कस जेवाव ते शिकाव पुलंकडुनच.....





*एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत!*
सगळ्यांत उत्तम 'एटीकेट म्हणजे' सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात.
ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये.
आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्ये वाढायला सांगावी. वरण मात्र भातावरच, वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना गरमगरम कालवावा.
ताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरणभात आणि दहीभात यांचीही एकच कृती.
जेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा राहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास, केरळ इथे बदली होऊ शकते.
रसगुल्ले किवा तत्सम प्याराबोला चमच्याने तुकडे करून खाणाऱ्या मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो, पाक अंगावर सांडेल ही भीती त्यांना वाटत असते, हे पदार्थ अंगठा व तर्जनी यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात.
जिलबी मात्र मठ्ठ्यात बुचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात बुचकळून तुकड्या तुकड्याने तोंडात सरकवायची असते.
श्रीखंड चमच्याने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे, हे तर्जनीवर घेऊन गंधासारखे जिभेला लावायचे असते.
पुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुलासारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड, बासुंदी, आमरस ही मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात.
मिठाच्या डावीकडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किंवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे.
कधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही, ऐकणार्याचा आणि सुरांचा जीव घेत त्याचा प्रवास सुरू असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि मैफील चमकून जागी होते, चटण्या, कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर आहेत, यांची बोट जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात. पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा.
ओ
पापड, कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारे आहेत, चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडे बेसुरच.
हल्ली छोट्या आकाराचे बटाटेवडे वगैरे करतात. बटाटावड्याच एवढं बालिश आणि ओंगळ रूप दुसरे नाही. बटाटावडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का ? भजी मात्र चालतात.
स्वच्छतेच्या आचरट कल्पनांनी या चमचा संस्कृतीला जन्म दिलेला आहे.
साधा किवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्याबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले की हे लोक पोळी देखील काटा चमच्याने तोडून खात असतील ही शंका मनात पिंगा घालायला लागते.
चिवड्याला चमचा नको पण या यज्ञकर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे.
ही पाच बोटे ही पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. उदा. करंगळी म्हणजे जलतत्त्व. जेवताना ही पंचमहाभूतं जेवणात उतरायला हवीत.
राजकारणात आणि जेवणात हे चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत बिघडली.
*पु. ल. देशपांडे*
Comments
Post a Comment