बलात्कार - एक मानसिक विकृती

बलात्कार - एक मानसिक विकृती
सध्या देशात उन्नाव, कथुआ, आसाम वगैरे ठिकाणी अल्पवयीन मुलींवर व स्त्रियांवर झालेल्या दुर्दैवी बलात्काराच्या घटनांनी एकच काहूर माजला आहे.
हे सर्व प्रसंग कोणत्याही पुरोगामी समाजाला लाजिरवाणे आहेत व त्यांचे कठोर शब्दांने व क्रुतीने खंडण केले पाहिजे.
बलात्कार हा बाईवर झालेला एक हिंसक हल्ला आहे आणि बलात्कार करणारा पुरुष हा गुन्हेगार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी.
बलात्काराचे प्रकार का घडतात ?
बलात्कार ही मानसिक विकृती आहे. स्वतःच्या शरीरसुखासाठी, स्वार्थासाठी, सूड उगवण्यासाठी स्त्री देहाचा वापर, स्त्रीला उपभोगणं ही बलात्कार होण्यामागची मानसिकता दिसून येते. 
दंगलीमध्ये झालेले बलात्कार किंवा जातीय द्वेषातून झालेले खैरलांजी प्रकरण - यावरून आपल्याला दिसते की, जातीय-धार्मिक द्वेष, बदला, सूड व्यक्त करण्यासाठी, एखाद्या समुदायावर नियंत्रण आणण्यासाठी  स्त्रियांवर अत्याचार केले जातात. बलात्कार हे हत्यार म्हणून वापरलं जातं. असे सूड म्हणून केले गेलेले सामूहिक बलात्कार, दंगलीतले बलात्कार हे कळत नकळत विशिष्ट समुदायांकडून छुप्या पद्धतीने गौरवले जातात.
बलात्काराची सुरुवात ही मेंदूपासून होते. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी सुरुवात ही मेंदूपासूनच करायला हवी..सगळ्याच गोष्टींकडे लैंगिक दृष्टीने बघणे योग्य नाही. स्त्री-पुरुषांमध्ये मनमोकळा संवाद, मैत्री, एकमेकांविषयी आदर, भाव-भावनांचा, एकमेकांच्या शरीराचा आदर करणे गरजेचे आहे. 
स्त्री उपभोगाची वस्तू ही पुरुषप्रधान मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्रीला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार आपल्या देशात सहजासहजी मिळणार नाही कारण आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषांनी मिळणारे फायदे सोडायला ते सहजासहजी तयार होणार नाहीत. याकरिता स्त्रियांनी व्यवस्थेत परावलंबी जगणे सोडले पाहिजे. 
स्त्रियांनी चाकोरी तोडून आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. बलात्काराच्या घटना खऱ्या अर्थाने थांबायच्या असतील तर समतेवर आधारित समाजनिर्मितीची गरज आहे. लैंगिक संबंधाचे जीवनातील महत्व, अन्याय, अत्याचार याचा विचार करून, त्याविषयीचे योग्य, शास्त्रीय ज्ञान लोकांना दिले पाहिजे. 
प्रेम, विश्वास, संमती, समोरच्या व्यक्तीच्या इच्छेचा, मताचा आदर आणि स्वीकार यांसारखी मूल्ये  जाणीवपूर्वक बिंबवण्याची गरज आहे.
सामूहिक बलात्कार हा एक हिंसक लैंगिकतेचा एक प्रकार आहे. ज्या व्यक्तींनी आयुष्यात लहानपणापासून हिंसाचार पाहिलेला आहे, जे अशा वातावरणात वाढलेले आहेत, अशा व्यक्तींना त्याचे भान राहत नाही. स्त्रियांबाबत असलेले आकर्षण असते. मात्र मनातून भावना व्यक्त झाल्यावर ती गोष्ट मिळत नाही, त्यामुळे त्याचा तिरस्कार केला जातो. अशांच्या मनात स्त्रियांबाबत राग निर्माण होतो. त्यांना लैंगिक शिक्षण नसल्याने असे प्रकार घडतात. 
बलात्कारामुळे स्त्री वर शारीरिक व मानसिक आघात होतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतो. आजही आपल्याकडे लैगिंक शिक्षणाबाबत खुल्या मनाने चर्चा होत नाही. लैंगिक भावनांचा विचार केला जात नाही. योग्य वेळी लैंगिक शिक्षण मिळाल्यास असे प्रकार घडणार नाहीत. याकरता जनजागृती करणे आवश्यक आहे. योग्य वेळी लैंगिक शिक्षण दिले गेले पाहिजे. 
त्यासाठी समाजातील विकृती बदलायला हवी. पालकांनी मुलांशी बोलायला हव. प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला दोष देते हे चक्र थांबायला हवे. 
टीन एज् मध्ये आपल्या मुलांच्या भावना पालकांना कळतात कारण ते त्यातुन गेलेले असतात म्हणुनच त्यांनी “आम्ही तुझ्या वयाचे असताना असले उद्योग केले नाहीत हे भंपक डायलॉगबाजी करू नये.”  Juvenile Justice Bill आणून हा प्रश्न सुटणार नाही. 
महिलांची सुरक्षा वाढवावीच पण म्हणजे रात्री १-२ वाजता तुम्ही कुठेही जाल तर चांगल्या माणसाच्याही सुरक्षेची जबाबदारी कोण देऊ शकणार? 
हा ज्याच्यात्याच्या विचाराच्या पातळीचा प्रश्न आहे.
बलात्कार ही विकृती आहे. त्याच्यावर कठोर शासन हाच पर्याय आहे.
पुरूषांची न शमणारी लैंगिक भूक (की विक्रूती) यावर उपाय म्हणून काही लोक वेश्याव्यवसाय अधिकृत करा असे सुचवतात.
फक्त वेश्याव्यवसाय अधिकृत करण्याने हे थांबू शकत नाही. सगळ्यांना अर्थांजणाचा अधिकार आहे म्हणुन दरोडे बंद होत नाहीत. 
पण बाहेर जाताना किती काळजी घ्यावी हे आपल्यावर अवलंबून आहे मग ती दरोड्याची असो वा…. शेवटी संपत्तीचे किंवा शारिरीक भुकेचे दरोडेखोर असूच नयेत अस म्हणून त्यांना घालवता येत नाही,  म्हणून आपल्या सुरक्षेची ‘थोडी’ जबाबदारी आपल्यावरही पडतेच.
आपला देश फार पसरलेला आहे. भिन्न भिन्न प्रकार चे लोक आहेत, भिन्न भिन्न आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक  स्थिती मध्ये राहणारे लोक आहेत. शिकलेल्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या महिलांची स्थिती जरा बरी आहे. मात्र इतर ठिकाणी परिस्थिती अजून ही भीषण आहे.
बलात्कार टाळण्यासाठी माणसांच्या विचारात अमुलाग्र बदल घडवणे गरजेचं आहे. Candle march, Agitating on social media यांनी काही साध्य होणार नाही. त्यासाठी गरज आहे एका फार मोठ्या जनप्रबोधनाची..
दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained