काळ फी भरायची आहे. तर? समजा, दुसऱ्या गावात असताना अचानक दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली तर?
समजा…. असो मंडळी! अशा अचानक संकटात सापडण्याच्या शक्यता भरपूर आहेत. पण आपण अशावेळी काय करतो? सुरुवातीला भांबावून जातो कारण जवळ काहीच पैसे नसतात. एटीएम चोरीला गेले असते. जर सोबत असेल तरी त्यांच्याही अकाउंटमध्ये गरजेइतके पैसे नसू शकतात. अनोळखी शहरात कुणी ओळखीचे नसते. मदत मागायची तरी कोणाला? आणि ओळख पाळख नसताना कुणी पैशांची मदत करेल याची शक्यता फारच कमी!
या अडचणीवर एक उपाय आहे! उपाय साधा सोपा आहे आणि खात्रीचासुद्धा! अशावेळी तुम्ही सरळ पोस्ट खात्याला शरण जा. तिथं तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. तुम्ही आपल्या नातेवाईक/मित्रांकडून पैसे एका मिनिटात पोस्टात मागवू शकता आणि दुसऱ्या मिनिटाला ते त्वरित काढू शकता. ते सुद्धा पोस्टात अकाउंट नसतानाही... आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. भारतीय पोस्टाने ही सेवा सुरू केली आहे. नाव आहे, इन्स्टंट मनी ऑर्डर (iMO).
इन्स्टंट मनी ऑर्डर ही वेबवर आधारित सेवा आहे. ही सेवा काही मिनिटांतच पैसे एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवण्यासाठी मदत करते. याद्वारे १००० ते ५०००० पर्यंत रक्कम पाठवता येते.
iMO चं काम कसं चालतं?
जी व्यक्ती पैसे पाठवणार आहे, तिला कुठल्याही iMO सेंटर असलेल्या पोस्टात जाऊन काउंटरवर एक फॉर्म भरून काउंटर क्लार्ककडे रक्कम जमा करावी लागते. मग कॉम्प्युटरद्वारे त्याची पावती मिळते. ही पावती जरा वेगळ्या स्वरूपाची असते. ती सीलबंद स्वरूपात येते. या पावतीमध्ये एक १६ अंकी सिक्रेट कोड असतो. हा कोड क्लार्कलासुद्धा माहीत नसतो. मग ती पावती उघडून तो कोड ज्या व्यक्तीला पैशांची गरज आहे तिला सांगायचा. हे काम तुम्ही कॉल करून, एसएमएस करून, व्हाट्सअप वरून किंवा इ-मेल द्वारे कसेही करू शकता.
आता ती दुसरी व्यक्ती जिला पैसे हवे आहेत ती कुठल्याही iMO सेंटर असलेल्या पोस्टात जाऊन काउंटरवर एक छोटा फॉर्म ओळखपत्राच्या पुराव्यासह भरून देईल. त्यात तो 16 अंकी कोड लिहायचा असतो. दुसऱ्याच मिनिटात त्या व्यक्तीच्या हातात पैसे मिळतील. आहे ना अगदी सोपं?
पुराव्यासाठी कोणते ओळखपत्र लागतात?
ज्यावर फोटो आहे असं कोणतंही ओळखपत्र, म्हणजे पाहा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इत्यादीपैकी काहीही चालू शकेल.
ही सेवा खर्चिक आहे का?
अजिबात नाही! मंडळी यासाठी फक्त शंभर रुपयांच्या आसपास कमिशन लागते. एवढी मोठी रक्कम तुम्ही अगदी अल्प दरात पाठवू शकता.
1000 ते 10000 ला 100 रुपये कमिशन
10001 ते 30000 ला 110 रुपये कमिशन
30001 ते 50000 ला 120 रुपये कमिशन
एवढंच नाही तर तुम्ही पैशांसोबत एखादा छोटा मेसेज सुद्धा पाठवू शकता. हा संदेश पाठवणारा आणि स्वीकारणारा यांच्याव्यतिरिक्त इतर कुणी वाचू शकत नाही.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained