मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक !

मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक !
राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, (Politics is the art of the possible) असं म्हटलं जातं. ठोकळेबाज, चाकोरीबद्ध विचार केल्यास भिंतीवर डोकं आपटण्यापेक्षा हाती काहीही लागत नाही. याउलट विविध शक्यतांचा विचार करून सर्वोत्तम पर्याय निवडल्यास आपण भिंत कशी आणि कधी पार केली याचा कोणाला पत्ताही लागत नाही !
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वशैलीत याचा प्रत्यय नेहमीच येतो. खरंतर नरेंद्र मोदी यांच्यानंतर इतक्या प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागलेला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचाच उल्लेख करावा लागेल आणि मोदींप्रमाणेच त्यानी अत्यंत चतुराईने आणि धोरणीपणाने शक्यतांचा खेळ करून विरोधकांवर बाजी उलटवली आहे आणि आव्हानांवर मात केली आहे.
संपूर्ण बहुमत नसताना सरकार स्थापन करणं हे पहिलं आव्हान. तेव्हा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या ‘शक्यतेने’ शिवसेनेला सरकारमध्ये सामील होणं भाग पाडलं. त्यानंतर सरकारमध्ये राहूनही उभा दावा मांडणारी शिवसेना, ‘फडणवीसांना हरवणे’ हा एककलमी कार्यक्रम असलेले विरोधक, शेतकरी कर्जमाफी, मराठा मोर्चे यासारख्या अजस्त्र आव्हानांना त्यांनी ज्या समर्थपणे तोंड दिलं त्यामध्ये त्यांची सखोल राजकीय जाण दिसून येते.
कालच पार पडलेला शेतकरी मोर्चा त्यांनी ज्याप्रकारे हाताळला त्याचं वर्णन तर ‘मास्टरस्ट्रोक’ असंच केलं पाहिजे. सर्वसाधारणपणे पत्रकारांनी आणि विश्लेषकांनी यावर चाकोरीबद्ध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण या संपूर्ण प्रकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो शक्यतांचा खेळ केला आहे तो लक्षात घेतला तर त्यांच्या परिपक्व नेतृत्वाला दाद द्यावीशी वाटते.
हा मोर्चा ‘अखिल भारतीय किसान सभा’ या डाव्या पक्षांच्या संघटनेने आयोजित केला होता आणि त्यात नाशिक जिल्ह्यातील वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींचा मुख्यत: समावेश होता. त्यांच्याकडे जमिनीची मालकी नसल्यामुळे त्यांना बँकांची कर्ज मिळालेली नाहीत आणि ते कर्जमाफीचे लाभार्थीही ठरू शकत नाहीत. तरीही महाराष्ट्रात गेले काही महिने गाजत असलेले शेतकरी आंदोलन या मोर्चाने जणू काही हायजॅक केले आहे असे दिसते.
खरंतर या मोर्च्याच्या नेतृत्वाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आधीच चर्चा झाली होती आणि बहुतांश मागण्या मान्य करायचं तत्वतः ठरलंही होतं हे काही लपून राहिलेलं नाही. तरीही हा लॉंग मार्च, त्याचं मंत्र्यांनी केलेलं स्वागत, मुख्यमंत्र्यांशी चर्चा आणि अखेर मागण्यांना मान्यता हे सगळं नेपथ्य व्यवस्थित घडवून आणण्यात आलं. विजयाचे फटाके फोडून मोर्चेकरी शांतपणे परत गेले आणि ‘शेतकरी आंदोलन’ यशस्वी झाल्याच्या बॅनर हेडलाईन्स सगळीकडे झळकल्या.
अनेक पक्षी मारले
या खेळीद्वारे मुख्यमंत्र्यांनी अनेक पक्षी मारले आहेत. पहिला म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी शेतकरी आंदोलनाचा लाभ उठवण्याची शक्यता संपुष्टात आली. याउलट डाव्या पक्षांना थोडीफार प्रसिद्धी मिळाली, तरी त्यांची महाराष्ट्रातील राजकीय ताकद नगण्य असल्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभं करतील अशी शक्यता दिसत नाही. तसंच सरकारने ज्या संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळले ते जनतेसमोर ठळकपणे आले. आंदोलनकर्त्यांना परत जाण्यासाठी खास रेल्वेगाडी आणि बसेसची सोय करून त्यांचीही मनं जिंकली. अशाप्रकारे अशक्यप्राय भासणाऱ्या आव्हानाचं संधीत परिवर्तन करण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दाखविली आहे !
हा ‘मास्टरस्ट्रोक’ महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकेल असं दिसतं !

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained